आपत्कालीन स्थितीबाबत सर्वंकष आढावा
रक्तदात्यांनी पुढे यावे-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर –आपत्कालीन परिस्थितीच्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सर्व विभागांचा आढावा घेतला. त्यात अशा परिस्थितीसाठी सज्ज राहण्याबाबत सुचना देण्यात आल्या. तसेच मॉक ड्रील आदी सराव करण्याबाबत सज्जता ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. सद्यस्थितीत जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा साठा कमी असून रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने पुढे यावे व रक्तदान करावे,असे आवाहनही जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.
आपत्कलीन अस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करणे, सर्व विभागांच्या पूर्वतयारीचा आढावा घेणे, आवश्यकता भासल्यास ब्लॅक आऊट, मॉक ड्रील करणे याबाबत विभागांना निर्देश देण्यात आले. सार्वजनिक गर्दीची स्थळे, प्रार्थना स्थळे, पर्यटन स्थळे अशा सर्व स्थळांवरील सुरक्षा व्यवस्था इ.बाबत निर्देश देण्यात आले. दुपारी सर्व हॉस्पिटल्स त्यांचे संचालक आदींना बोलावण्यात आले होते. त्यांच्याकडेही सर्व प्रकारच्या सज्जतांविषयी निर्देश देण्यात आले. खाटांची संख्या, औषधी साठा, रक्तसाठा इ.बाबत माहिती घेण्यात आली. अशा परिस्थितीत नागरिकांना रक्तदान करावयाचे आवाहन करावे,असे जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले.
