Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादशेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करणारी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अन्य राज्यांसाठीही मार्गदर्शक - महावितरणचे...

शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करणारी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अन्य राज्यांसाठीही मार्गदर्शक – महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र

शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करणारी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अन्य राज्यांसाठीही मार्गदर्शक – महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र

पाडोळी येथील ६ मेगावॅट सौर प्रकल्पाचे उद्घाटन

छत्रपती संभाजीनगर : शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने सुरू झालेली मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना-२.० अन्य राज्यांसाठी मार्गदर्शक ठरली आहे. जगातील सर्वात मोठ्या विकेंद्रीत सौर ऊर्जा प्रकल्पांद्वारे पुढील एक वर्षात १६ हजार मेगावॅट विजेचा शेतीला दिवसा पुरवठा करण्यात येणार आहे, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री.लोकेश चंद्र यांनी बुधवारी (२३ जुलै) दिली.

धाराशिव जिल्ह्यातील पाडोळी (ता. कळंब) येथे क्लिनहेडेज न्यू एनर्जीज प्रा. लि. आणि आदित्य ग्रीन एनर्जी विकासकांच्या सहाय्याने पूर्ण झालेल्या ६ मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन श्री.लोकेश चंद्र यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. सहव्यवस्थापकीय संचालक श्री.आदित्य जिवने, संचालक (संचालन/प्रकल्प) श्री.सचिन तालेवार, संचालक (मानव संसाधन) श्री.राजेंद्र पवार, कार्यकारी संचालक श्री.प्रसाद रेशमे व श्री.धनंजय औंढेकर, मुख्य अभियंता श्री.अरविंद बुलबुले यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री.लोकेश चंद्र म्हणाले की, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला राज्यात सर्व जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने मोठा वेग मिळाला आहे. या योजनेचा अभ्यास व अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र शासनाच्या सूचनेनुसार उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, राज्यस्थान या राज्यांतील लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी येत आहेत.

ते पुढे म्हणाले की, या योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठ्यासह वीज खरेदीचे दर किफायतशीर राहणार आहेत. त्यामुळे क्रॉस सबसिडीचा बोजा कमी होऊन प्रामुख्याने उद्योगांचे वीज दर आणखी कमी होतील. या योजनेमुळे राज्यात ६५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणि ग्रामीण भागात सुमारे ७० हजार नवीन रोजगार निर्माण होत आहे. ही योजना गेमचेंजर असून गेल्या अडीच वर्षांमध्ये सौर ऊर्जेमध्ये झालेल्या कामगिरीच्या आधारेच महाराष्ट्रामध्ये प्रथमच वीज दरांमध्ये कपात होऊ शकली. यासोबतच सौर ऊर्जेवर आधारित बॅटरी स्टोरेज करार करण्यात येत असून जास्त मागणीच्या कालावधीत या सौर विजेचा वापर करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

राज्यात लातूर व धाराशिव जिल्हे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना-२.० मध्ये अग्रेसर आहे. लातूर जिल्ह्यात २२५ मेगावॅट क्षमतेचे ४६ व धाराशिव जिल्ह्यात २८ क्षमतेचे ८ सौर प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. या दोन्ही जिल्ह्यांतील ७२ हजार शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा उपलब्ध झाला आहे. पाडोळी येथील ६ मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पातून पाडोळी उपकेंद्र अंतर्गत पाडोळी, नायगाव, निपाणी, वडगाव, वाठवडा व पिंपरी या गावातील २१०६ शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा होणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments