सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया जालना दौऱ्यावर
शेतकरी कामगार यांच्याशी साधणार संवाद
जालना (प्रतिनिधी) सामाजिक कार्यकर्त्या व भ्रष्टाचार विरोधी कणखरतेने लढणाऱ्या नेत्या अंजलीताई दमानिया या गुरुवार दि. 3 एप्रिल रोजी जालना जिल्हा दौऱ्यावर येत असून त्या दुपारी तीन वाजता रामनगर सहकारी साखर कारखाना परिसरात उस उत्पादक शेतकरी, कामगार, मजूर यांच्याशी संवाद साधणार आहेत.
रामनगर सहकारी साखर कारखाना हा जालना-बदनापूर तालुक्यातील महत्त्वाचा आणि तेवढाच शेतकऱ्यांसाठी आर्थिक स्त्रोत होता. परंतु गेल्या काही वर्षांपासून राजकीय-भ्रष्टाचाऱ्यांच्या चिखलात अडकलेला या कारखान्याचा रथ काही केल्या बाहेर येईना. शेतकरी, कामगार यांचा रस्त्यापासून ते थेट दिल्लीपर्यंत लढा सुरूच आहे. या लढ्याला पाठबळ मिळावे यासाठी या भागातील उस उत्पादक शेतकरी, कामगार, मजूर तसेच जेष्ठ समाजसेवकांनी सौ. अंजली दमानिया यांची भेट घेतली आणि त्यांना जालना सहकारी साखर कारखाना, लालबाग जिनिंग, कृषी उत्पन्न बाजार समिती, जालना महानगर पालिका तसेच जिल्ह्यातील वाढती गुन्हेंगारी या परिसरातील विविध समस्यांविषयी अवगत करून दिले. त्या अनुषंगाने दि. 3 एप्रिल रोजी त्या कारखाना परिसरातील शेतकरी, सभासद, ऊस उत्पादक, मजूर यांच्याशी संवाद साधणार आहेत. त्या जालना येथे गुरुवारी मुक्कामी असून शुक्रवारी त्या संभाजीनगरकडे रवाना होतील अशी माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.
