आचारसंहिता अंमलबजावणी व पारदर्शकतेस द्या प्राधान्य- जिल्हाधिकारी स्वामी
छत्रपती संभाजीनगर – नगरपालिका व नगरपंचायत निवडणूक कार्यक्रम घोषीत झाला असून याबबत करावयाच्या विविध उपाययोजना व कारवाई बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. नगरपालिका,नगरपंचायत क्षेत्रात आचारसंहिता अंमलबजावणी व निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता यास प्राधान्य द्यावे,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातून दुरदृष्यप्रणालीद्वारे या बैठकीचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी डॉ. सुचिता शिंदे, संगिता राठोड, एकनाथ बंगाळे, उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, नीलम बाफना, लतिफ पठाण, नगरपालिका प्रशासन सहा.आयुक्त ऋषिकेश भालेराव, तसेच उपविगीय पोलीस अधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, प्रत्येक नगरपालिका क्षेत्रात निवडणूकांसाठी आवश्यक सज्जता करावी. जिल्हा प्रशासनाकडून निवडणूकीसंदर्भात द्यावयाचे सहाय्य देण्यात येईलच. तथापि स्थानिक पातळीवर कायदा व सुव्यवस्था, आचारसंहिता अंमलबजावणी याबाबत अधिक दक्षतेने काम करावे. संपुर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे राबवावी,असे निर्देश त्यांनी दिले.
पोलीस अधीक्षक डॉ. राठोड म्हणाले की, स्थानिक पातळीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाईचा कृती आराखडा तयार ठेवावा. तसे प्रस्ताव पाठवावे. मद्य व पैसे यांच्या अवैध वाहतुकीवर निगराणी ठेवावी. सोशल मिडीयावर बारकाईने लक्ष ठेवून संवेदनशील विषयांबाबत वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी,असे त्यांनी सांगितले.
