Monday, October 27, 2025
Homeऔरंगाबादअमेरिकेतील गन संस्कृती

अमेरिकेतील गन संस्कृती

अमेरिकेतील गन संस्कृती
    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू सहकारी आणि ट्रम्प यांच्यासाठी निधी गोळा करणारे अमेरिकेतील प्रतिष्ठित नागरिक असलेले चार्ली कर्क यांची अमेरिकेत नुकतीच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विश्वासू सहकाऱ्याची भर दिवसा रस्त्यांत गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने जगभर खळबळ माजली. काहींनी याबाबत आश्चर्य व्यक्त केले मात्र अमेरिकेचा इतिहास पाहिला किंवा अगदी अलीकडच्या घटना पहिल्या तरी यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही कारण दिवसाढवळ्या गोळीबार करून हत्या करणे ही नवी गोष्ट नाही. उलट अमेरिकेची ही संस्कृती आहे आणि ती अमेरिकेची गन संस्कृती म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. आता चार्ली कर्क यांची हत्या झाल्याने आश्चर्य व्यक्त करणाऱ्यांनी मागे वळून पाहिले तर खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही असा जीवघेणा हल्ला करण्यात आला होता ते ही एकदा नव्हे तर दोनदा हे माहीत नसावे. मागील वर्षी अमेरिकेत  राष्ट्राध्यक्षपदाच्या  निवडणुकीचा  प्रचार शिगेला पोहचला असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर दोनदा  गोळीबार करण्यात आला होता.  मागील वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात ट्रम्प यांच्यावर दुसऱ्यांदा गोळीबार करण्यात आला होता विशेष म्हणजे त्या आधी  दोन महिन्यापूर्वीच म्हणजे जुलै  मध्येही त्यांच्यावर असाच गोळीबार करण्यात आला होता. दोन महिन्यात  डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर दोनदा  जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. सुदैवाने दोन्ही वेळा त्यातून ते बचावले.  मागील वर्षी १३ जुलै रोजी अमेरिकेतील पेनिसिल्व्हिया राज्यातील एका प्रचार सभेत त्यांच्यावर पहिल्यांदा गोळीबार करण्यात आला. त्यावेळी ट्रम्प यांच्यावर चालवण्यात आलेली गोळी त्यांच्या कानाला चाटून गेली होती. हा हल्ला सभेपासून जवळ असलेल्या छतावरून करण्यात आला. एका वीस वर्षीय तरुणाने त्यांच्यावर हल्ला केला होता. दुसरा हल्ला डोनाल्ड ट्रम्प हे वेस्ट पाम बीच येथील गोल्फ कोर्स वर गोल्फ खेळत असताना त्यांच्यावर करण्यात आला. झुडुपात लपून बसलेल्या रायन रूथ या तरुणाने त्याच्या ए के ४७ या रायफल मधून त्यांच्यावर गोळीबार केला.   दैव बलवत्तर म्हणून दोन्हीवेळी त्यांचा जीव वाचला. डोनाल्ड ट्रम्प सारख्या मोठ्या जागतिक नेत्यावर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर चार्ली कर्क यांच्यावर झालेला हल्ला हा किरकोळ वाटतो. डोनाल्ड ट्रम्प असो की चार्ली कर्क असो यांच्यावर झालेला  गोळीबार हे अमेरिकेच्या गन संस्कृतीचे लक्षण आहे. जगासाठी जरी अमेरिकेत होणाऱ्या गोळीबाराच्या घटना  खळबळजनक असल्या  तरी अमेरिकेसाठी हे काही नवे नाही.  याआधीही अमेरिकेच्या काही माजी राष्ट्राध्यक्षांवर असे  जीवघेणे हल्ले झाले आहेत.  अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन, जेम्स गारफील्ड, विल्यम मॅककिनले आणि जॉन एफ केनेडी याची हत्या झाली आहे. त्यांच्यावरही असाच गोळीबार करण्यात आला होता. केवळ राजकीय नेतेच नाही तर जनता देखील या गन संस्कृतीला कायम बळी पडत आली आहे. गन संस्कुतीमुळे अमेरिकेत लाखो नागरिक मरण पावले आहेत. अमेरिकेत गोळीबाराच्या घटनेत मरण पावलेल्या नागरिकांची संख्या ऐकली तर आपल्याला धस्स होईल कारण अमेरिकेत गोळीबाराच्या घटनांमध्ये मागील पन्नास वर्षात १४ लाख लोकांना जीव गमवावा लागला आहे. अमेरिकेत गोळीबाराच्या घटनेत दररोज सरासरी १०० लोक मरण पावतात. ही आकडेवारी थक्क करणारी आहे. कारण जागतिक महासत्ता असलेल्या देशात अशा प्रकारे लोकांचा जीव जात असेल तर ते धक्कादायकच नाही तर चिंताजनक देखील आहे. अमेरिकेत शाळेत गोळीबार झाल्याचा आणि त्यात अनेक शाळकरी मुलांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या आपण नेहमीच ऐकतो, वाचतो अर्थात याला अमेरिकाच जबाबदार आहे. अमेरिकेत पूर्वीपासून गन संस्कृती अस्तित्वात आहे. दुकानातून फळे, भाजीपाला मिळतात तशा तिथे बंदुका विकत मिळतात. बंदुका चालवण्यासाठी किंवा विकत घेण्यासाठी आपल्याकडे जसा शासकीय परवाना काढावा लागतो तसा तिथे काढावा लागत नाही. तिथे बंदुका आणि काडतूस सहज मिळतात म्हणूनच तिथे गन संस्कृती उदयास आली. आता हीच गन संस्कुती  अमेरिकेच्या मुळाशी आली आहे. अमेरिकेच्या या गन संस्कृतीवर अनेकांनी चिंता देखील व्यक्त केली आहे पण अमेरिकेच्या नेत्यांनी ती कधीही गांभीर्याने घेतली नाही. खुद्द डोनाल्ड ट्रम्प हे गन संस्कृतीचे  मोठे समर्थक आहेत. २०१६ मध्ये त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी रिव्हॉल्वर व रायफल हे स्वसंरक्षणासाठी एक उत्तम शस्त्र असल्याचे म्हंटले होते. केवळ ट्रम्पच नाही तर अमेरिकेतील अनेक नेते हे गन संस्कृतीचे समर्थक आहेत. आता मात्र हीच संस्कुती त्यांच्या जीवावर उठली आहे.
-श्याम ठाणेदार 
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments