अंबड तालुक्यात अवैध वाळू वाहतूक व उत्खननावर महसूल विभागाची धडक कारवाई; दोन ट्रॅक्टर जप्त,गुन्हे दाखल
जालना/प्रतिनिधी/ अंबड तालुक्यात अवैध गौण खनिज व वाळू उत्खनन करणाऱ्यांविरुद्ध महसूल विभागाने धडक मोहीम उघडली आहे.माननीय जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल, अप्पर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ,निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हादगल आणि उपविभागीय दंडाधिकारी उमाकांत पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार विजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अंबड आणि गोंदी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या कारवाया करत अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त केले आहेत.
पहिली कारवाई: अंबड शहर परिसर
मौजे मठ पिंपळगाव येथील दुधना नदी पात्रात अवैध वाळू उत्खनन चालू असल्याची गोपनीय माहिती तहसीलदार विजय चव्हाण यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे तलाठी स्वप्नील खरात व त्यांच्या पथकाने पाळत ठेवून लालवाडी फाटा येथे एक वाळूने भरलेला ट्रॅक्टर पकडला.
* सदर वाहनावर कोणताही नोंदणी क्रमांक नव्हता.
* चालकाकडे जागेवर कोणतीही वैध पावती किंवा ई-चलन आढळून आले नाही. नंतर सादर करण्यात आलेली पावती देखील तपासणीअंती अवैध असल्याचे व वाहनाला जीपीएस नसल्याचे निष्पन्न झाले.
* या कारवाईत महसूल विभागाने स्वराज 744XT मॉडेलचा केशरी रंगाचा ट्रॅक्टर (चेसिस क्र. MBNBU53ADNCH27842) आणि १ ब्रास वाळू असा एकूण ७,०५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तहसील कार्यालय, अंबड येथे जमा केला आहे.
* याप्रकरणी तलाठी स्वप्नील खरात यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालक रईस सय्यद आणि मालक अमोल शिवनाथ जिगे (दोघेही रा. मठ पिंपळगाव) यांच्यावर बी.एन.एस. २०२३ च्या कलम ३०३(२), ३(५), महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम ४८(७), ४८(८), खाण अधिनियम १९५२ च्या कलम ३, ४ आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ च्या कलम ९, १५ नुसार प्रथम खबर क्र. ०११५ अन्वये दि. २८/०२/२०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी कारवाई: गोंदी पोलीस ठाणे हद्द
गोंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गुन्ह्यातील आरोपीला जामीन मिळाला होता व न्यायालयाने वाहन सोडण्याचे आदेश दिले होते; परंतु महसूल विभागाचा दंड भरण्यात आलेला नव्हता. दंडात्मक कार्यवाहीसाठी सदर ट्रॅक्टर जप्त करून तहसील कार्यालयात आणण्याची कारवाई मंडळ अधिकारी कृष्णा हेडके, तलाठी विश्वास ढवळे, कोतवाल मनोज उघडे व त्यांच्या पथकाने केली. हे ट्रॅक्टर कुख्यात गुंड विलास शिंदे उर्फ वकिल्या याच्या मालकीचे असल्याचे निष्पन्न झाले आहे. वाहन जप्त करून आणत असताना काही महिलांनी अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला, परंतु गोंदी पोलीस ठाण्याचे एपीआय आशिष खांडेकर व त्यांच्या पोलीस पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत चोख बंदोबस्त पुरवला व सदर ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले.
तहसीलदार विजय चव्हाण यांचे आवाहन व इशारा:
“कोणत्याही परिस्थितीमध्ये अवैध गौण खनिज वाहतूक व उत्खनन खपवून घेतले जाणार नाही. संबंधितांवर दंडात्मक तसेच फौजदारी स्वरूपाची कठोर कारवाई करण्यात येईल. अवैध उत्खननास आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याबाबत पोलीस ठाण्यांना पत्र देण्यात आले आहे. नागरिकांनी आणि वाहनधारकांनी अवैध वाळू वाहतूक किंवा चोरी करू नये; तसे आढळून आल्यास गय केली जाणार नाही.”
या दोन्ही कारवाया यशस्वी करण्यासाठी मंडळ अधिकारी सुनील कारामपुरी, धनगर पिंपरी, मंडळ अधिकारी कृष्णा हेडके, तलाठी स्वप्नील खरात, तलाठी विश्वास ढवळे, श्याम विभूते, विकास डोळसे, गाडेकर, कोतवाल मनोज उघडे आणि पोलीस पाटील महेंद्र भिंगारदेव यांच्यासह महसूल व पोलीस विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.