अंबड येथे अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली; सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन
जालना/प्रतिनिधी/ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांचे दि.28 जानेवारी रोजी सकाळी पावणे नऊच्या सुमारास पुणे जिल्ह्यातील बारामती येथील विमानतळावर विमान लँडिंगदरम्यान झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी निधन झाले.या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असून अंबड तालुक्यातही तीव्र दुःखाची भावना व्यक्त होत आहे.या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात सर्वपक्षीय व सर्व समाज घटकांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले.ही शोकसभा दि.30 जानेवारी रोजी सकाळी साडे दहा वाजता अंबड येथील महात्मा फुले चौक (चक्री चौक) येथे पार पडली.
शोकसभेच्या सुरुवातीस दिवंगत अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दोन मिनिटांचे मौन पाळण्यात आले.यावेळी माजी मंत्री राजेश भैय्या टोपे,आमदार नारायणजी कुचे,माजी सभापती प्रभाकर मामा पवार,बप्पासाहेब गोल्डे,जिल्हाध्यक्ष डॉ.निसार देशमुख,बाबासाहेब इंगळे,रविद्र तात्या तौर,नगराध्यक्ष केदार दादा कुलकर्णी,प्राचार्य भागवतराव कटारे,विवेक भैय्या चोथे,सतिश होडे,उपनगराध्यक्ष विश्वजीत खरात,सुदाम बप्पा मुकणे,चंद्रकांत कारके,दिपक भैय्या ठाकूर,संदीप दादा खरात,जाकेरभाई डावरगावकर,शिवप्रसाद चांगले,सतिश खरात,समदभाई बागवान,संजय जाधव,दिपक लोहकरे,मनोज मरकड,भैय्यासाहेब हातोटे, रमेशभाऊ पैठणे,हनुमान धांडे,अशोक लाडे,गंगाधर वराडे,सौरभ कुलकर्णी,अमोल वराडे सर,कुमारभाऊ रुपवते,द्वारकासेठ जाधव,रजाकभाई शेख,संतोष जेधे,अँड.कृष्णा शर्मा,संतोष जिगे,आशोक शाहा,सतिश धुपे,नंदु पुंड यावेळी राजकीय नेते,नगरसेवक,सामाजिक कार्यकर्ते,वकील,डॉक्टर,पत्रकार,व्यापारी,युवक, महिला तसेच सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.“अजितदादा पवार हे धाडसी निर्णय,प्रशासनावर मजबूत पकड आणि विकासाभिमुख”नेतृत्वासाठी ओळखले जात होते.महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी आपली एक वेगळी व ठळक ओळख निर्माण केली होती,अशा शब्दांत वक्त्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
या शोकसभेला सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी,माजी आमदार,नगरसेवक,सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी,व्यापारी संघटना,वकील,डॉक्टर,पत्रकार बांधव तसेच मोठ्या संख्येने नागरिक यावेळी उपस्थित होते. अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तर परिसरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले होते.
अजितदादा पवार यांच्या अकाली जाण्याने राज्याने एक अनुभवी,कणखर आणि प्रभावी नेतृत्व गमावल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. अंबड तालुक्यातील नागरिकांनी “भावपूर्ण श्रद्धांजली”अर्पण करत आपल्या भावना व्यक्त केल्या.शोकसभेच्या समारोपप्रसंगी दिवंगत नेत्याच्या आत्म्यास शांती लाभो व त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो,अशी सामूहिक प्रार्थना करण्यात आली.