Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादतर अमेरिकेतले जैक्सन ओसवाल्ट जग बदलत असतील.

तर अमेरिकेतले जैक्सन ओसवाल्ट जग बदलत असतील.

तर अमेरिकेतले जैक्सन ओसवाल्ट जग बदलत असतील.
अमेरिकेच्या १२ वर्षीय जैक्सन ओसवाल्टने आपल्या घरच्या गॅरेजमध्ये एक संपूर्ण अणुवीज प्रकल्प उभारला. अवघ्या १२ व्या वर्षी न्यूक्लियर फ्यूजन रिऍक्टर तयार करून त्याने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव कोरले. जगभरातील शास्त्रज्ञांसाठी हा कौतुकाचा विषय ठरला, आणि अर्थातच अमेरिकेच्या सरकारी संस्थांना त्याचे प्रयोग धक्कादायक वाटले. FBI आणि इतर यंत्रणांनी त्याच्या घरावर छापा टाकून तपास केला, पण त्याच्या बुद्धिमत्तेचे कौतुक करत, सुरक्षिततेच्या उपाययोजनांसह पुढील संशोधनासाठी त्याला प्रोत्साहन दिले. जैक्सन हा विज्ञानाच्या मदतीने मानवजातीच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्ग शोधत होता.
   पण भारतात, दुसरीच परिस्थिती दिसते. १० वर्षीय अभिनव अरोरा नावाचा मुलगा दिवसभर धार्मिक प्रवचने देण्यात व्यस्त असतो. त्याचा आवाज आणि त्याचे बोलणे पाहून लोक त्याला “बालगुरु” मानतात. मात्र, खरे पाहता, हा मुलगा त्याच्या आई-वडिलांनी दिलेले रटलेले,पूर्वग्रहदूषित विचार बाहेर पाजळतो.त्याच्या बुद्धीला कोणतीही वैज्ञानिक दिशा मिळत नाही. समाजाचा मोठा गट त्याला “अवतार” मानतो, त्याच्या प्रवचनांवर चमत्काराच्या कथा रंगवल्या जातात,आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्याच्या पालकांसाठी तो पैसे कमावण्याचे साधन बनतो.
  भारतात अभिनवसारखी अनेक मुर्ख मुले आहेत ज्यांच्या बालमनावर धार्मिक विचार जबरदस्तीने लादले जातात.त्यांचे विचार हे विज्ञानावर आधारलेले नसून,अनाकलनीय श्रद्धांवर आधारलेले असतात. “लहान वयात इतके ज्ञान!” अशी स्तुती केली जाते, पण ती मुलांची वैज्ञानिक जिज्ञासा मारून टाकणारी आहे. पालक आपल्या अपत्याला विज्ञानाच्या वाटेवर नेण्याऐवजी, त्याच्या गळ्यात “भविष्यवाणी” आणि “धर्मगुरुपणाचा” फास घालतात.
  अमेरिकेत जैक्सन ओसवाल्टसारखी मुले प्रयोगशाळांमध्ये भविष्य घडवत असताना, भारतात अभिनव अरोरांसारखी मुले धर्माच्या नावाखाली वापरली जात आहेत. देशातील लाखो विद्यार्थी आजही पुरेशा प्रयोगशाळा आणि वैज्ञानिक साधनसंपत्तीच्या अभावामुळे मागे राहतात. पण धार्मिक कट्टरता वाढवण्यासाठी मात्र भरपूर पैसा, प्रसिद्धी आणि माध्यमांचे पाठबळ सहज मिळते.जर भारताला पुढे जायचे असेल, तर प्रत्येक पालकाने आपल्या मुलांचे भविष्य वैज्ञानिक दृष्टिकोनाकडे वळवले पाहिजे. अभिनवला “बालगुरु” न बनवता, त्याला डॉक्टर, शास्त्रज्ञ किंवा संशोधक होण्यासाठी प्रेरित केले पाहिजे. जैक्सन ओसवाल्टसारखी भारतीय मुलेही असतील, पण त्यांना योग्य संधी आणि प्रोत्साहन मिळत नाही, कारण आपला समाज अजूनही धर्माच्या नावाखाली चमत्कार शोधण्यात अडकलेला आहे
  भारताला जर खरोखर महासत्ता बनायचे असेल,तर धर्माच्या नावाखाली लहान मुलांना विकण्याचे प्रकार थांबवावे लागतील.विज्ञान,तंत्रज्ञान आणि नवोपक्रम यावर भर देण्याची हीच योग्य वेळ आहे.नाहीतर,काही वर्षांनी आपण ‘बालगुरूंच्या’ देशात मागासलेले बसलेले असू, तर अमेरिकेतले जैक्सन ओसवाल्ट जग बदलत असतील.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments