राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) कडून महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती
जालना/प्रतिनिधी/ जालना शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) कडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, दि. २४ डिसेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता जालना येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयात या मुलाखती घेण्यात येणार आहेत.
या मुलाखती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी आमदार तथा जालना जिल्हा पक्षनिरीक्षक मा. बाळासाहेब आजबे, जालना जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार अरविंदराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहेत. यासह जालना जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख पदाधिकारी, ज्येष्ठ नेते व संघटनात्मक पदाधिकारी उपस्थित राहणार असून उमेदवारांची सखोल चर्चा व मूल्यांकन करण्यात येणार आहे.
आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी सक्षम, जनाधार असलेले व पक्षविचाराशी निष्ठावान उमेदवार निवडण्याच्या उद्देशाने या मुलाखती घेण्यात येत असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले. शहरातील विविध प्रभागांमधून इच्छुक असलेल्या उमेदवारांना या प्रक्रियेत आपली भूमिका, सामाजिक कार्य, संघटनात्मक अनुभव व निवडणूक तयारी मांडण्याची संधी मिळणार आहे.
तरी जालना शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व इच्छुक उमेदवारांनी आपला बायोडाटा (Biodata) तसेच समर्थकांसह मोठ्या संख्येने मुलाखतीस उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जालना शहर जिल्हाध्यक्ष शेख महेमूद यांनी केले आहे. या मुलाखतींमुळे महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला वेग येणार असल्याचे पक्षाच्या वर्तुळात बोलले जात आहे.
