आडुळ तलाठी मंडळधिकारी कार्यालयासमोरून वाहतूक जोमात
आडुळ परिसरातून वाळू उपसा जोमात तलाठी मंडळधिकारी कोमात
आत्ताच एक्सप्रेस
पैठण/प्रतिनिधी/ पैठण तालुक्यात गोदावरी नदीत वाळू तस्करांनी धुमाकूळ घातला आहे. त्यांच्या कडून कोट्यवधी रुपयांच्या वाळूची चोरी होत आहे. याला महसूल व पोलीस यंत्रणेमधील काही झारीतील शुक्राचार्यच जबाबदार असल्याची चर्चा आहे. महसूल विभाग व पोलिसांच्या बोटचेपेपणामुळे तस्करांचे फावले असून प्रशासन कोमात तर तस्कर जोमात असून खरच हा बोटचेपेणा आहे की मोठे आथिर्धक साटेलोटे आहे, याची चर्चा तालुक्यात झडू लागली आहे. दरम्यान, तालुक्याच्या पुर्व भागातील अनेक गुन्हे दाखल असलेला एक तलाठीच वाळू तस्करांचा म्होरक्या बनल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.
पैठण भागात वाळूमाफियांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. दिवसा ढवळ्या ट्रॅक्टर, जेसीबी , ट्रक व डंपर साहाय्याने वाळू उपसा सुरू आहे. सर्व यंत्रणा मॅनेज करून जेसीबीच्या सहाय्याने धुमधडाक्यात वाळू उपसा सुरू असून यातून कोट्यवधी रुपयांची वाळू चोरीला जात असली तरी महसूल व पोलीस यंत्रणा का मूग गिळून गप्प आहे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. या परिसरात नदीची अक्षरशः चाळण होत असून दहा – पंधरा फूट खोली पर्यंत खड्डे पडत आहेत. तसेच त्यामुळे नदीकाठच्या विहिरींना धोका निर्माण होणार आहे. स्वतः ला राजकारणी समजणार्या व्हाईट कॉलर वाल्या गुन्हेगारी प्रवृत्तीचे व ज्यांच्यावर मोठमोठे गुन्हे दाखल असणारे यात सामील आहेत.
येथील वाळू तस्करांनी जणू यंत्रणा विकत घेतल्या सारखी परिस्थिती निर्माण झाली असुन काही वेळा कारवाई करण्यासाठी येणार्या कोतवाल, तलाठी, मंडलाधिकारी यांच्या वर हल्ले होण्या बरोबरच वाहने अंगावर घालून जिवे मारण्याचा प्रयत्न झाला आहे. तसेच त्यांच्या विरुद्ध विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. एकंदरीत या वरून येथील तस्करी किती बोकाळली आहे हे स्पष्ट होते.