Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादअभियंता दिन

अभियंता दिन

अभियंता दिन
       आज १५ सप्टेंबर, आजचा दिवस संपूर्ण देशात अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो कारण भारतातील पहिले अभियंता भारतरत्न सर मोक्षगुडम  विश्वेश्वरय्या  यांचा हा जन्मदिवस. मोक्षगुडम विश्वेश्वरय्या हे केवळ अभियंता नव्हते तर ते थोर देशभक्तही होते. आजच्या दिवशी म्हणजे १५ सप्टेंबर १८६१ रोजी कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील मदनहल्ली या छोट्याश्या गावात त्यांचा जन्म झाला. मोक्षगुडम विश्वेश्वरय्या यांचे वडील विद्वान संस्कृत पंडित होते. घरची परिस्थिती हलाखीची होती तरीही त्यांनी विश्वेश्वरय्या यांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. विश्वेश्वरय्या यांनीही गरिबीशी झुंज देत तालुक्याला एकटे राहून आपले शिक्षण अव्वल गुणांनी पूर्ण केले. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर ते उच्च शिक्षणासाठी बंगळुरुला आले. तिथेही त्यांनी विशेष गुणवत्ता मिळवत बी ए  केले. पदवीधर झाल्यावर त्यांना तांत्रिक शिक्षणाची आवड निर्माण झाली. पण तांत्रिक शिक्षण घेण्यासाठी पैसे नसल्याने त्यांनी म्हैसूरच्या राजाला विनंती केली. म्हैसूरच्या राजाने त्यांच्यातील गुणवत्ता हेरून त्यांना अभियांत्रिकी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देऊन पुण्याला पाठवले. विश्वेश्वरय्या यांनीही त्यांच्यावरील विश्वास सार्थ ठरवत  अभियांत्रिकी परीक्षेत  मुंबई प्रांतात प्रथम क्रमांक पटकावला. या त्यांच्या यशाची दखल घेऊन १८८४ साली सरकारने त्यांना सहाय्यक अभियंता या पदावर नेममुक दिली. तिथेही त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. या काळात त्यांनी खडकवासला धरणासाठी एक अभिनव अशा  स्वयंचलित गेटची निर्मिती केली. यामुळे विशिष्ट पातळी वरील अतिरिक्त पाणीच वाहून जाई. अशाप्रकारच्या गेटची निर्मिती भारतात पहिल्यांदाच झाली होती. या डिझाइनचे नाव पुढे विश्वेश्वरय्या गेट असे झाले. १९०७ साली त्यांनी सरकारी नोकरीतून निवृत्ती पत्करली. निवृत्तीनंतर निजाम सरकारने त्यांची  विशेष सल्लागारपदी नियुक्ती केली. तिथे त्यांनी हैदराबाद परिसरातील  दोन नद्यांवर धरणे बांधून  हैदराबाद शहर पुरमुक्त केलेच शिवाय शहराचा कायापालट देखील केला. म्हैसूरच्या राजाने त्यांना मुख्य अभियंता पदाची ऑफर दिली त्यांनी ती स्वीकारली. म्हैसूरचे मुख्य अभियंता असताना त्यांनी तिथे कृष्णराज सागर धरण, वृंदावन गार्डन बांधले तसेच विकासाची अनेक कामे केली. या व्यतिरिक्त त्यांनी उद्योग व शेती सिंचनाची अनेक कामे केली. पाण्याचा अपव्यय टाळून पुरेपूर वापर करणारी ब्लॉक सिस्टीम ही त्यांचीच देणगी आहे. म्हैसूरचे पद सोडल्यावर त्यांनी अभियांत्रिकीच नव्हे तर उद्योग, शेती, नगर सुधारणा या योजनेत मोलाचे कार्य केले. विश्वेश्वरय्या हे उच्चविद्याविभूषित असूनही त्यांचे  राहणीमान अतिशय साधी होती. म्हैसूरी पद्धतीचा फेटा आणि साधी वेशभूषा त्यांनी शेवटपर्यंत जपली. त्यांचे व्यक्तिमत्त्वही आकर्षित करणारे होते. ते जितके साधे होते तितकेच ते परखडही होते. अंधश्रद्धा त्यांना मान्य नव्हती. मानवात देव आहे. मानव सेवा हीच ईश्वर सेवा असे त्यांचे मत होते. ते जसे बोलत तसे ते वागतही होते. वयाच्या ९४ व्या वर्षी भारत सरकारने त्यांना भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने गौरविले. विश्वेश्वरय्या हे शतायुषी होऊन निरामय जीवन जगले. १४ एप्रिल १९६२ रोजी वयाच्या १०१ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. पण त्यांनी केलेल्या कार्यकर्तृत्वाचा गौरव व्हावा म्हणूनच आजचा दिवस संपूर्ण देशात अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. विश्वगुडम विश्वेश्वरय्या यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
-श्याम ठाणेदार
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments