पडलेल्या घरांतून पुन्हा उभी राहते स्वप्नं..समाजभानच्या हातातून मदतीचा स्पर्श
गरजूंना घरपोच आर्थिक मदत आणि अन्नधान्य वाटप
घनसावंगी/प्रतिनिधी/ मराठवाड्यातील अतिवृष्टी आणि गोदावरी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे शेतमालाचे प्रचंड नुकसान झालेच, परंतु गोदाकाठच्या गावांतील असंख्य गोरगरीब कुटुंबांची घरेही कोसळून उद्ध्वस्त झाली. गावोगावे पाण्याखाली गेल्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावे लागले. या आपत्तीच्या काळात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी समाजभान आणि प्रकाशयात्री फाऊंडेशन गेल्या दहा दिवसांपासून अपार मेहनत घेत आहेत.
पूरपरिस्थितीत विस्थापित कुटुंबांना अन्नछत्राद्वारे भोजन पुरवण्यापासून जीवनावश्यक किराणा साहित्याचे वितरण समाजभानच्या स्वयंसेवकांकडून सातत्याने केले जात आहे. पूर ओसरल्यानंतर गावागावात घरांची पडझड, भिंतींचे ढासळणे आणि पाण्यामुळे झालेले नुकसान पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. हातावर पोट असणाऱ्या या कुटुंबांची दिवाळी अंधारात जाऊ नये, या भावनेतून समाजभानने पुढाकार घेतला आहे.
संस्थेकडून पूरग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी दहा हजार रुपये रोख मदत आणि किराणा साहित्य घरपोच देण्यात येत आहे. या उपक्रमाची सुरुवात समाजभानचे दादासाहेब थेटे यांनी स्वतःचा अर्धा पगार संस्थेकडे सुपूर्द करून केली आहे. तसेच जालना येथील उद्योजक सुनील रायठ्ठा यांनी एक लाख रुपयांची मदत, तर कोल्हापूरच्या आधार फाऊंडेशनने पन्नास हजार रुपये योगदान देऊन सामाजिक उत्तरदायित्वाची सुंदर उदाहरणे घालून दिली आहेत.
पूरामुळे उद्ध्वस्त झालेल्या गोदापट्ट्यातील 130 घरांना, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना, तसेच निराधार वृद्धांना दिवाळीपूर्वी मदत पोहोचवण्याचा निर्धार समाजभानने केला आहे. या कार्यात स्वयंसेवक अत्यंत समर्पणाने झटत असून, “समाजासाठी समाजच उभा राहतो, तेव्हाच बदल घडतो” या भावनेने हा उपक्रम लोकसहभागातून यशस्वी होत आहे.