आखाता’तील संघर्षाची दोन वर्ष
दोन वर्षापूर्वी म्हणजे ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने इस्राईलवर हल्ला करून इस्राईलच्या १२०० हून अधिक नागरिकांची हत्या करून २५१ नागरिकांचे अपहरण केले होते. हमासच्या या हल्ल्याला प्रतिउत्तर म्हणून इस्राईलने गाझा पट्टीवर हल्ला करून गाझा पट्टी अक्षरशः जमीनदोस्त केली. इस्राईल ने केलेल्या गाझापट्टीतील २३ लाख लोकसंख्येपेपैकी जवळपास सर्व लोक विस्थापित झाले आहेत. गाझात अन्न पाणी आणि सुविधांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. गाझा पट्टीत मदत साहित्य पोहचवण्यास ही इस्राईल बाधा आणत आहे. गाझापट्टीत प्रचंड उपासमार निर्माण झाली आहे. उपासमारीनेहजारो मुले कुपोषणग्रस्त झाली आहेत. गेल्या दोन वर्षात इस्राईलने केलेल्या हल्ल्यात पॅलेस्टाइनचे ६४ हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून त्यात १८ हजारांहून अधिक मुले आहे. या युद्धात इस्रायलने हमासचे २० हजारांहून अधिक दहशतवादी ठार केले आहेत. इस्राईलच्या हल्ल्यात गाझापट्टीत जखमी झालेल्या लोकांची संख्या दर महिन्याला सरासरी ६८०० इतकी वाढत आहे. या युद्धात इस्राईलचे हजारो नागरिक जखमी झाले आहेत. इस्राईलच्याही अनेक शहरांना हमासने टार्गेट केल्याने इस्राईलचीही दुरवस्था झाली आहे. इस्राईल – हमास युद्धाला आज दोन वर्ष पूर्ण झाली तरीही त्यांच्यातील संघर्ष संपलेला नाही. मागील वर्षी ८ ऑक्टोबर रोजी म्हणजे इस्राईल – हमास युद्धाला १ वर्ष पूर्ण होत असतानाच इस्राईलने लेबनॉनवर हल्ला केला होता. इस्राईलने लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यात लेबनॉन मधील हिजाबुल्ला या दहशतवादी संघटनेचा प्रमुख असलेल्या हसन नसरुल्ला हा ठार झाला होता. त्या अगोदर इस्राईलने लेबनॉनवर पेजर आणि वोकिटॉकी हल्ला केला होता. इस्राईलने लेबनॉनवर हल्ला करण्यामागचे कारण म्हणजे लेबनॉन हमासला करीत असलेले आर्थिक आणि लष्करी सहाय्य. लेबनॉन मधील हिजबुल्ले इस्राईल – हमास युद्धात हमासला आर्थिक आणि लष्करी सहाय्य पुरवत होते इतकेच नाही तर काही हिजबुल्ले प्रत्यक्ष युद्धातही सहभागी झाले होते त्यामुळे त्यांना धडा शिकवण्यासाठी इस्राईलने लेबनॉनवर हल्ला करून हीजबुल्लाना लक्ष केले होते. इस्राईल – हमास नंतर इस्राईल – लेबनॉन संघर्षाने जग चिंतेत पडले असतानाच या संघर्षात इराणने उडी घेऊन संघर्षाची व्याप्ती आणखी वाढवली. फक्त संघर्षाची व्याप्ती वाढवली नाही तर जगाची चिंताही वाढवली होती कारण इराण हा अरब देशातील किंबहुना इस्लामिक देशातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा देश आहे. इस्राईल हमास युद्धात इराणने अपेक्षित उडी घेतल्याने हा संघर्ष आणखी वाढणार हे स्पष्ट झाले. इस्राईल हमास युद्धात इराणने अपेक्षित उडी घेतली. इराणने इस्राईल हमास युद्धात उडी घेतल्याने इस्राईल आणि इराण यांच्यात युद्धाचा भडका उडाला. या युद्धात ही दोन्ही बाजूंनी मोठी वित्त आणि मनुष्य हानी झाली. या दोन देशाला तर युद्धाचा मोठा इतिहास आहे. १९८० सालच्या दशकात तर या दोन देशात कायम युद्धाच्या ठिणग्या पडत होत्या त्यामुळे या युद्धात इराण केंव्हाही उडी घेईल असे म्हंटले जात होते ते खरे ठरवत इराणने इस्राईलवर हल्ला करीत २०० हून अधिक क्षेपणास्त्रे डागली होती. अर्थात इस्राईलने या हल्ल्याचा यशस्वी बचाव केला. यात इस्राईलची म्हणावी तशी हानी झाली नसली तरी या हल्ल्याचा बदला घेतला जाईल असा इशारा इस्राईलने दिला आहे. हा इशारा खरा ठरवत इस्राईलने इराणवर क्षेपणास्त्रांचा मोठा हल्ला केला. हे युद्ध शिगेला पोहचले असताना अमेरिकेने मध्यस्ती केल्याने या युद्धाला काही काळ पूर्ण विराम मिळाला. या दोन्ही देशातील युद्ध काही काळ थांबले पण ते कायमस्वरूपी थांबले असे नाही. या दोन्ही देशात पुन्हा युद्धाला तोंड फुटू शकते. केवळ याच दोन देशातच नाही तर इस्राईल आणि त्यांच्या शेजारी असलेल्या अन्य मुस्लिम देशात युद्ध पेटू शकते. इस्राईल आणि अरब राष्ट्रातील या संघर्षाने जग दोन गटात विभागले गेले आहे. अमेरिका आणि युरोपातील काही देशांनी इस्राईलला पाठींबा दिला आहे तर जगातील मुस्लिम राष्ट्रे आणि युरोपातील काही राष्ट्रे अरब राष्ट्रांच्या पाठीशी उभी आहेत. अमेरिकेने इस्राईलला उघडपणे पाठिंबा दिल्याने इराणसह अन्य अरब राष्ट्रे इस्राईल प्रमाणे अमेरिकेलाही आपला शत्रू मानू लागली आहेत. अमेरिकेने आजवर प्रत्यक्ष युद्धात उतरून इस्राईलला साथ दिलेली नाही मात्र डोनाल्ड ट्रम्प हे विक्षिप्त आहेत. त्यांच्या मनात आले तर ते इस्राईलच्या बाजूने प्रत्यक्ष मैदानात उतरू शकतात आणि जर तसे झाले तर आजवर या युद्धात तटस्थ राहिलेले इजिप्त, जॉर्डन, सीरिया, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती हे अरब राष्ट्रे इराणला साथ देण्यासाठी मैदानात उतरील आणि जर तसे झाले तर ती तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात ठरेल म्हणूनच हा संघर्ष आणखी वाढू न देण्याची खबरदारी जगाने घ्यायला हवी.
-श्याम ठाणेदार