पंचमुखी महादेव मंदिरात आज सामूहिक दीपोत्सव
जालना/प्रतिनिधी/ दीपावलीच्या पावन पर्वावर सकारात्मकतेचा आणि मांगल्याचा संदेश देण्यासाठी श्री पंचमुखी महादेव मंदिरात शनिवार, दि. ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता भव्य ‘सामूहिक दीपोत्सव’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात प्रत्येकांच्या हस्ते तब्बल ४१०० दीप प्रज्वलित करण्यात येणार आहेत. सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या क्षणाचे साक्षीदार बनावे, असे आवाहन या उपक्रमाचे संयोजक श्लोक अग्रवाल आणि ॲड. महेश धन्नावत यांनी केले आहे.
सध्याच्या दुष्काळी व कठीण परिस्थितीमध्ये सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. अशा वातावरणात प्रत्येकाच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण व्हावा आणि सणाचा आनंद प्रत्येकापर्यंत पोहोचावा, या सामाजिक भावनेतून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या दीपोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे, उपस्थित सर्व भाविकांसह विशेषतः गोरगरीब व वंचित घटकांतील नागरिकांच्या हस्ते हे ४१०० दीप प्रज्वलित करण्यात येणार आहेत.
दिवाळी हा केवळ रोषणाईचा सण नसून परस्परांच्या आयुष्यातील अंधार दूर करण्याचा संकल्प आहे. दुष्काळाच्या संकटात सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू फुलावे आणि हा सण सर्वांसाठी सर्वसमावेशक ठरावा, हाच या आयोजनामागचा मूळ हेतू असल्याचे श्लोक अग्रवाल यांनी म्हटले आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाला प्रकाशाच्या उत्सवात सन्मानाने सहभागी करून घेत घेण्यात येत असून हा केवळ दिव्यांचा उत्सव नसून सामाजिक बांधिलकीची एक ज्योत असल्याचे ॲड. महेश धन्नावत यांनी सांगितले.
या मंगलमयी आणि विलोभनीय दीपोत्सवाला जालनेकरांनी सहकुटुंब मोठ्या संख्येने उपस्थित राहून या अद्वितीय क्षणाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन आयोजक श्लोक अग्रवाल आणि ॲड. महेश धन्नावत यांनी केले आहे.