Saturday, July 4, 2026
Homeऔरंगाबादछतावरील सौरऊर्जेस प्रोत्साहनासाठी  छत्रपती संभाजीनगरात फिरणार 'सूर्यरथ'

छतावरील सौरऊर्जेस प्रोत्साहनासाठी  छत्रपती संभाजीनगरात फिरणार ‘सूर्यरथ’

छतावरील सौरऊर्जेस प्रोत्साहनासाठी 

छत्रपती संभाजीनगरात फिरणार ‘सूर्यरथ’

छत्रपती संभाजीनगर : ‘पीएम-सूर्यघर मोफत वीज योजनेत जास्तीत जास्त घरांवर सौरऊर्जा पॅनेल बसवण्यास प्रोत्साहन देण्यासाठी ६ जुलै २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘सूर्यरथ’ या फिरत्या जनजागृती मोहिमेस प्रारंभ होणार आहे.

महावितरणच्या मिल कॉर्नर येथील परिमंडल कार्यालयात सकाळी ११ वाजता खासदार संदीपान भुमरे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन होईल. ‘नॅशनल सोलर एनर्जी फेडरेशन ऑफ इंडिया’द्वारे पीडब्ल्यूसी आणि एनर्जिवा व्हेंचर्स यांच्या सहकार्याने हा ‘सूर्यरथ’ सुरू केला जात आहे. ही मोहीम शासनाच्या ‘पीएम-सूर्य घर मोफत वीज योजना’चा एक भाग आहे. छतावरील सौरऊर्जा प्रणालीद्वारे १ कोटी घरांना मोफत वीज उपलब्ध करून देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

‘नॅशनल सोलर एनर्जी फेडरेशन ऑफ इंडिया’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्रह्मण्यम पुलिपाका म्हणाले, “छतावरील सौरऊर्जा प्रणाली बसवण्याची मोठी क्षमता असल्याने छत्रपती संभाजीनगरची निवड या मोहिमेसाठी विशेष शहर म्हणून करण्यात आली आहे. ‘सूर्यरथ’ नागरिकांपर्यंत पोहोचेल, त्यांना याचे फायदे समजावून सांगेल आणि सौर पॅनेल बसवण्याच्या प्रक्रियेची माहिती देईल.”

उद्घाटनानंतर हे वाहन सात दिवस छत्रपती संभाजीनगर शहरात फिरेल आणि रेल्वे स्टेशन, सेव्हनहिल, सूतगिरणी चौक, गजानन महाराज मंदिर रोड, बळीराम पाटील विद्यालय, ज्युबली पार्क, महानुभाव मंदिर, शहाबाजार, आझाद चौक तसेच ग्रामीण भागातील बाजारपेठा, रुग्णालये, शाळा, महाविद्यालये आणि निवासी परिसरांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी थांबेल.‍ हे फिरते वाहन मोफत सल्ला, सौर तंत्रज्ञानाचे प्रदर्शन आणि योजनेअंतर्गत उपलब्ध असलेल्या अनुदानाची व आर्थिक पर्यायांची माहिती देईल. एखादे घर या प्रणालीसाठी पात्र आहे का हे तपासण्यासाठी आणि बसवण्याबाबतच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी तज्ज्ञ तिथे उपलब्ध असतील. ७ जुलैपासून १० दिवसांसाठी क्रांती चौक उड्डाणपुलाखाली सौरऊर्जेबाबत जनजागृती करणारा कक्ष (बूथ) उभारला जाईल. येथे नागरिक पीएम-सूर्यघर मोफत वीज योजनेच्या माहितीसाठी तज्ज्ञ आणि विक्रेत्यांशी संपर्क साधू शकतील तसेच नोंदणी प्रक्रियेची सविस्तर माहिती घेऊ शकतील.

घरगुती वीजबिल कमी करणे आणि २०३० पर्यंत ५०० गिगावॅट अक्षय ऊर्जा निर्मितीचे भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यास हातभार लावणे हे सरकारच्या या ‘रूफटॉप सोलर’ (छतावरील सौरऊर्जा) योजनेचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments