Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादविधान भवनात कुत्रे, मांजर, डुकरे, बिबटे यांवर चर्चा पण माणसाच्या प्रश्नांना थारा...

विधान भवनात कुत्रे, मांजर, डुकरे, बिबटे यांवर चर्चा पण माणसाच्या प्रश्नांना थारा नाही

विधान भवनात कुत्रे, मांजर, डुकरे, बिबटे यांवर चर्चा पण माणसाच्या प्रश्नांना थारा नाही
प्रा. अविनाश डोळस व्याख्यानमालेत वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र राज्यचे उपाध्यक्ष ॲड. सर्वजीत बनसोडे यांचे प्रतिपादन
छ. संभाजीनगर/ विधानसभेच्या सभागृहात कुत्रे, मांजरे, बिबटे, डुक्कर, कबुतरे यावर तासनतास चर्चा होत आहे, परंतु माणसाच्या प्रश्नांना थारा राहिलेली नाही, माणसांच्या प्रश्नावर चर्चा होत नाही, विकासकामांवर चर्चा होत नाही, बेरोजगारीवर बोलल्या जात नाही, हे कृत्य लोकशाहीसाठी घातक असून लोकशाची होणारी थट्टा तात्काळ थांबवावी, असे प्रतिपादन अभ्यासक, तथा वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र राज्यचे उपाध्यक्ष ॲड. सर्वजीत बनसोडे यांनी केले.
ते (दि. १३ डिसेंबर २०२५ ) स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय, नागसेनवन, छ. संभाजीनगर (औरंगाबाद) येथे प्रा. अविनाश डोळस प्रतिष्ठान, औरंगाबाद यांच्या वतीने प्रा. अविनाश डोळस यांच्या जयंतीनिमित्त “भारतीय लोकशाहीसमोरील सद्य:स्थितीतील आव्हाने व उपाय” या विषयावर आयोजित व्याख्यानाच्या कार्यक्रमातुन बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. अविनाश डोळस प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. संजय मून हे  होते.
प्रास्ताविक करताना डॉ. प्रज्ञा साळवे म्हणाल्या की, प्रा. अविनाश डोळस यांनी एक जातीय राजकारणाची मानसिकता बदलविण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. प्रतिष्ठानच्या वतीने सातत्याने त्यांनी केलेल्या कार्यावर प्रकाश टाकण्याचे काम सुरू आहे.
पुढे बोलताना बनसोडे म्हणाले की, लोकशाही वाचली पाहिजे असे केवळ बोलून चालणार नाही, मोदी-शहा यांच्या विरोधात बोलण्याची कुणाची हिंमत नाही, बोलले तर त्याचा काटा काढल्याशिवाय ही व्यवस्था राहत नाही, देश अशा भयंकर परिस्थितून जात आहे जिथे लोकशाही संपुष्टात येऊन हुकूमशाही लागू होते की काय, अशी शंका आहे. साहित्यिक विचारवंत म्हणून घेणारे स्वतः कन्फुज आहेत, संविधानामध्ये बदल करणे सुरू झाले आहे, अनेक कलमांमध्ये बदल करणे सुरू झाले आहे विचारवंत केवळ सोशल माध्यमांतून संविधान वाचविण्यासाठी पोस्ट करीत आहोत. जनसुरक्षा कायदा हा लोकशाहीची हत्या करणारा आहे. पॉवर आणि पोझिशन मधील फरक आजही आपल्याला समजत नाही, हे मोठे दुर्दैव आहे. आपल्याला ब्राम्हणी व्यवस्था, मनुवादी उद्ध्वस्त करून लोकशाही, संविधानवादी व्यवस्था लागू करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असून त्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे लागेल. कारण केवळ बाळासाहेबच मनुवादी आणि आरएसएस विरुद्ध लढू शकतात, बाकीच्यामध्ये तेवढी ताकद नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या परिसरातील शिक्षक हा नागसेन व्हावा आणि विद्यार्थी मिलिंद व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली होती. जातीच्या पलीकडे जावून समतेचा विचार मांडणारे, जातीअंताच्या लढ्यामध्ये पुढाकार घेणारे आणि चळवळीची समीक्षा करणारे प्रा. अविनाश डोळस हे खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या अपेक्षेतील नागसेन होत, ज्यांनी समताधिष्ठित समाजव्यवस्था आणि लोकशाहीचे सामाजिकीकरण करण्यासाठी आयुष्यभर कार्य केले.
डॉ. संजय मुन बोलताना म्हणाले की, धर्मांध शक्तीविरोधात आपल्याला लढून लोकशाही बळकट करण्यासाठी व्यापक स्वरूपाचे जनआंदोलन उभे करावे लागेल. त्यासाठी आपल्याला जात या मानसिकतेतून बाहेर पडावे लागेल. प्रा. अविनाश डोळस सरांनी फुले आंबेडकर वादाची नव्याने मांडणी करून एकजातीय होऊ घातलेल्या रिपब्लिकन, आंबेडकरी चळवळीला बहुजातीय करण्याच्या प्रक्रियेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
सूत्रसंचालन प्रा. भारत शिरसाट यांनी केले तर आभार डॉ. किशोर साळवे यांनी मानले. यावेळी अनिल खरतडे, वंचित बहुजन आघाडीचे पश्चिम शहराध्यक्ष ॲड. पंकज बनसोडे, महिला आघाडीच्या कोमल हिवराळे, साधना पठारे, प्रा. डॉ. श्रीकिशन मोरे, डॉ. अर्चना गणवीर, डॉ. किशोर साळवे, पंडितराव तुपे, अमरदीप वानखडे, चंद्रकांत गणवीर आदी उपस्थित होते.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments