Monday, March 30, 2026
Homeअग्रलेखजागल्यांचा दिपस्तंभ : चंद्रकांत पाटणकर

जागल्यांचा दिपस्तंभ : चंद्रकांत पाटणकर

प्रति,
मा. संपादक
लेख प्रसिद्धीसाठी

जागल्यांचा दिपस्तंभ : चंद्रकांत पाटणकर

मराठी वुत्तपत्र लेखक संघ मुंबई म्हणजे वर्तमानपत्रातून संपादकीय पानावर निर्भीडपणे आणि पदरमोड करून पत्रे लिहिणाऱ्या सर्व वृत्तपत्र लेखकांचे विद्यापीठ होय. या विद्यापीठात आम्ही दर शनिवारी संध्याकाळी मुक्तचिंतन, अभ्यास शिबीर, वेगवेगळ्या स्पर्धा किंवा एखाद्या संभाव्य कार्यक्रमाची पूर्वतयारी करण्यासाठी गेली ५० वर्षे अनेकजण भेटत असतो. या विद्यापीठात समरस झालेला कार्यकर्ता लेखनात किंवा सामाजिक कार्यात दिवसेंदिवस परिपक्व होत जातो याची संस्थेच्या चळवळीच्या ७५ वर्षाच्या इतिहासाच्या वाटचालीत शेकडो उदाहरणे सापडतील. साधारण १९९० च्या दरम्यान पाटणकरांची आणि माझी ओळख झाली, ही पहिली भेट पुढे घट्ट मैत्रीत, बंधुत्वात रूपांतरित कधी झाली हे कळलेच नाही. योगायोगाने का होईना पाटणकर यांच्याशी विचारांची देवाणघेवाण घडली, संवाद, स्नेहबंध टिकला वारंवार होणाऱ्या भेटी, दूरध्वनीवरील संवाद यामुळे आमचा स्नेहबंध अधिक दृढ झाला. अंगी स्पष्टपणा,निर्भीड, दिलदार,प्रेमळ मनाचे, एक ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक आणि एक ज्येष्ठ कडवट शिवसैनिक म्हणजेच चंद्रकांत वामनराव पाटणकर ! २९ नोव्हेंबर २०२५ ला त्यांचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे होत असताना  पाटणकर यांचे  “माझी पत्रपंढरी” भाग तिसरा गौरव ग्रंथ म्हणून प्रकाशित होत आहे. आयुष्याच्या ७५ वर्षात वाटचालीत ५२ वर्षे त्यांनी समाजासाठी दिली आहेत. आपण किती वर्ष जगलो ! याचे मोजमाप करताना,कसे जगलो ? आणि कुणासाठी जगलो ? प्रत्येकाचे मूल्यांकन यानिमित्ताने समाज करीत असतो. ३५ वर्षे पाटणकर साहेबांच्या सहवासात मी व्यतित केलेल्या क्षणांचा मागोवा घेताना प्रामुख्याने एक लक्षात आले ते म्हणजे हा माणूस समाजासाठी ७० टक्के जगला आहे. मितभाषी परंतु मोजकेच आणि आवश्यक बोलणारे, परखड आणि मुद्देसूद भूमिका मांडणारे, निर्भीडपणे सातत्याने अभ्यासपूर्ण वर्तमानपत्रातून पत्रे लिहिणारे आणि संस्थेसाठी स्वतःची मूठ सतत मोकळी करणारे असेच त्यांचे व्यक्तिमत्व माझ्या आणि माझ्या इतर सहकाऱ्यांच्या मनात कोरलेले आहे. मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही, केला तर तो फार पुढे जाऊ शकत नाही, अशी बोंबाबोंब करणाऱ्यांनी चंद्रकांत पाटणकर यांचे वडील स्व. वामनराव आणि चंद्रकांत पाटणकर यांचा व्यवसाय आणि चरित्र त्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त समजून घ्यावे लागेल. अर्थात चंद्रकांत पाटणकर यांना मुळातच अन्याय-अत्याचाराची चीड असल्याने लढवय्या व धाडसी स्वभावाचे समाजसुधारक म्हणूनच त्यांची जडणघडण संस्कारक्षम वयातच झाली. सामाजिक विषमतेविरुद्ध अनेक विषयावर लेखन करणारे निर्भीड व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ख्याती आहे. आपला वडिलोपार्जित व्यवसाय सचोटीने चालवताना पाटणकरांनी  व्यावहारिकदृष्ट्या उच्च शिक्षण घेऊनही एक सामान्य मनुष्य म्हणून तत्त्वनिष्ठा, कर्मनिष्ठा, जिद्द, चिकाटी, प्रखर बुद्धिमत्ता आणि ज्वलंत आत्मविश्वास आणि साहसी स्वभाव यांच्या जोरावर आयुष्यात किती पुढे जाऊ शकतो, एवढेच नव्हे तर समाजाचे आपण काही देणे लागतो ही कृतज्ञ भावना पाटणकरांनी आयुष्यभर जोपासली.
वृत्तपत्र लेखकाला लेखनासाठी दररोजच्या वर्तमानपत्रांसह इतरही अवांतर वाचन करावे लागते. हे वाचन करताना समाजाच्या व्यथा वेदना बातमीत आणि रोजच्या जीवनात शोधाव्या लागतात. हाती घेतलेल्या विषयाचा अभ्यास करून तो नेमक्या शब्दात मांडायचा आणि तडीस नेण्यासाठी सबधितांच्याकडे त्याचा निर्णय होईपर्यंत गप्प न बसता पाठपुरावा करायचा हा पाटणकरांचा खाक्या. आपल्या कार्यशैलीने पाटणकरांनी लेखणीद्वारे अनेक समस्यांना वाचा फोडून न्याय मिळवून दिला आहे.
दादर- माहीम म्हणजे मराठी माणसांचा बुलंद आवाज. अत्रे, ठाकरे,  डांगे, बापट  या माणसांची ही कर्मभूमी.  देदीप्यमान इतिहास घडवणाऱ्या या महान विभुतींचा आवाज, त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे पोवाडे वयाच्या पंधरा-सोळा वर्षांपासूनच शिवाजी पार्क भागात चंद्रकांत पाटणकर यांनी अनेकदा ऐकले होते. त्यामुळे कायम अस्वस्थ असलेले त्यांचे मन समाजसेवेसाठी तयार होत गेले. चार अक्षरी शिवसेना, पाच अक्षरी बाळासाहेब, सहा अक्षरी मराठी माणूस हे ध्येयवादी असलेले विचार पाटणकर यांनी पुरेपूर आत्मसात केले आहेत. शिवसेनेची स्थापना होऊन १६ वर्षे झाली होती. चंद्रकांत पाटणकर ऐन उमेदीत असताना शिवसेनाप्रमुख  बाळासाहेबांच्या रोखठोक विचारांनी, रांगड्या भाषेने आणि महत्त्वाचे म्हणजे ‘ ‘मऱ्हाटी बाणा’, ‘मऱ्हाटी अस्मिता’ चेतवणाऱ्या त्यांच्या प्रखर वक्तृत्वाने  लक्षावधी तरुण शिवसेनेकडे आकृष्ट झाले होते,  त्यातले एक म्हणजे आपले चंद्रकांत पाटणकर  ! पाटणकर तरुण वयात नव्हे, तर चक्क बालवयातच शिवसेनेशी जोडले गेले होते. कुणीही न सांगता दादर- माहीम- माटुंगा विभागातील प्रत्येक घराघरात शिवसेना पोहोचविण्याठी, गेल्या ६० वर्षात झालेल्या प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेचा लोकप्रतिनिधी निवडून आणण्यासाठी, तो खासदार-आमदार-नगरसेवक निवडून आल्यानंतर लोकांचे प्रश्न घेऊन सोडविण्यासाठी वा वर्तमानपत्रातून प्रकाशित झालेले आपल्या पत्राची झेरॉक्स घेऊन त्यांच्यापर्यंत जाणे, आंदोलन करताना आपण जखमी होऊ किंवा आपल्यावर पोलीस केस होईल याची तमा न बाळगता शिवसेनेच्या झालेल्या प्रत्येक आंदोलनात सहभागी होणे या सर्वांमध्ये पाटणकर अग्रभागी होते. त्यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे मुंबईतील ज्या शिवसैनिकांना नावाने ओळखत असत त्यात माहिमचा तरुण चंदू हा शिवसैनिक होता. एवढ्या राजकीय उलथापालथी, कमालीची स्थित्यंतरे होऊनही मूळ शिवसेनेबरोबर राहिली आहेत ! केवढी ही तत्त्वनिष्ठा ! केवढे हे शिवसेनेवरचे प्रेम ! असे शिवसैनिक जोपर्यंत शिवसेनेकडे आहेत, तोपर्यंत या महान संघटनेला सोन्याचे दिवस आहेत, यात काही शंका नाही. चंद्रकांत पाटणकर यांनी शिवसेना आत्मसात केल्यापासून पडद्याआड राहून कोणत्याही पदाची अभिलाषा न धरता प्रसंगी आलेली संधी नाकारून एक सामान्य शिवसैनिक म्हणून संघटनेसाठी सातत्याने निष्ठेने आजपर्यंत काम केले. पाटणकर यांची  मानवसेवेची तळमळ पाहून आजवर अनेक जण प्रभावित झाले आहेत, अनेक संस्थानी त्यांच्या परखड लेखनाची, दातृत्वाची, समाजसेवेची दखल घेऊन सन्मामाने पुरस्कार प्रदान करून गौरविले आहे. नजरेत आत्मविश्वास, मनात ध्येय आणि ओठात प्रेमाचा गोडवा असला की, यशाची हिमशिखरे साद घालतात हेच त्यांच्या यशस्वी वाटचालीचे गमक आहे. परिस्थितीशी झगडून पुढे आलेली माणसे नेहमी जपली पाहिजेत. कारण जीवनाचे तत्त्वज्ञान ही माणसे नुसती शिकलेली असे नव्हे तर जगलेलीही असतात. पाटणकर आज वयाचा अमृतमहोत्सव साजरा करीत आहेत. वाढते वय सोडले तर प्रकृती उत्तम आहे. त्यांच्या पत्नीचे अबाधित सहकार्य हे त्यांच्या यशाचे मुख्य कारण आहे हे ते स्वतः नेहमी सांगतात. दोन विवाहित मुली, जावई, मुलगा, सून आणि नातवंडे हा प्रेमळ परिवार त्यांच्या भोवती आहे. आज त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान म्हणजे खऱ्या आयुष्याचे यश. पूर्वी ‘सुखी माणसाचा सदरा’ ही गोष्ट आपण वाचली असेलच. पण मला वाटते, असा समाधानी आणि सेवाभावी माणूस जवळ असणे, त्याच्याशी संवाद साधणे हेच आजच्या काळातील भाग्य आहे. पाटणकरांनी  बेधडक लिहिले आणि त्याचा पाठपुरावाही त्याच ताकदीने केला, माहीम येथील टँकर पाणी चोरी, माहीम किल्ल्याची दुरावस्था, त्रंबकेश्वर देणगी प्रकरण याची दखल संबंधित यंत्रणांनी घेतली होती. मानवाच्या जीवनात अमृतमहोत्सव म्हणजेच ७५ वर्षे पूर्ण होणे, हा केवळ कालगणनेतील एक ठराविक टप्पा नसतो. तो असतो अनुभवांचा, विचारांचा, कर्तृत्वाचा आणि समाजाशी जोडलेल्या नात्यांचा अमृतकाळ.यानिमित्ताने पाटणकर यांना मनापासून शुभेच्छा ! त्यांची ही अविरत दमदार वाटचाल अशीच पुढील आयुष्यात निर्विघ्न आरोग्यमयी व्हावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. त्यांच्या हातातील लेखणीतून उत्तरोत्तर समाजप्रबोधनात्मक लेखन प्रसिद्ध होवो.

रवींद्र मालुसरे

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments