Tuesday, March 31, 2026
Homeऔरंगाबादसंविधान : भारतीय लोकशाहीचे आत्मभान आणि भविष्याचा मार्गदर्शक

संविधान : भारतीय लोकशाहीचे आत्मभान आणि भविष्याचा मार्गदर्शक

संविधान : भारतीय लोकशाहीचे आत्मभान आणि भविष्याचा मार्गदर्शक

   भारताचा इतिहास हा केवळ साम्राज्यांच्या उदय-पतनाचा किंवा युद्धांच्या नोंदींचा इतिहास नाही, तर मानवी मूल्यांचा, स्वातंत्र्याचा, सामाजिक परिवर्तनाचा आणि न्याय्य समाजाच्या शोधाचा इतिहास आहे. या इतिहासात सर्वात मोठा आणि शाश्वत टप्पा म्हणजे भारतीय संविधानाची निर्मिती आणि त्यानिमित्त घडलेले बौद्धिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक परिवर्तन. म्हणूनच २६ नोव्हेंबर हा दिवस केवळ एक औपचारिक स्मरणदिन नाही, तर भारतीय प्रजासत्ताकाच्या अस्तित्वाचा आत्मा, तत्त्वज्ञान आणि लोकशाहीच्या भविष्याचा दीपस्तंभ आहे. संविधान म्हणजे फक्त कायद्यांचा संग्रह नाही, तर राष्ट्राच्या मूल्यांचे, संघर्षांचे आणि आकांक्षांचे प्रतिबिंब आहे. यामुळेच संविधान हा दस्तऐवज नसून तो विचारप्रवाह आहे. शासनव्यवस्थेला दिशा देणारा, समाजाला मूल्याधिष्ठित करणारा आणि व्यक्तीला अधिकार व जबाबदारी यांच्यातील संतुलन समजावून देणारा एक जिवंत करार आहे. म्हणूनच संविधान दिन हा स्मरणाचा दिवस नसून आत्मपरीक्षणाचा दिवस आहे. आपण नागरिक म्हणून संविधानाच्या आत्म्याशी किती प्रामाणिक आहोत? आपण त्या मूल्यांना जपतो आहोत की विसरतो आहोत? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, संविधानिक लोकशाही ही केवळ शासनप्रणाली आहे की ती आपल्या जीवनपद्धतीचा, संस्कृतीचा अविभाज्य भाग बनली आहे? हे बघणे आवश्यक आहे.

भारतीय संविधानाची निर्मिती ही केवळ कायदेविषयक प्रक्रिया नव्हती, तर ती विवेक, अध्ययन, संशोधन, संवाद, मतभेद आणि सामूहिक संमती यांच्या अनोख्या प्रवासातून साकारली गेली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली २८४ सदस्यीय घटनासभा जवळपास २ वर्षे ११ महिने १८ दिवस या कार्यात संलग्न होती. परंतु केवळ कालावधी महत्त्वाचा नाही, तर त्या प्रक्रियेचा बौद्धिक दर्जा, तर्कसंगतता आणि भविष्यदर्शी दृष्टिकोन व्यक्तिला चकित करणारा आहे. जगभरातील ६० हून अधिक देशांचे संविधान, ब्रिटिश संसदीय परंपरा, अमेरिकेचे मूलभूत अधिकार, फ्रेंच क्रांतीची स्वातंत्र्य-समानता-बंधुता तत्त्वे आणि बौद्ध चिंतनातील समाजकल्याण हे सर्व भारतीय समाजशास्त्रीय संदर्भात नव्याने व्याख्यायित झाले. संविधान केवळ शासनाचा पाया नाही, तर भारतीय समाजरचनेतील ऐतिहासिक विषमता, जात, वर्ग, धर्म, लिंग विषमता आणि सामाजिक अन्याय यांना आव्हान देणारी परिवर्तनसूचक क्रांती आहे. म्हणूनच संविधान हा कायदा नसून समतावादी सामाजिक क्रांतीचा मार्गदर्शक आहे.

संविधानाच्या प्रस्ताविकेत व्यक्त झालेली “स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय” ही मूल्ये ही केवळ शब्द नाहीत, तर नागरिकांनी जगावे असे जीवनसूत्र आहेत. प्रस्तावना म्हणजे संविधानाचे हृदय, ज्यातून राष्ट्राची आत्मा ओतप्रोत भरलेली आहे. सामाजिक न्याय म्हणजे केवळ कायद्याने समानता नव्हे, तर व्यक्तीला समान संधी मिळावी ही जबाबदारी आहे. आर्थिक न्याय म्हणजे विकासाची फळे सर्वांपर्यंत पोहोचविण्याची यंत्रणा, तर राजकीय न्याय म्हणजे प्रत्येक नागरिकाला शासन प्रक्रियेत सहभाग देणे. आपल्या संविधानाने याच दृष्टीने सार्वत्रिक प्रौढ मताधिकार दिला आहे. तोही जात, धर्म, लिंग किंवा संपत्ती यांवर आधारित भेदभाव न करता. ही भारताच्या प्रगल्भ सामाजिक मनोवृत्तीची आणि समावेशकतेची साक्ष देणारी घटना होती. भारतीय संविधानाची समाजशास्त्रीय ताकद म्हणजे त्याचे धर्मनिरपेक्ष तत्त्व होय. धर्मनिरपेक्षता याचा अर्थ धर्मविरोध नव्हे, तर सर्व धर्मांना समान सन्मान व स्वातंत्र्य देणे. आपल्या समाजात धर्माचा प्रभाव केवळ श्रद्धेपुरता मर्यादित नसून सामाजिक ओळख, वर्तन, नातेसंबंध आणि संस्कार यांवर तो खोलवर परिणाम करतो. अशा बहुविध धार्मिक संरचनेच्या राष्ट्रात संविधानाने धर्म आणि शासन यात योग्य अंतर ठेवले, राज्य नागरिकांशी धर्माधारित भेदभाव करणार नाही. म्हणूनच धर्मनिरपेक्षता ही संकल्पना ऐतिहासिक दृष्टीने लोकशाही टिकवण्यासाठी आवश्यक आहे. तिचा उपयोग फाटे पाडण्यासाठी नव्हे, तर एकत्र आणण्यासाठी होणे आवश्यक आहे.

भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार हे नागरिकांच्या स्वातंत्र्याचे किल्ले आहेत. अभिव्यक्तिस्वातंत्र्य, समानतेचा अधिकार, जीवन व स्वातंत्र्याचा अधिकार, शैक्षणिक व सांस्कृतिक अधिकार, शोषणविरोधी अधिकार हे सर्व व्यक्तीच्या सन्मानाचे आधारस्तंभ आहेत. समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून या अधिकारांनी समाजातील वंचित, दुर्बल, स्त्री, आदिवासी, दलित आणि अल्पसंख्याक समुदायांना सामर्थ्य दिले. हे अधिकार लोकशाहीचा पाया आहेत, परंतु त्याचवेळी संविधानाने मूलभूत कर्तव्यांची कल्पना मांडून संतुलन निर्माण केले. केवळ अधिकार मागणे नव्हे, तर समाज व राष्ट्राबद्दल कर्तव्य पार पाडणे हे नागरिकतेचे परिपक्व रूप आहे. परंतु संविधान ही स्थिर संकल्पना नाही. ती परिस्थितीनुसार विकसित होणारी, बदल स्वीकारणारी सजीव प्रक्रिया आहे. म्हणूनच दुरुस्त्या या संविधानाचे सामर्थ्य आहेत. न्यायालयीन व्याख्या, लोकसंख्येतील बदल, तंत्रज्ञानातील प्रगती, आर्थिक स्वरूपातील परिवर्तन या सर्व घटकांमुळे संविधानाने स्वतःला वेळोवेळी सुधारत ठेवले आहे. “बदलता समाज – जिवंत संविधान” ही संकल्पना भारताच्या भविष्याचे मार्गदर्शन करते.

संविधान दिन हा इतिहासाचे उदात्तीकरण करण्याचा दिवस नाही, तर वर्तमानाला प्रश्न विचारण्याचा दिवस आहे. आपण संविधानातील मूल्यांना मान देतो आहोत की त्यांच्या विरोधी वागतो आहोत? समाज माध्यमे, राजकीय वाद, ध्रुवीकरण, अंधश्रद्धा, जातीय-धर्मीय दुभंग, स्त्रीविरोध, पर्यावरणीय संकट, डिजिटल असमानता, बेरोजगारी, गरीबी या सर्व प्रश्नांची उत्तरे संविधानाने दिली आहेत, परंतु आपण त्या उत्तरांना कृतीत अंमलात आणतो आहोत का? संविधानाने नागरिकांना मोकळे विचार करायला शिकवले, पण आज विचार व्यक्त करणे आणि असहमती नोंदविणे ही एक आव्हानात्मक प्रक्रिया ठरत आहे. अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा अर्थ आहे तर्कशुद्धतेने प्रश्न विचारणे, परंतु आज मतप्रदर्शन हे भावना, असहिष्णुता आणि ध्रुवीकरणाच्या भोवऱ्यात अडकलेले दिसते. अशा वेळी संविधान केवळ पानांवर नाही, तर विचारांमध्ये जिवंत राहिले पाहिजे. आजची युवा पिढी मोठ्या शक्यता, वेग, तंत्रज्ञान आणि जागतिक दृष्टिकोनासह वाढते आहे. परंतु त्याचवेळी माहितीचा प्रचंड मारा, मूल्यसंघर्ष, ओळखांचे राजकारण, रोजगाराची असुरक्षा आणि दिशाहीनता यामुळे तिच्यासाठी संविधानाचे मार्गदर्शन आणखी महत्त्वाचे ठरते. कारण संविधानानेच तिला समानता, संधी, सन्मान, अभिव्यक्ती आणि प्रगतीची हमी दिली आहे. त्यामुळे संविधान दिन हा केवळ अभ्यासक्रमातील घटक नसून पुढील पिढीच्या भविष्याचे अधिष्ठान ठरायला हवा.

भारतीय संविधानाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे सामाजिक न्यायाची बांधिलकी. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या-विमुक्त जमाती, इतर मागासवर्ग, स्त्रिया, अपंग, धार्मिक-अल्पसंख्याक आणि वंचित घटकांसाठी दिलेल्या विशेष तरतुदी ही केवळ कलमे नाहीत तर त्या भारतातील ऐतिहासिक विषमता आणि सामाजिक जखमांचे उपचार आहेत. समता म्हणजे सर्वांना सारखे वागवणे नव्हे, तर मागे राहिलेल्यांना पुढे आणण्याची जबाबदारी स्वीकारणे. म्हणूनच सामाजिक न्याय हा संविधानाचा भावनिक केंद्रबिंदू आहे, जो एका समतामूलक समाजाच्या दिशेने वाटचाल करतो. संविधान दिनाचा खरा अर्थ समजून घेताना हे महत्त्वाचे ठरते की संविधान नागरिकांना फक्त हक्क देत नाही, तर जबाबदार नागरिकत्व शिकवते. संविधानाने विचारमुक्तता दिली आहे, परंतु त्याचवेळी संवाद, तर्क, वैज्ञानिक दृष्टिकोन, शांत सहअस्तित्व आणि सांस्कृतिक विविधतेचा सन्मान करण्याचा मार्ग दाखवला आहे. संविधान मूल्यांचे संरक्षण करते, पण एका मूल्याच्या नावाखाली दुसऱ्या मूल्याचे दमन करण्याचा अधिकार कोणालाही देत नाही. म्हणूनच संविधानाचा आत्मा जपणे ही प्रत्येक नागरिकाची आणि संस्थेची जबाबदारी आहे. आजच्या सामाजिक वास्तवात संविधानावरील विश्वास हे लोकशाहीचे ऑक्सिजन आहे. विश्वास नष्ट झाला तर लोकशाहीचे अस्तित्व धोक्यात येते. म्हणून संविधान दिन अनुभवताना हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की संविधान फक्त न्यायालयांचे पुस्तक नाही, तर आपल्या नागरिकतेचे तत्त्वज्ञान आहे. राष्ट्राच्या वाढीचा मार्ग संविधानाच्या चौकटीतून जातो, आणि टिकाऊ विकास, सामाजिक सलोखा, लोकशाही मूल्यांचा सन्मान आणि सहजीवन यांना संविधानाचे मार्गदर्शन अनिवार्य आहे.

शेवटी, संविधानाने भारताला केवळ शासनव्यवस्था दिली नाही, तर स्वाभिमान, नागरिकत्व, अधिकार, समानता, न्याय आणि मानवी मूल्यांची दिशा दिली. त्यामुळे संविधान दिन हा साजरा करण्याचा दिवस आहे, पण तो साजरा करण्याची पद्धत केवळ कार्यक्रम, भाषणे किंवा औपचारिकता नसावी; तर आत्मपरीक्षण, अध्ययन, संवाद, तर्क, संवेदनशीलता आणि जबाबदार आचरणातून संविधान जिवंत ठेवण्याची प्रतिबद्धता असावी. कारण संविधान जिवंत आहे ते आपल्या विचारांमध्ये, वागणुकीत, संघर्षात, सामाजिक चळवळींमध्ये, न्यायालयात, संसदेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एका जागरूक, संवेदनशील नागरिकाच्या मनात. संविधान म्हणजे देशाचा आत्मा आणि तो आत्मा जिवंत राहिला पाहिजे, कारण संविधान वाचल्याने नाही, तर जगल्याने लोकशाही मजबूत होते.

-डॉ. राजेंद्र बगाटे

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments