Wednesday, April 1, 2026
Homeऔरंगाबादप्रत्येकाला जीवन जगण्याचा तेवढाच अधिकार?

प्रत्येकाला जीवन जगण्याचा तेवढाच अधिकार?

प्रत्येकाला जीवन जगण्याचा तेवढाच अधिकार?

         आज न्यायालयात अनगिनत खटले सुरु आहेत. एवढे खटले सुरु आहेत की त्या खटल्याला न्याय द्यायला व पक्षकारांची बाजू ऐकून घ्यायला न्यायाधीशांना पुरेसा वेळ नाही. त्यामुळंच तारीखवर तारीख चालत असते. त्यातच रोजच्यारोज नवनवीन खटले दाखल होत असतात.
          म्हणतात की सुज्ञ माणसानं न्यायालयाची पायरी चढूच नये. न्यायालयाच्या मागाहून जावं. परंतु पुढून जावू नये. त्याचं कारण आहे, न्यायालयाची वेळखावू व खर्चिक असलेली प्रवृत्ती. ती खर्चिक झाली वकील नावाच्या व्यक्तींमुळं. आजचे वकील न्यायालयाच्या माध्यमातून आपलं पोट भरण्याचं काम करतात. ज्यातून पक्षकाराला न्याय मिळत नाही. त्यातच आजच्या काळात वकीलांच्या फौजेपुढं गुन्ह्यांचं परिवर्तन होतं व चांगले चांगले अट्टल गुन्हेगार मोकळे सुटतात. अत्याचार झालेल्या व्यक्तींना न्याय मिळत नाही. तरीही न्यायालयात लोकं जात असतात. कारण लोकांचा अजूनही न्यायालयावर विश्वास आहे. ज्या गोष्टीवर न्याय इतर ठिकाणाहून मिळत नाही. त्या गोष्टीवर न्यायालयाच्या माध्यमातून न्याय मिळू शकतो. हा लोकांचा विश्वास. त्यामुळंच न्यायालयाची प्रक्रिया वेळखावू व खर्चिक असली तरी लोकं न्यायालयात जात असतात व खटले भांडत असतात.
         न्यायालय हे आपल्या आईवडीलांसारखं आहे विश्वासाच्या बाबतीत. ज्यांचा विश्वास न्यायालयावर नाही. त्यांचा विश्वास हा आईवडीलांवरही नाही. असा होतो. अन् ज्यांचा विश्वास आपल्या आईवडीलांवर असतो. त्यांचा विश्वास न्यायालयावरही असतो. परंतु ज्याप्रमाणे काही लोकं आपल्या आईवडीलांना सोडून जातात. त्याप्रमाणे काही लोकं न्यायालयावरही विश्वास ठेवत नाहीत. त्यातच अलिकडील काळात लोकं संयमी राहिलेले नाहीत. ते उतावीळ झालेले आहेत. त्यांना कोणत्याही गोष्टीचा परिणाम हा लवकर दिसायला हवा. वाट पाहाविशी वाटत नाही. शिवाय अशावेळेस न्यायालयात लागणाऱ्या वेळेला ते दोष देवून मोकळे होत असतात. कधीकधी न्यायालयाच्या माध्यमातून चांगले चांगले गुन्हेगार सुटतात. त्यामुळंही लोकांचा न्यायालयावरचा विश्वास तुटतो व न्यायालयावर अविश्वास निर्माण होतो. परंतु जेव्हा बाहेरच्या जगतात माणूस न्यायापासून वंचीत राहतो. तेव्हा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष का होईना, न्याय मागण्यासाठी न्यायालयात जावंच लागतं.
         महत्वपुर्ण बाब ही लक्षात घेण्यासारखी आहे की कोणी कितीही मात्तबर असला वा कोणी कितीही श्रीमंत असला तरी न्यायालय त्याच्या कलानं चालत नाही. न्यायालयाच्या माध्यमातून गरीब-श्रीमंत, लहान-मोठा, स्री-पुरुष, जीवजंतू हे कोणीच सुटत नाही. परंतु असे असले तरी आजच्या काळात न्याय हा श्रीमंतांची मक्तेदारी ठरत चालला आहे. पैसा फेक, तमाशा देख. ही वृत्ती न्यायालयात शिरत आहे. ज्याचेजवळ जास्त पैसा तो मात्तबर वकीलांची फौज न्यायालयात उभी करुन न्याय मिळवून घेत आहे. त्यातच काही काही प्रकरणात न्यायाधीशही विकले जातात. अशा प्रकारच्या बातम्या प्रकाशित होत आहेत. शिवाय आता न्याय मिळविणे सोपे राहिलेले नाही. कायद्याचा सामान्य लोकांना अभ्यास नसल्यानं त्यांच्यावर अन्याय झाल्यावर त्यांना न्याय मिळविण्यासाठी वकील करावाच लागतो. जो वकील आपले शुल्क मोठ्यात मोठे ठेवतो. ज्यात आरोपीलाही आपल्या आरोपाचं खंडण करण्याची मोकळीक असते. तोही वकील करतोच. अन् तो जर अति श्रीमंत असेल तर मोठ्यात मोठी रक्कम देवून चांगला वकील करतो. ज्यातून खोटे व बनावट पुरावे तयार केले जातात. ते सादर केले जातात. एवढंच नाही तर सरकारी वकीलही मॅनेज केले जातात. अन् त्यातूनही सुटका नाहीच होत असेल तर न्यायाधीश सकट सर्वांचा भाव केला जातो. आता तर श्रीमंतांसाठी न्यायालय रात्रीही उघडले जातात. परंतु असं असलं तरी बऱ्याचशा खटल्यात सामान्यांना नक्कीच न्याय मिळतो.
         जय पराजय ह्या नाण्याच्या दोन बाजू. युद्धात जसा जय पराजय होतो. तसाच खटल्यातही जय पराजय ठरलेलाच आहे. जरी एखाद्या सामान्य व्यक्तीवर अन्याय झाला आणि त्याची बाजू जर सत्य असेल आणि त्याला न्यायालयाच्या माध्यमातून न्याय मिळाला नसेल तरी त्याला न्याय मिळत नाही असे नाही. त्यालाही न्याय हा मिळतोच. तो न्याय देतो निसर्ग. कालांतरानं निसर्ग हा अशी अवकळा अत्याचार करणाऱ्या समुहावर तयार करतो की त्या अवकळेतून अत्याचार करणारा व्यक्ती सुटूच शकत नाही. त्यातच आपलेच असे अहित का झाले? यासाठी विचार करायलाही पुरेशी सवड मिळत नाही.
         निसर्ग……. निसर्गाच्या दरबारात न्याय आहे, अन्याय नाही. न्यायाच्या दृष्टिकोनातून मागे वळून पाहिल्यास अन्याय करणाऱ्या कुटूंबातील जबाबदार व्यक्ती कधी साप चावून मरतो तर कधी कोणत्याही कारणानं. कारण निसर्ग अशा अन्याय अत्याचारावर वाचा फोडण्यासाठीच कार्य करीत असतो.
         न्यायाच्या दृष्टिकोनातून जरा मागे वळून आपला इतिहास तपासून पाहिला असता आपल्याला हेच जाणवेल की वेळ लागला तर न्याय मिळाला. ज्यावेळेस हस्तीनापूरात युद्ध झालं. तेव्हा कितीतरी वीर असलेल्या कौरवांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यातच अफाट सैन्य असलेला औरंगजेब हताश होवून मरण पावला. तो जिंकू शकला नाही. तसाच ज्यांच्या शासनकाळात कधीच सुर्य मावळत नव्हता. त्या ब्रिटनची सत्ता आज कुठेच दिसत नाही. न्याय अन्यायातून विचार केल्यास इथे कितीतरी मोठमोठी सामाज्र पत्त्यासारखी नष्ट झालीत.
         होय, अत्याचार हा दुर्बलावर होतो. कधीही वाघ हा शेळ्या, मेंढ्यांना खातो. याचा अर्थ असा नाही की वाघाला कोणी मारत नाही. वाघाचीही शिकार होते वा ते म्हातारं झालं आणि चालू शकत नसलं तर त्याचेवर शेकडो मुंग्या त्याच्या जीवंतपणीच हमला करुन त्याला मारुन टाकतात. त्यावेळेस तो स्वतःला वाचविण्यासाठी त्यांचा प्रतिकार करु शकत नाही. कारण तो असहाय्य असतो. त्यात ताकद नसते तेवढी. त्या मुंग्या म्हणजेच त्यानं त्यांच्या आयुष्यात स्वतःचं अन्न म्हणून खाण्यासाठी त्यानं मारलेली कितीतरी जीवं असतात. मुंग्या रुपानं दुसऱ्यांदा पुनर्जन्म घेवून आलेल्या असतात.
         विशेष म्हणजे माणसाचेही असेच हाल होत असतात न्याय अन्यायाच्या माध्यमातून. आज न्यायावर अन्याय जरी जिंकत असेल तरी ही जीत जास्त दिवस टिकत नाही. लवकरच अन्यायावर न्याय शिरजोर होण्यासाठी अशी पावलं उचलतोच. ज्यातून अन्याय हरतो व न्याय जिंकतो. त्यामुळंच न्यायालयावर सर्वांनी विश्वास ठेवावाच. कारण न्यायालयात जरी कदाचित वकीलांमुळं विजय मिळाला नसला तरी अन्याय झालेल्या व्यक्तींना न्याय हा मिळतोच. तो न्याय निसर्ग मिळवून देतो. वाघावर जसा मुंग्यांचा हमला होतो तसा. एक ना एक दिवस शेळ्या मेंढ्यांनाही न्याय मिळतोच हे सत्य आहे. फक्त त्यासाठी संयम ठेवावा लागतो.
        महत्वाचं सांगायचं झाल्यास न्यायावर अन्यायानं जरी न्यायालयामार्फत विजय मिळविलेला असला तरी अन्याय कधीच शिरजोर होत नाही. निसर्ग अन्यायाला शिरजोर होवू देत नाही. तो कधी ना कधी अन्यायाला ध्वस्त करतो. त्यामुळंच कोणीही असं समजू नये की आपल्याला न्याय मिळत नाही. न्याय हा मिळतोच आपल्याला कोणत्या ना कोणत्या माध्यमातून. कधी आपल्या मुलांवर चांगले संस्कार दिसून. कधी आपले आरोग्य सुदृढ राहून तर कधी आपला उत्तर कालखंड अर्थात म्हातारपण चांगले सुखात जावून. परंतु अन्याय करणाऱ्या व्यक्तींचा जर इतिहास पडताळून पाहिला तर त्याचे घरात सर्वांचं आरोग्य खराब असतं. त्यातच अशा घरात अन्याय करणाऱ्या व्यक्तीचं म्हातारपण दुर्दैवात जातं. बिचाऱ्यांचं म्हातारपण कष्टप्रद जातं व त्याची सेवा करायलाही कोणीच उरत नाही. अशावेळेस मरण यातना होतात त्याला. मग ब्रम्हांड आठवतं. मागील दिवस आठवतात. पश्चात्ताप होतो. परंतु त्या पश्चातापावर उपाययोजना करताच येत नाही. कारण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. म्हणूनच कोणी कोणावर अन्याय अत्याचार करु नये. कारण प्रत्येक सृष्टीतील जीवाला स्वतंत्रपणे सुखकारक जीवन जगण्याचा तेवढाच अधिकार आहे यात शंका नाही.
-अंकुश शिंगाडे 
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments