फुफ्फुसांच्या आजारांची तपासणीसाठी रुग्णांनी लाभ घ्यावा – मोरया हॉस्पिटलचा उपक्रम ग्रामीण रुग्णांसाठी वरदान
घनसावंगी/प्रतिनिधी/ अलिकडच्या काळात बदलत्या हवामानामुळे, वाढत्या प्रदूषणामुळे आणि जीवनशैलीतील असंतुलनामुळे फुफ्फुसांशी संबंधित आजारांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. दमा, अलर्जी, श्वसनासंबंधी त्रास, छातीतील जळजळ आणि श्वास घेण्यास त्रास अशा अनेक आजारांनी नागरिक त्रस्त होत आहेत. ग्रामीण भागात अशा आजारांवरील तपासणी व उपचारांची सुविधा कमी असल्याने अनेक रुग्ण वेळीच निदान न झाल्याने गंभीर अवस्थेत पोहोचतात. ही गरज ओळखून घनसावंगी येथील सुप्रसिद्ध मोरया हॉस्पिटल तर्फे “फुफ्फुस, दमा आणि अलर्जी तपासणी शिबिर” हा अत्यंत उपयुक्त आणि जनजागृतीपर उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
या उपक्रमात मुंबई येथील प्रसिद्ध छाती रोग, दमा व अलर्जी तज्ञ डॉ. अक्षय चव्हाण हे स्वतः रुग्णांच्या सेवेसाठी उपस्थित राहणार आहेत. डॉ. चव्हाण हे फुफ्फुस व श्वसनविकार तज्ञ म्हणून ओळखले जात असून त्यांनी देशातील अनेक नामांकित रुग्णालयांत काम केले आहे. ते दर महिन्याच्या चौथ्या रविवारी मोरया हॉस्पिटल, घनसावंगी येथे उपस्थित राहून ग्रामीण रुग्णांची तपासणी करणार आहेत.
या तपासणी शिबिरात सतत सर्दी-खोकला होणे, छातीत शिट्टीसारखा आवाज येणे, दम लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत दुखणे, सतत बेडका येणे किंवा रक्तासह बेडका येणे, तसेच झोपेत घोरणे किंवा श्वास अडकणे यांसारख्या आजारांचे सखोल निदान केले जाणार आहे. यासाठी आवश्यक असलेल्या सर्व आधुनिक तपासण्या व उपचारांची सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ग्रामीण भागातील अनेक रुग्णांना शहरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये तपासणीसाठी जाणे खर्चिक आणि अवघड ठरते. ही समस्या ओळखून डॉ. गंगाधर धांडगे व रवींद्र धांडगे यांनी मोरया हॉस्पिटलच्या माध्यमातून अत्याधुनिक उपचार सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध करून दिल्या आहेत. यामुळे घनसावंगी तालुक्यातील आणि परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
फुफ्फुसांच्या आजारांबद्दल जनजागृती निर्माण करणे, त्यांचे लवकर निदान करणे आणि योग्य उपचार करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. सध्या हवेची गुणवत्ता झपाट्याने खालावत असून, धूम्रपान आणि औद्योगिक प्रदूषणामुळे फुफ्फुसांचे आजार वाढत आहेत. वेळेवर तपासणी न झाल्यास हे आजार जीवघेणे ठरू शकतात. त्यामुळे नियमित तपासणी आणि आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले आहे.
मोरया हॉस्पिटलच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, या आरोग्यदायी उपक्रमाचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा, आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या फुफ्फुस आरोग्याची काळजी घ्यावी. वेळेवर तपासणी म्हणजेच उपचाराचा पहिला टप्पा, असे आवाहन करण्यात आले आहे.