डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार नाहीच
जागतिक पातळीवर सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या नोबेल पुरस्काराची घोषणा दरवर्षी ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात केली जाते. मानव कल्याणासाठी झटणाऱ्या विविध क्षेत्रातील शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, लेखक आणि जागतिक पातळीवर शांततेसाठी कार्य करणाऱ्या व्यक्तीस किंवा संस्थेस हा पुरस्कार दिला जातो. यावर्षी या पुरस्काराकडे सगळ्या जगाचे लक्ष लागले होते कारण यावर्षीचा शांततेचा नोबेल पुरस्कार मलाच मिळणार असा ( फाजील ) आत्मविश्वास अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना होता. तसे त्यांनी अनेकदा बोलूनही दाखवले होते त्यामुळे त्यांना खरंच हा पुरस्कार मिळेल का? याची उत्सुकता जगभर होती. शांततेच्या नोबेल पुरस्काराची घोषणा शुक्रवारी दहा ऑक्टोबरला झाली आणि त्यावरील सस्पेन्स संपला. शांततेचा नोबेल पुरस्कार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मिळालाच नाही. यावर्षीचा शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला तो व्हेनेझुएलाच्या मारिया कोरिना मचाडो यांना आणि मचाडो यांना पुरस्कार का मिळाला यापेक्षा ट्रम्प यांना पुरस्कार का मिळाला नाही याचीच जगभर याची चर्चा झाली. डोनाल्ड ट्रम्प यांनी हा पुरस्कार मलाच मिळणार यासाठी मी सात युद्धे थांबवली व जगात शांती निर्माण केली अशी सातत्याने वल्गना करून एकप्रकारे नोबेल पुरस्कार समितीवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या दबावाला नोबेल पुरस्कार समिती बळी पडली नाही. त्यांनी योग्य निर्णय घेत डोनाल्ड ट्रम्प यांना हा पुरस्कार नाकारीत योग्य व्यक्तीला पुरस्कार दिला याबद्दल नोबेल पुरस्कार समितीचे कौतुकच करायला हवे. डोनाल्ड ट्रम्प यांना हा पुरस्कार हवा होता त्यासाठी त्यांनी मोठा थयथयाट केला. सातत्याने मी सात युद्धे थांबवली अशी वल्गना केली मात्र अमेरिकेनेच अनेक देशांना फुस लावून युद्धाच्या गर्तेत ढकलले हे लपून राहिले नाही. आधी भांडण लावून देणे आणि नंतर ते सोडवण्याचे नाटक करणे त्यातून आपला स्वार्थ साधणे हेच अमेरिकेचे धोरण आहे. डोनाल्ड ट्रम्प असो की अमेरिकेचे याआधीचे राष्ट्राध्यक्ष त्यांनी इतर देशांकडे फक्त आपल्या शस्त्रास्त्रांचे गिऱ्हाईक म्हणून पाहिले. आपली शस्त्रास्त्रे विकली जावीत यासाठी अमेरिकेने अनेक देशात युद्ध पेटवली हा इतिहास आहे. आता हेच पाहा ना… भारत पाकिस्तानचे युद्ध मीच थांबवले अशी शेखी मिरवणारे व त्याद्वारे नोबेल पुरस्कारावर हक्क सांगणारे डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानला घातक शस्त्रात विकणार असल्याची बातमी नुकतीच वर्तमानपत्रात वाचली आता. जर डोनाल्ड ट्रम्प हे खरंच शांततेचे भोक्ते असते तर त्यांनी पाकिस्तानला शस्त्रास्त्रे का विकली असती ? पाकिस्तान या शस्त्रांचा वापर भारताविरोधात करणार जर पाकिस्तानने हे शस्त्र भारताविरुद्ध वापरले तर भारतही त्याला उत्तर देणार मग पुन्हा संघर्ष उफाळणार. जर ही शस्त्रे दहशतवाद्यांच्या हातात पडली तर भारतासोबतच संपूर्ण जगाला धोका पसरू शकतो. मग पाकिस्तानसारख्या दहशतवादी देशांना शस्त्रे विकून जगभर अशांतता पसरवणाऱ्या ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार कसा मिळणार ? म्हणूनच नोबेल पुरस्कार समितीने घेतलेला हा निर्णय अतिशय योग्य आहे. ज्या मारिया माचाडो यांना हा पुरस्कार देण्यात आला त्या त्याच्या हकदार होत्याच. मारिया मचाडो या हॉवर्ड विद्यापीठातील पदवीधर आहेत आणि त्यांच्या व्हेनेझुएला देशातील हुकुमशाही विरुद्ध त्यांनी आवाज उठवला आहे. भ्रष्ट हुकुमशाही विरुद्ध स्वतःचा जीव धोक्यात घालून लढणाऱ्या मारिया मचाडो या लोकशाहीचा आवाज आहेत. मागील वर्षी या देशात निवडणुका झाल्या. या निवडणुकीत मचाडो या उभ्या राहिल्या मात्र त्यांना निवडणुकीत उभे राहण्यापासून रोखण्यात आले. त्यांना अपात्र घोषित करून त्यांचे राजकारण संपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण त्या सरकारच्या या दमनशाहिला दबल्या नाहीत. त्यांनी या विरोधात आवाज उठवला. संपूर्ण देशाला हुकुमशाही विरुद्ध एकत्र केले. देशात लोकशाही टिकावी म्हणून जीव धोक्यात घालून लढल्या त्यामुळेच त्यांची या पुरस्कारासाठी झालेली निवड सर्वार्थाने योग्य आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि मारिया मचाडो यांची तुलना होऊ शकत नाही. लोकशाहीच्या नावाखाली हुकुमशाही राबवणारे ट्रम्प या पुरस्कारासाठी पात्र ठरूच शकत नाही म्हणूनच नोबेल पुरस्कार समितीच्या या निर्णयाचे जगभर कौतुक होत आहे.
-श्याम ठाणेदार