भारतच आशियाचा राजा   
           रविवारी दुबईत झालेल्या आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ५  विकेट्सने धुव्वा उडवत भारताने आशिया चषकावर विक्रमी नवव्यांदा नाव कोरत इतिहास रचला. विशेष म्हणजे या स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा सलग तीनदा पराभव करत हॅट्ट्रिक साजरी केली.  रविवारी खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारताच्या फिरकी गोलंदाजांनी त्यातही कुलदीप यादवने  अप्रतिम  गोलंदाजी करत पाकिस्तानच्या  फलंदाजांची पळता भुई थोडी केली. कुलदीप यादवने  अंतिम सामन्यात भेदक गोलंदाजी करताना अवघ्या ३०  धावात ४ बळी मिळवले. विशेष म्हणजे त्याने आपल्या चौथ्या षटकात पाकिस्तानचे  तीन  फलंदाज बाद केले.  त्याला वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल,  जसप्रीत बुमरा यांनी चांगली साथ दिली. या तिघांनी प्रत्येकी  २ बळी मिळवत श्रीलंकेला अवघ्या १४६ धावात रोखले.  विशेष म्हणजे पाकिस्तानने त्यांच्या डावाची सुरुवात धमाकेदार केली. त्यांच्या सलामीच्या जोडीने धडाकेबाज सुरुवात करून भारतीय गोलंदाजांना चकित केले.  ९ धावांच्या सरासरीने त्यांनी धावा काढल्या मात्र १ बाद ११३ अशा सुस्थितीतून त्यांची घसरगुंडी उडाली. वरुण चक्रवर्तीने दुसरा बळी मिळवल्यावर पाकिस्तानची गाडी रुळावरून घसरली. भारताच्या फिरकी गोलंदाजांनी आपल्या धारधार गोलंदाजिने पाकिस्तानच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. अवघ्या ३३ धावात भारताने पाकिस्तानचे ९ फलंदाज बाद केले. भारताच्या फिरकी गोलंदाजीपुढे पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोलमडली आणि पाकिस्तानचा संघ पूर्ण २० षटके देखील खेळू शकला नाही. १४७ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेला भारतीय संघ किती षटकात विजय मिळवणार असाच प्रश्न विचारला जात होता मात्र पाकिस्तानच्या गोलंदाजांनी भारताचे पहिले  तीन फलंदाज स्वस्तात बाद करून क्रिकेटप्रेमींची  धाकधूक वाढवली मात्र भारताचा मधल्या फळीतील युवा फलंदाज तिलक वर्मा याने एक बाजू लावून धरत शानदार अर्धशतक झळकावले त्याला यष्टिरक्षक संजू सॅमसन आणि अष्टपैलू शिवम दुबेने चांगली साथ दिली. त्यामुळे भारताने  सहज विजय मिळवला आणि १४५ कोटी देशवासीयांना विजयादशमीची गोड भेट दिली. भारतीय संघाने सर्वाधिक ९ वेळा  आशिया चषकावर मोहोर उमटवत आपणच आशियाचा राजा आहोत हे सिद्ध केले.  भारताने या स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांवर भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. भारताच्या सर्वच खेळाडूंनी चांगली कामगीरी करून आपण फॉर्मात असल्याचे दाखवून दिले.  अभिषेक शर्मा, शुभमन गिल, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या,  संजू सॅमसन  या भारताच्या सर्वच फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. सूर्यकुमार यादवने फलंदाजीत चमकदार कामगिरी केली नसली तरी  त्याने संघाचे  नेतृत्व कुशलतेने केले. गोलंदाजीतही बुमराह,   कुलदीप यादव,  वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल यांनी चांगली कामगिरी केली. शिवम दुबेने दमदार अष्टपैलू कामगिरी केली.  कुलदीप यादव तर या स्पर्धेत भारताचा ट्रम्पकार्ड बनला होता त्याची फिरकी प्रतिस्पर्धी संघातील कोणत्याच फलंदाजाला समजली नाही. त्याने या स्पर्धेत सर्वाधिक १७ बळी टिपले. ही स्पर्धा भारतीय संघासाठी खूप महत्वाची होती कारण ऑपरेशन सिन्दुर नंतर भारत पहिल्यांदाच पाकिस्तान समोर उभा ठाकणार होता. त्यामुळे ही स्पर्धा जिंकून भारतीय खेळाडू  पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहतील आणि भारतीय सैनिकांना मानवंदना देतील ही  अपेक्षा होती अखेर ती खरी  ठरली. भारतीय संघाने एकदा नव्हे तर तीनदा पाकिस्तानला चारी मुंड्या चित करून पहलगाम हल्ल्यातील शहिदांचा मैदानात  बदला घेतला. संपूर्ण स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हातमिळवणी केली  नाही इतकेच नाही तर अंतिम सामन्यात विजय मिळवल्यानंतर पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास नकार देत  पहलगामवर  भ्याड हल्ला करणाऱ्या पाकिस्तानचा कृतीतून निषेध व्यक्त केला. भारतीय संघाच्या या कृतीने देशवासीयांची मने जिंकली.  भारताने जरी ट्रॉफी स्वीकारली नसली तरी आशिया चषकाचा अंतिम सामना जिंकत भारतच आशियाचा राजा आहे हे सिद्ध केले. आशिया चषक विजेत्या  भारतीय संघाचे मनापासून अभिनंदन !
-श्याम ठाणेदार