विद्यार्थी वर्गाने तयार केली “प्रथमोपचार ” पेटी,सर्वत्र कौतुकांचा वर्षाव
कन्नड/ शहरातील शैक्षणिक दृष्ठिकोनातून अग्रभागी असलेल्या श्री संत ज्ञानेश्वर विद्या मंदिर, शिवनगर येथील इयत्ता 8 वीच्या विद्यार्थी गणांनी एकत्रित येऊन इंग्रजी विषयातील फर्स्ट एड बॉक्स (प्रथमोपचार पेटी) या धड्याचे प्रात्यक्षिक उत्साहात सादर केले. विद्यार्थ्यांनी स्वतःहून प्रथमोपचार पेटी तयार करून तिच्यातील साहित्याचे प्रत्यक्ष ज्ञान घेतले.व उपस्थितांना ही सांगितले.
या प्रथमोपचार पेटीत कापूस, बँडेज, अँटीसेप्टिक क्रीम, सॅनिटायझर, कात्री, टेप, पिन, स्पिरिट इत्यादी आवश्यक साहित्य ठेवण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्याने पेटीत असणाऱ्या वस्तूंचा उपयोग व त्यांचे महत्त्व सांगितले. लहानसहान जखमा, खरचटणे, भाजणे किंवा किरकोळ अपघात झाल्यास त्वरित मदत कशी करावी, याची माहिती त्यांनी प्रात्यक्षिकातून उपस्थितांना दिली.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना केवळ इंग्रजी धड्याचे आकलन झाले नाही, तर जीवनासाठी अत्यंत उपयुक्त ठरणारे प्रथमोपचाराचे महत्त्वही समजले. अचानक अपघात किंवा आकस्मिक परिस्थितीत भीती न बाळगता योग्य पद्धतीने प्रथमोपचार करता येतो, हे त्यांनी कथन केले.
या वेळी उपस्थित शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व पालकांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की अशा कृतींमुळे विद्यार्थ्यांमध्ये सजगता, जबाबदारीची भावना, तत्परता आणि आत्मविश्वास वाढतो. शालेय स्तरावर होणारे असे उपक्रम सदैव समाजासाठीही प्रेरणादायी ठरत असतात.