महाराष्ट्रात प्रथमच “जागर ‘स्व’ अस्तित्वाचा शिबिर – २०२५
देगलूर/प्रतिनिधी/ बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील दुसरबीड येथील नारायणराव नागरे महाविद्यालयात दिनांक २५ ते २७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत सूर्यज्योत फाउंडेशनतर्फे “जागर ‘स्व’ अस्तित्वाचा शिबिर” आयोजित करण्यात आले आहे. “सौहार्द संयोग” या उपक्रमाला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर महाराष्ट्रात पहिल्यांदाच हे शिबिर नव्या उमेदीने व अधिक प्रेरणादायी कार्यक्रमांसह घेऊन येण्यात येत आहे.
तरुणाईला आत्मशोध घडवून आणणे, आत्मभानाची जाणीव निर्माण करणे, जीवनातील नातेसंबंधांना नवा दृष्टिकोन देणे, मानसिक बळ व आत्मविश्वास वाढवणे आणि समाजाशी बांधिलकी दृढ करणे हा या शिबिराचा मूलभूत हेतू आहे. या शिबिरातून प्रत्येक सहभागीला स्वतःला जाणून घेण्याची, स्वतःतील दडलेली ताकद शोधण्याची आणि जीवनाकडे नव्या नजरेने पाहण्याची अनोखी संधी उपलब्ध होणार आहे.
तीन दिवसांच्या या शिबिरात सामाजिक व विविध क्षेत्रातील प्रेरणादायी कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधण्याची संधी तरुणांना मिळणार असून, त्यांच्या अनुभवातून नवी ऊर्जा व विचारसरणी मिळणार आहे. तसेच झुम्बा, एरोबिक्स, संगीत, गप्पा, गाणी, मैदानी खेळ, श्रमदान, जंगलभ्रमंती व कॅम्पफायर अशा अनेक उपक्रमांच्या माध्यमातून शिबिर रंगतदार होणार आहे. तरुणांच्या प्रश्नांवर चर्चा, ‘स्व’ची ओळख, नवे मित्र जोडण्याची व कायमची नाती बांधण्याची सुवर्णसंधीही या शिबिरात निर्माण होणार आहे.