उपासना ही तत्वाची व्हावी..!
दैवी शक्ती म्हणजे ईश्वरी सामर्थ्य किंवा उच्च शक्तीची कृपा, जी सामान्यतः एखाद्या व्यक्तीच्या कल्पनेच्याही पलीकडे असते. ही शक्ती जगाला नियंत्रित करणा-या उच्च शक्तींकडून येते आणि पूर्वनियोजित घटना घडवते. अनेकदा असे मानले जाते की, जेव्हा एखादी व्यक्ती संकटातून अनपेक्षितपणे बाहेर पडते किंवा जीवनात काही अलौकिक घटना घडतात, तेव्हा ती दैवी शक्तीमुळे घडते, असे लोकं मानतात. थोडक्यात, दैवी शक्ती म्हणजे एका अज्ञात आणि शक्तिशाली अस्तित्त्वाची कृपा, जी आपल्या जीवनावर आणि घटनांवर प्रभाव टाकते. असे अनेक धर्मांमध्ये आणि अध्यात्मात मानले जाते. ही शक्ती देव किंवा एखाद्या उच्च शक्तीशी संबंधित आहे आणि त्या शक्तीचा प्रभाव दर्शवते. दैवी शक्ती नैसर्गिक नियम आणि मानवी बुद्धीच्या पलीकडे कार्य करते, ज्यामुळे अनपेक्षित गोष्टी घडतात. ही संकल्पना अध्यात्मिक आणि धार्मिक विचारांशी जोडलेली आहे, जिथे ईश्वर आणि त्याच्या शक्तीवर विश्वास ठेवला जातो. या शक्तीमुळे जीवनातील घटनांवर परिणाम होतो आणि ती व्यक्तीला संकटातून बाहेर काढण्यास मदत करते, असे मानले जाते.
ही दैवी शक्ती साक्षात स्त्रीशक्ती आहे. देवीचे पूजन करणे म्हणजे स्त्रीतत्त्वाची पूजा करण्यासारखेच आहे. कारण स्त्री ही आई, बहीण, मुलगी आणि पत्नी अशा सर्व भूमिका पार पाडणारी शक्ती आहे. त्यामुळे, दैवी शक्ती आणि स्त्रीशक्ती एकच आहेत आणि या उत्सवाचा उद्देश मातृशक्तीचा गौरव करणे आहे. नवरात्रोत्सव हा देवीच्या पूजनाचा सोहळा आहे आणि देवीला स्त्रीशक्तीचे प्रतीक मानले जाते. देवी ही केवळ एक स्त्री नाही, तर ती सर्व नाती जपणारी आणि सृजन करणारी शक्ती आहे, असे मानले जाते. “जिथे नारीची पूजा होते, तिथे प्रत्यक्ष भगवंतांचा वास असतो” असे म्हटले जाते. याचा अर्थ असा की, स्त्रीशक्तीची पूजा केल्याने आपोआपच सर्व देवतांचे सान्निध्य प्राप्त होते. नवरात्र हा मातृशक्तीचा उत्सव आहे, जो स्त्रीच्या सृजनशक्तीचाही उत्सव आहे. त्यामुळे, नवरात्रीत आपण दैवी शक्ती आणि समस्त नारीशक्ती या दोन्हीचा उत्सव साजरा करतो, कारण त्या एकच आहेत.
पण कोणतीही लिंग विशिष्ट पूजा आली की तिथे अहंकार येतोच आणि अहंकार आला की उपासना संपते. त्यामुळे पूजा, उपासना, साधना ही तत्वाची व्हावी, व्यक्तीची नव्हे. कारण व्यक्तींमध्ये दोष असतातच. तत्व शुद्ध, निर्लेप आणि निरपेक्ष असते. अर्थातच देवी ही शक्तीरूपच असते. पुरुष देवता या त्या विशिष्ट क्रियेचं ती क्रिया कशी व्हावी हे ज्ञान असतात, तर स्त्री देवता म्हणजे त्यांच्या ज्या पत्नी दाखवलेल्या असतात त्या ती ती विशिष्ट क्रिया पार पाडणारी शक्ती असतात. ज्ञान आणि कृती किंवा क्रिया यांचा संगम झाल्यावरच अर्थात घडल्यावरच कार्य घडते. नवरात्रीला स्त्री शक्तीचा जागर म्हणायचं असेल तर गणेश उत्सवाला, कृष्ण जन्माष्टमीला पुरुष शक्तीचा जागर म्हणायचं का? शिव शब्दात शिव हा शब्द शव या पुरुष रुपाला इ हा स्त्री लिंगी स्वर जोडून शिव हा शब्द बनला आहे. हा इ हा स्त्री उच्चारी स्वर नसेल तर शिव हे फक्त शव म्हणजेच प्रेत होईल.
लक्ष्मी ही विष्णूची शक्ती आहे जिला आपण विष्णूची पत्नी म्हणतो. सरस्वती ही ब्रह्मदेवाची कार्यकारी शक्ती म्हणजे सृष्टी कशी बनवायची हे ज्ञान ब्रह्मदेव आणि ती प्रत्यक्ष बनवण्याची शक्ती म्हणजे सरस्वती. ब्रह्म किंवा परब्रह्म ही सृष्टी बनवणा-या शक्तीचे मूळ अकल्पनिय, अचिंत्य म्हणजे आपल्याला न कळणारे अति सूक्ष्म रूप असून या शक्तीचं साकार आणि खरं भासणारं आभासी रूप म्हणजे माया होय. ‘शीवी’ किंवा पार्वती ही शिवशंकरांची शक्ती होय. शीवी म्हणजे ती शिवी नव्हे जिथे चुकीची वाकशक्ती, वाणी, घातक किंवा वाईट शब्द असते.
पण हा जर स्त्री शक्तीचाच उत्सव असेल तर प्रत्येक पुरुषात स्त्रियांच्या जन्माला कारणीभूत ठरणारे ‘एक्स’ गुणसूत्र असल्याने पुरुषांमधल्या स्त्री शक्तीचं नवरात्र हे शुद्धीकरण पर्व असतं असं आपण नक्कीच म्हणू शकतो. आपण जेव्हा जन्म घेतो तो आपण माणूस म्हणूनच का घेतो? हात, पाय, नाक, डोळे, आपल्या सवयी, आवडी निवडी या काहीशा आपल्या आई-वडिलांच्या सारख्याच का असतात? त्यांच्या सारखेच आपण का दिसतो? हे सारं आरेखित केलेलं असतं. आपल्या आई वडिलांच्या शरीरातील पेशींमध्ये गुणसूत्र रूपाने पुरुष बाळ जन्माला येण्यासाठी ‘वाय’ गुणसूत्र तर स्त्री बाळ जन्माला येण्यासाठी ‘एक्स’ गुणसूत्र आवश्यक किंवा कारणीभूत असतात. आता पुरुषांच्या शरीरातील पेशींमध्ये ‘एक्स’ आणि ‘वाय’ हे दोन्ही गुणसुत्र असतात तर स्त्रीच्या शरीरातील पेशींमध्ये फक्त ‘एक्स’ गुणसूत्र असतात.
आता दोघांच्या शरीरातील एक एक गुणसूत्र येऊन जोडला जाईल तेव्हा बाळाचं लिंग काय असणार हे ठरणार… पुरुषांमधलं एक्स आणि स्त्री मधलं एक्स एकत्र आलं तर मुलगी जन्माला येणार आणि जर पुरुषांमधलं वाय आणि स्त्री मधलं एक्स गुणसूत्र एकत्र आलं तर मुलगा जन्माला येणार… याचे दोन मुख्य अर्थ होतात. एक म्हणजे मुलगा होणार की मुलगी हे पुरुषामधून एक्स किंवा वाय यापैकी कोणतं गुणसूत्र दिलं जातंय यावर अवलंबून असतं. म्हणजेच दुस-या भाषेत मुलगा होणार की मुलगी याला पूर्णतः पुरुषच जबाबदार असतो आणि स्त्री मध्ये दोन्ही गुणसूत्र एक्स असल्याने ती एक कणखर व्यक्ती असते असं म्हणता येईल. अर्थात स्त्री ही पूर्णपणे स्त्री असते तर पुरुषामध्ये काही प्रमाणात स्त्रीत्व असतं. म्हणजे नवरात्र हा स्त्री शक्तीचा जर जागर असेलच तर तो पुरुषांमधल्या स्त्री शक्तीचा जागर किंवा पुरुषांमधल्या स्त्रीत्वाचं शुद्धीकरण असतं असं आपण म्हणू शकतो.
याही पुढे जायचं झालं तर देवता या वायूरूप असतात. म्हणजे आपण ज्या रूपात त्यांची आराधना करू त्या रूपात त्या आपल्याला प्रसन्न होतात किंवा दर्शन देतात. पण चित्रपटात दाखवल्याप्रमाणे वास्तविकतेत लगेच होतं असं नाही. त्यासाठी स्वत:ला झोकून देऊन उपासना करावी लागते, त्यासाठी जीव ओतावा लागतो. अर्थात अगदी आर्ततेते साद घातल्यावर देवता धावून आली आहे असंही क्वचित प्रसंगी झालेलं आहे. उदाहरण द्यायचं झालं तर जेव्हा एका हत्तीचा पाय पाण्यातल्या मगरीने पकडला होता, तेव्हा त्या हत्तीने आर्ततेने विष्णूला साद घातल्यावर त्याने धावून येऊन त्या हत्तीची सुटका केली होती. अजामिळ नावाच्या एका नास्तिक व्यक्तीला मोक्ष मिळाला ज्याने आयुष्यभर काहीही उपासना केली नाही. पण मरताना त्याच्या स्वतःच्या मुलाला नारायण म्हणून हाक मारली आणि तो मुक्त झाला. तर सांगायचं उद्देश हाच की देवता जरी माणसा सारख्या दाखवलेल्या असल्या तरी त्या प्रतिकात्मक असतात. त्या जर माणूस असत्या तर त्यांनाही आपल्यासारखे राग, लोभ, द्वेश, प्रेम वगैरे भावना असत्या.
त्यामुळे देवतांमध्ये स्त्री-पुरुष भेद न माजवता, त्याचं अवडंबर न करता स्त्री शक्तीची नव्हे तर केवळ ‘शक्तीची पूजा’ आपण करतोय हे लक्षात ठेवून उपासना करावी. जिथे शक्ती असेल तिथेच शांती असते. दुबळ्यांच्या गप्पांना काहीही अर्थ नसतो. तर नवरात्राच्या या काळात देवीची उपासना करून (यात स्त्री-पुरुष सगळे आलेत) आपण शरीराने आणि मनाने शक्ती संपन्न, सामर्थ्यवान व्हायला पाहिजे. आपण शक्तिमान झालो की समाजात आपल्याला मान मिळतो, हाती घेतलेल्या कामात यश मिळतं. मन आणि शरीर सुद्धा स्वस्थ, शांत राहतं. स्त्रियांनी आणि पुरुषांनी एकमेकांचा, एकमेकातील भेदांचा आदर करत एकत्र काम करायला शिकायला पाहिजे. मन आणि समाजातील वाईट गोष्टींचा नायनाट करण्यासाठी प्रयत्नशील रहायला पाहिजे. उपासना, साधना याचे अनेक अर्थ, प्रकार आहेत. हिंदू धर्म जेवढा प्राचीन आहे तेवढाच विशाल आहे.