नेतृत्वगुण व व्यक्तिमत्त्व विकासासाठी
रोटरी रेनबोचे रायला युवक प्रशिक्षण
युवकांनी नेतृत्वकौशल्य आत्मसात करावे- डॉ.अग्निहोत्री
जालना/प्रतिनिधी/ युवकांचा सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास आणि नेतृत्वगुणांना चालना देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ जालना रेनबोतर्फे जेईएस महाविद्यालयात मंगळवार दि. 23 सप्टेंबर रोजी रोटरी रेनबो रायला म्हणजेच रोटरी युथ लीडरशिप अवार्ड या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर चाललेल्या या उपक्रमात विविध विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
युवकांना संवादकौशल्य, गटचर्चा, वक्तृत्व, मुलाखत तंत्र, समाजमाध्यमांचा योग्य वापर, भावनिक बुद्ध्यांक, समस्यांचे निराकरण यांसारख्या विषयांवर प्रशिक्षण देऊन त्यांना उद्याचे जबाबदार नागरिक बनविण्यासाठी रायला या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर जेईएस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश अग्निहोत्री, जालना एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्रीनिवास भक्कड, रोटरीचे माजी प्रांतपाल डॉ. सुरेश साबू, संजय राठी, श्रीगोपाल मुंदडा यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्ताविकपर भाषणात रोटरी रेनबोच्या अध्यक्षा डॉ. प्रतिभा श्रीपत यांनी रायला उपक्रमाचे महत्त्व स्पष्ट केले. त्या म्हणाल्या की, हा रोटरी इंटरनॅशनलचा युवकांसाठीचा विशेष उपक्रम आहे. युवकांमध्ये नेतृत्वगुण, आत्मविश्वास, व्यक्तिमत्त्व विकास घडविणे हा उद्देश असून, जगभरात रोटरी क्लबतर्फे या उपक्रमाचे आयोजन केले जाते. डॉ. सुरेश साबू यांनी या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये होणाऱ्या सकारात्मक बदलांचा ऊहापोह केला तर प्राचार्य डॉ. गणेश अग्निहोत्री यांनी युवकांना नेतृत्वकौशल्य आत्मसात करण्याचे आवाहन केले. मार्गदर्शन सत्रात महेश माळी यांनी भावनिक बुद्ध्यांक, विकास कदम यांनी नेतृत्व विकास कौशल्य, सौ. स्मिता भक्कड यांनी मुलाखतीची तंत्रे तर डॉ. नितीन खंडेलवाल यांनी समाजमाध्यमांचा योग्य वापर याविषयी उपयुक्त मार्गदर्शन केले. डॉ. प्रशांत पळणीटकर व डॉ. मधुर करवा यांनी मार्गदर्शनात पार पडलेल्या वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर मते मांडून टाळ्यांचा गजर मिळवला. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाला विवेक मणियार, दीपक नाथाणी, कल्पेश भक्कड, अनुप जिंदल, आशिष राठी, संजय काबरा, सुनील चोरडिया आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला रोटरी परिवारातील मान्यवर आणि सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.