मंजुळ आवाजाचे पार्श्वगायक एस पी बालसुब्रमण्यम
हिंदी चित्रपटसृष्टीतील मंजुळ आवाजाचे पार्श्वगायक एस पी बालसुब्रमण्यम यांचा आज पाचवा स्मृतिदिन. पाच वर्षापूर्वी २५ सप्टेंबर २०२० रोजी वयाच्या ७४ व्या वर्षी एस पी बालसुब्रमण्यम यांचे कोरोनाने निधन झाले होते. त्यांच्या निधनाने रसिकांनी हळहळ व्यक्त केली होती कारण एस पी बालसुब्रमण्यम हे रसिकांचे आवडते पार्श्वगायक होते. त्यांचे निधन रसिकांना चटका लावून जाणारे ठरले. एस पी बालसुब्रमण्यम यांचा जन्म ४ जून १९४६ रोजी आंध्रप्रदेश मधील नेल्लोर येथील मेहुआ या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव श्रीपती पंडितराध्युला बालसुब्रमण्यम असे होते. एस पी बालसुब्रमण्यम यांचे वडील हरिकथा गायक होते. आंध्रप्रदेश मधील हे पारंपरिक लोकसंगीत आहे त्यात कविता, कथा, गायन, नृत्य यासह सर्व प्रकारांचा समावेश असतो. एस पी बालसुब्रमण्यम यांचे वडील नाटकातही काम करत. एस पी यांना एक भाऊ व दोन बहिण आहेत. एस पी यांनी मोठे होऊन इंजिनिअर व्हावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती पण ती पूर्ण होऊ शकली नाही. एस पी बालसुब्रमण्यम यांना लहानपणापासूनच गायनाची आवड होती त्यामुळे त्यांनी गायनातच करिअर करायचे असे ठरवले आणि त्यांनी व्यावसायिक गायनास सुरुवात केली. १९६४ साली त्यांना गायनात पहिले पारितोषिक मिळाले. त्यानंतर त्यांचे नाव सर्वदूर पोहचले. सुरुवातीला त्यांनी आपल्या मातृभाषेत म्हणजे तेलगू भाषेत गाणी गायला सुरुवात केली नंतर त्यांनी तमिळ, मल्याळम आणि कन्नड या दक्षिण भारतीय भाषेतही गाणी गायला सुरुवात केली. दक्षिणात्य भाषेत त्यांनी गायलेली गाणी लोकप्रिय होऊ लगली. त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढू लागली. त्यांच्या मंजुळ आवाजाने रसिकांना वेड लावले. त्यांचा आवाज आणि त्यांनी गायलेली गाणी रसिकांना इतकी आवडली की रसिकांनी त्यांना दक्षिणेतील. मोहम्मद रफी अशी पदवी दिली. दक्षिणेकडून त्यांनी आपला मोर्चा हिंदी चित्रपट सृष्टीकडे वळवला. हिंदी चित्रपट सृष्टीत प्रवेश केल्यावर त्यांना एक दुजे के लिये या चित्रपटात गाण्याची संधी मिळाली. या चित्रपटात त्यांनी गायलेली सर्व गाणी खूप गाजली. आजही या चित्रपटातील त्यांनी गायलेली गाणी प्रेक्षकांच्या ओठावर आहेत. या चित्रपटात त्यांनी गायलेले हम बने तुम बने एक दुजे के लिये…. या गाण्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. एस पिंच्या पहिल्याच चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने त्यांचे नाव देशभर झाले. एस पी बालसुब्रमण्यम यांनी गायलेल्या पहिल्याच चित्रपटातील गाणी गाजल्याने त्यांना अनेक चित्रपटात गाण्याची संधी मिळाली. अनेक संगीतकार त्यांना आपल्याकडे गाणी गाण्यासाठी गळ घालू लागले. पुढे त्यांनी अनेक चित्रपटात गाणी गायली ती गाणी लोकप्रियही झाली. हिंदी चित्रपट सृष्टीत त्यांचे आता चांगले बस्तान बसले. पत्थर के फुल, बागी, हम आपके है कौन? साजन, रोजा या चित्रपटात त्यानी गायलेली गाणी खूप गाजली. सलमान खानचा पहिला चित्रपट असलेल्या मैने प्यार किया या चित्रपटात त्यांनी सलमानचा आवाज बनून गाणी गायली. या चित्रपटात त्यांनी गायलेली सर्व गाणी खूप गाजली. सलमान खानला सुपरस्टार करण्यात एस पी बालसुब्रमण्यम यांचा मोलाचा वाटा होता असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. सलमान खानच्या अनेक गाण्यांना त्यांचाच आवाज होता. सलमान खान आणि एस पी हे जणू एकाच नाण्याच्या दोन बाजू होते. १९९० च्या दशकात त्यांनी गायलेली सर्वच गाणी लोकप्रिय झाली. एस पी यांनी १६ भाषांमधून ४० हजारांहून अधिक गाणी गायली. ८ फेब्रुवारी १९८१ रोजी सकाळी ९ ते रात्री ९ अशा १२ तासात तब्बल २१ कन्नड गाणी रेकॉर्ड करून त्यांनी विश्वविक्रम केला जो गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदला गेला. एस पी यांनी जवळपास पाच दशके आपल्या मंजुळ आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या आवाजाची मोहिनीच अशी होती की जो त्यांचा आवाज ऐकेल तो त्यांच्या प्रेमात पडेल. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. त्यांना तब्बल अर्धा डझन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. शिवाय अनेक फिल्मफेअर, स्क्रीन पुरस्कार मिळाले. भारत सरकारनेही त्यांना पद्मभूषण हा मानाचा पुरस्कार देऊन गौरवले. रसिकांचे आवडते आणि रसिकांच्या मनात आदराचे स्थान असलेल्या या गायकाचे कोरोनाने अचानक निधन झाल्याने रसिकांना मोठा धक्का बसला होता. मंजुळ आवाजाचे जेष्ठ पार्श्वगायक एस पी बालसुब्रमण्यम यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!
-श्याम ठाणेदार