रोटरी क्लब इलाईटने रॅलीतून 
दिला जागतिक शांततेचा संदेश
जगाला शांततेची तीव्र गरज – उमेश बजाज 
जालना/प्रतिनिधी/ रोटरीच्यावतीने 21 सप्टेंबर या जागतिक शांतता दिनानिमित्त शांती सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून रोटरी क्लब ऑफ जालना इलाईटतर्फे शनिवार, दि. 20 सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांची भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीतून जागतिक शांततेचा प्रभावी संदेश देण्यात आला.
      या रॅलीत जैन प्राथमिक विद्यालयाचे तब्बल 600 विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले होते. जैन प्राथमिक विद्यालयापासून रॅलीची सुरुवात झाली. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. गीता पोरवाल यांच्या हस्ते रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. शिवाजी पुतळा परिसरातून रॅली मार्गक्रमण करताना विद्यार्थ्यांनी शांततेबाबत घोषणाबाजी करून जनतेचे लक्ष वेधून घेतले. रॅलीचा समारोप विद्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात झाला.  यावेळी बोलताना रोटरी क्लब ऑफ जालना इलाईटचे अध्यक्ष उमेश बजाज म्हणाले की, आज जगभरात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा वेळी जागतिक शांततेचा संदेश प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचणे ही काळाची गरज आहे. शांतीमुळेच समाजाचा विकास होतो. हिंसाचार, द्वेष आणि असहिष्णुता यामुळे मानवतेला मोठा धोका निर्माण होतो. विद्यार्थ्यांनी अशा उपक्रमातून मिळालेला शांतीचा संदेश आयुष्यभर लक्षात ठेवून पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवावा. शांततेतूनच प्रगती आणि ऐक्य साध्य होते. रोटरी ही संस्था याच भावनेने समाजात कार्यरत आहे. क्लबच्यावतीने शांतता या विषयावर शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, त्यात सुमारे 100 शाळा सहभागी होत आहेत. यासाठी प्रथम बक्षीस 2100, द्वितीय बक्षिस 1100 व तृतीय बक्षीस सातशे रुपयांचे देण्यात येऊन सर्व विद्यार्थ्यांना सहभागी प्रमाणपत्र प्रदान केले जाणार असल्याचे उमेश बजाज यांनी सांगितले.
     कार्यक्रमाला रोटरी क्लबचे सचिव शरद गादिया, स्मिता चेचानी, राजेंद्र अग्रवाल, विजयालक्ष्मी बाले, अनया अग्रवाल, रवींद्र हुसे, विनोद देशमुख, संगीता गादिया यांच्यासह क्लबचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.