जय माँ नवरात्र महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी विनोद बलीराम यादव यांची बिनविरोध निवड
जालना/प्रतिनिधी/ जालना शहरातील कन्हैयानगर परिसरात मागील सतरावर्षांपासून अखंडितपणे आयोजित करण्यात येत असलेल्या जय माँ नवरात्र महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी विनोद बलीराम यादव यांची सन 2025 साठी बिनविरोध निवड झाली आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत ही निवड जाहीर झाली असून मावळते अध्यक्ष प्रकाश राऊत यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली.
कन्हैयानगरमधील सामाजिक जाणीवेतून जय माँ सामाजिक संस्था सन 2009 मध्ये स्थापन झाली. या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रमेश भगत तर संस्थापक सचिव मनोज काबलिये आहेत. संस्थेच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात आणि त्याच अंतर्गत जय माँ नवरात्र महोत्सव समितीची स्थापना करण्यात आली. समिती स्थापनेच्या पहिल्या वर्षी तत्कालीन अध्यक्ष मनोज काबलिये यांनी सायकलवरून वैष्णवदेवी यात्रेला प्रस्थान करून भक्ती, श्रद्धा आणि हिंदू एकात्मतेचा संदेश दिला होता. त्याच काळात कन्हैयानगरातील लोकनेता बलीराम यादव चौकात भाविकांना दर्शन घेण्यासाठी विशेष सोय उपलब्ध करून देण्यात आली आणि त्यानंतर प्रत्येक वर्षी नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात व सातत्याने साजरा होऊ लागला.
गेल्या सतरावर्षांत समितीने अखंडितपणे नवरात्र महोत्सवाचे आयोजन केले असून परिसरातील धार्मिक आणि सामाजिक वातावरणात सकारात्मक बदल घडवून आणले आहेत. महोत्सवाच्या माध्यमातून हिंदू जनजागृतीसाठी कीर्तन, भजन, देवीचे जागरण, आरती, पालखी सोहळे अशा अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमांमध्ये भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग लक्षणीय ठरतो.
मावळते अध्यक्ष प्रकाश राऊत यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत मागील वर्षाचा हिशेब सादर करण्यात आला आणि त्यानंतर नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. या कार्यकारिणीत अध्यक्षपदी विनोद यादव यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव आणि कोषाध्यक्ष अशा विविध पदांवर नवीन जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत.
समितीच्या कार्यामध्ये योगेश भगत, भगगु भगत, धन्नुलाल भगत, पदमराज भगत, शिवाजी बोंबाळे, विश्वनाथ क्षीरसागर, कचरुलाल भगत, प्रकाश राऊत, मनोज शर्मा आणि तुळशीराम गोरे यांच्यासह असंख्य भाविकांचा सहभाग आहे. या सर्वांच्या सहयोगाने नवरात्र महोत्सव एक आगळावेगळा आणि प्रेरणादायी सोहळा ठरला आहे.
नवनियुक्त अध्यक्ष विनोद यादव यांनी भाविकांचे आभार मानले असून समितीने गेल्या सतरावर्षांत ज्या प्रकारे परंपरा जपली आहे, ती यापुढेही कायम ठेवून सामाजिक बांधिलकी आणि धार्मिक उत्साह यांचा संगम साधण्याचा प्रयत्न सुरूच राहील, असा निर्धार व्यक्त केला.
