Monday, October 27, 2025
Homeऔरंगाबादसिडकोच्या बीएमपीसी कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित असलेला प्रश्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी...

सिडकोच्या बीएमपीसी कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित असलेला प्रश्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोडवला

सिडकोच्या बीएमपीसी कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित असलेला प्रश्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोडवला

मुंबई, दि. १९ : सिडको प्राधिकरणाच्या बॉम्बे मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कंपनीत काम करणाऱ्या कामगारांचा ४० वर्षांपासून प्रलंबित असलेला विषय आज अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने मार्गी लागला. या कंपनीत सेवा बजावणाऱ्या ११ पात्र कामगारांना उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याहस्ते १० लाखांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले.

यावेळी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, सह-व्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख, नगरविकास खात्याचे प्रधान सचिव असीम गुप्ता आणि इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

सिडको प्राधिकरणामध्ये नागरिकांना परिवहन सेवा देण्यासाठी १९७९ साली बॉम्बे मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कंपनी सुरू करण्यात आली होती. ही कंपनी १९८३ – ८४ मध्ये काही कारणामुळे बंद पडली. तेव्हापासून या कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अंतरिम मदत देण्याची मागणी वारंवार करण्यात येत होती. गेली अनेक वर्षे ही मागणी प्रलंबित राहिल्याने या कामगारांना न्याय मिळू शकला नव्हता.  सुरुवातीला कामगारांच्या मागणीनुसार नवी मुंबईत १० बाय १०चे गाळे देण्याचे सिडकोने निश्चित केले होते. पण वर्षानुवर्षे एवढ्या कामगारांना गाळे उपलब्ध करून देणे सिडको प्राधिकरणाला काही शक्य झाले नाही. त्यामुळे वारंवार बैठका घेऊनही या कामगारांना न्याय देणे अशक्य होऊन बसले होते. अखेर सिडको प्राधिकरणाने प्रत्येकाला १० लाख रुपये देण्याचा पर्याय कामगारांसमोर ठेवला. हा पर्याय कामगारांनी स्वीकारल्याने तसा प्रस्ताव सिडकोने तयार करून उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे पाठवला होता. हा प्रस्ताव तत्काळ मान्य करून आज यातील ११ कामगारांना प्रातिनिधिक स्वरूपात या धनादेशाचे वाटप करण्यात आले.

सिडकोकडे आतापर्यंत ६३१ कामगारांनी यासाठी अर्ज केले असून त्या सर्वांच्या अर्जाची छाननी करून त्यांनाही ही रक्कम तात्काळ देण्यात येणार आहे. तसेच यानंतरही येणाऱ्या अर्जांची छाननी करून त्यांनाही ही रक्कम देण्याचे सिडको प्राधिकरणाने निश्चित केले आहे.

४० वर्षांनी का होईना पण आपल्याला आपली देय रक्कम देऊन दिलासा दिल्याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments