संजय राऊतांनी ‘माझं कुंकू, माझा देश’ ऐवजी ‘माझा जावेद, माझी बिर्याणी’ अभियान सुरु करावं
भाजपाचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचा खोचक सल्ला
मराठा व ओबीसी आरक्षण भाजपाने दिलं, मात्र उद्धव सरकारने घालवलं
उबाठा गटाचे ‘माझं कुंकू माझा देश’ हे अभियान म्हणजे निव्वळ ढोंग आहे. त्यांचे हे देशप्रेम बेगडी आहे. लोकसभा निवडणुकांवेळी त्यांच्या मिरवणुकांमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकले, हिरवा गुलाल उधळला गेला, मुंबई बॉम्बस्फोटात दोषी ठरलेले लोक उबाठा गटाच्या प्रचारासाठी आले होते तेव्हा श्री. राऊत यांना देश आठवला नाही. आज मात्र क्रिकेट सामन्यावरून अचानक देशप्रेम उफाळून आले आहे अशी घणाघाती टीका भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी गुरुवारी केली. प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. श्री. राऊत यांनी ‘माझं कुंकू माझा देश’ अभियानाऐवजी ‘माझा जावेद,माझी बिर्याणी’ असं अभियान राबवावे अशी खोचक टिप्पणीही श्री. बन यांनी केली.
भारताच्या विजयापेक्षा पाकिस्तानचा विजय राऊतांना अधिक प्रिय
आशियाई क्रिकेट स्पर्धेतील भारत–पाक सामना हा आंतरराष्ट्रीय मालिकेतील आहे. भारतीय खेळाडू पाकिस्तानच्या भूमीवर हा सामना खेळायला जात नाहीत. भारत पाकिस्तानलाही भारतात सामने खेळण्यासाठी बोलवत नाही. अशा वेळी सामना बहिष्कृत करण्याची भाषा श्री.राऊत करत आहेत. हा सामना भारताने खेळला नाही तर पाकिस्तानला सरळसरळ विजय मिळेल. श्री. राऊत यांना तेच हवं आहे, कारण त्यांना भारताच्या विजयापेक्षा पाकिस्तानचा विजय अधिक प्रिय आहे असा प्रहार श्री. बन यांनी केला.
ओबीसी–मराठा आरक्षणावर राऊतांनी गप्प बसावं!
श्री.राऊत यांच्या आरक्षणविषयक वक्तव्यांवरही जोरदार हल्लाबोल करत श्री. बन म्हणाले की, तुमच्या महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाजाचं आरक्षण गेले. तुम्ही कोर्टात ते टिकवू शकला नाहीत. एवढंच नव्हे तर तुमच्या कारभारामुळे ओबीसींचं राजकीय आरक्षणही संपलं. ज्या लोकांनी ओबीसी-मराठा समाजाचे अतोनात नुकसान केलं तेच आज आरक्षणाच्या मुद्द्यावर वर तोंड करून बोलत आहेत हा निव्वळ ढोंगीपणा आहे. छगन भुजबळ असोत किंवा इतर नेते, याबद्दल संजय राऊतांनी एक शब्दही उच्चारू नये. त्यांना याबाबत बोलण्याचा नैतिक अधिकारच नाही. याउलट देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनेच मराठा समाजाला न्याय देण्याचं काम केलं आणि ओबीसींचं राजकीय आरक्षण पुन्हा आणले आहे अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
राऊतांच्या तोंडी पाकिस्तानची भाषा
खा. राऊत सातत्याने पाकिस्तानची भाषा बोलतात. पाकिस्तान म्हणतं की ‘ऑपरेशन सिंदूर’ मधले दहशतवादी जिवंत आहेत. मात्र आपल्या भारतीय जवानांनी त्यांचा पूर्णतः खात्मा केला आहे हे वास्तव श्री. राऊत अजूनही स्विकारताना दिसत नाहीत. पाकिस्तानच्या वक्तव्याची री ओढत श्री. राऊत देशबांधवांमध्ये गोंधळाचे वातावरण तयार करत आहेत. पाकिस्तान च्या रडगाण्याप्रमाणेच श्री.राऊत रुदाली भाषा करत आहेत अशीही खिल्ली त्यांनी उडवली.
