मारवाडी युवा मंच व संमेलनतर्फे भव्य प्रसाद वाटप कार्यक्रम
जालना/ जालना शहरात गणेशोत्सव सध्या मोठ्या उत्साहात, भक्तिभावात आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा होत आहे. शहरातील विविध मंडळांकडून आकर्षक देखावे, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर मारवाडी युवा मंच, जालना व मारवाडी संमेलन, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने गांधी चमन येथील ‘चमनचा राजा’ गणेश मंडळाजवळ गणेश भक्तांसाठी भव्य प्रसाद वाटप सोहळा आयोजित करण्यात आला.
4 क्विंटल इडली-चटणीचे वाटप
दिनांक 4 व 5 सप्टेंबर रोजी झालेल्या या प्रसाद वाटपात तब्बल 4 क्विंटल इडली-चटणीचे वाटप करण्यात आले. सकाळपासून सुरू झालेल्या या उपक्रमाला गणेश भक्तांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. अवघ्या काही तासांत हजारो भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला. मोठ्या प्रमाणावर महिलावर्ग, तरुणाई तसेच लहानग्यांचीही उत्स्फूर्त उपस्थिती होती.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मारवाडी युवा मंच व संमेलनाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष नियोजन केले होते. यात अध्यक्ष चेतन बोथरा, उपाध्यक्ष डॉ. पियुष होलाणी व राम सोमनी, सचिव रमेश मोदी, कोषाध्यक्ष मयुर मालपाणी यांच्यासह कार्यकर्ते उमेश पंचारीया, महेश भक्कड, उमेश बजाज, महावीर जांगीड, दिनेश बरलोटा, शाम लखोटीया, पवन जोशी, रविंद्र संचेती, अजय बोरा, विशाल धुत, दर्पण सकलेचा, अक्षय संचेती, आशिष राठी, सौरभ भकड, कान्हाराम जांगीड, निखील लुनीया, रामलाल सुतार, दर्शन पारख, युवराज धर्मा, हर्ष पंचारीया, कृष्णा उपाध्यक्ष व दर्पण जैन यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.
शिस्तबद्ध व स्वच्छतेची व्यवस्था
आयोजकांनी प्रसाद वाटपासाठी अपेक्षित मोठ्या गर्दीचा विचार करून शिस्तबद्ध रांगा, स्वच्छतेची काळजी, पिण्याच्या पाण्याची सोय तसेच प्रसाद भक्तांना सहज आणि सुरळीत मिळावा यासाठी स्वयंसेवक दिवसभर तैनात ठेवले होते. त्यामुळे प्रसाद वितरण कोणतीही गडबड न होता सुरळीत पार पडले.
या उपक्रमामुळे गणेशोत्सवातील भक्तिभावाबरोबरच सेवा, सामाजिक बांधिलकी आणि एकात्मतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले. अनेक ज्येष्ठ नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक करत “मारवाडी समाज नेहमीच सेवा कार्यात पुढाकार घेतो, या उपक्रमामुळे गणेशोत्सवाचा आध्यात्मिक आनंद अधिक वाढतो,” अशी प्रतिक्रिया दिली.
गांधी चौक (चमन), जालना येथे झालेला हा प्रसाद वाटप कार्यक्रम मारवाडी युवा मंच व संमेलनतर्फे गणेश भक्तांच्या मनात विशेष ठसा उमटवून गेला.
