लैंगिक आरोग्याबाबत गुप्ततेचा पडदा
दूर करण्याची गरज-डॉ. सुरज सेठीया
जालना/प्रतिनिधी/ लैंगिक आरोग्य ची माहिती घेणे हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे. चुकीची माहिती, भीती आणि सामाजिक दबावामुळे लाखो लोक गप्प राहतात. योग्य शिक्षण, संवाद आणि सहज उपलब्ध आरोग्यसेवा हीच खरी गरज आहे. त्यासाठीच दरवर्षी 4 सप्टेंबर रोजी जगभरात जागतिक लैंगिक आरोग्य दिन साजरा केला जातो. वर्ल्ड असोसिएशन फॉर सेक्शुअल हेल्थच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या उपक्रमाचा उद्देश लोकांना लैंगिक आरोग्य, शिक्षण आणि जागरूकतेबद्दल प्रोत्साहित करणे हा असल्याची माहिती मानसोपचार तज्ञ डॉ. सुरज राजेश सेठीया यांनी दिली.
या संदर्भात अधिक माहिती देताना डॉ सुरज सेठीया म्हणाले की, जागतिक लैंगिक आरोग्य दिनाची यावर्षीची संकल्पना, “लैंगिक न्याय : आपण काय करू शकतो?”असून, सर्वांना आपल्या शरीराबद्दल लैंगिकते बद्दल अणि पुनरुत्पादना बद्दल मुक्तपणे अणि निरोगी निर्णय घेण्याची शक्ति अणि संसाधने असावीत. त्याच बरोबर लैंगिक आरोग्य सेवांमध्ये समान प्रवेश असावा.
समाजातील गुप्ततेचा पडदा दूर करून लैंगिक आरोग्याविषयी उघडपणे बोलणे आवश्यक असल्याचे त्यातून अधोरेखित होते. भारतात अद्यापही या विषयावर बोलण्यावर संकोच मानला जात आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 2024 नुसार देशातील 67 टक्के प्रौढांना योग्य लैंगिक शिक्षण मिळालेलं नाही. प्रत्येक तीन जोडप्यांपैकी एकाला लैंगिक समस्या, नपुंसकत्व किंवा मानसिक ताण जाणवत असतो. परंतु, लाजेमुळे अनेक जण उपचार घेत नाहीत.
लैंगिक आरोग्याविषयी मोकळेपणाने बोलल्याने फक्त रोग टाळले जात नाहीत, तर नाती सुधारतात, मानसिक आरोग्य बळकट होतं आणि संवेदनशील समाज घडतो. वर्ल्ड असोसिएशन फॉर सेक्शुअल हेल्थ या संस्थेच्या पुढाकाराने सुरू झालेला हा उपक्रम लैंगिक आरोग्य, शिक्षण आणि जागरूकतेला नवी दिशा देणारा आहे.
भारतामध्ये मात्र अजूनही या विषयावर बोलणे म्हणजे संकोच, गैरसमज आणि कलंक मानला जातो. लैंगिक आरोग्य दिन हा केवळ आरोग्याचा प्रश्न नसून सामाजिक बदलाची चळवळ आहे. घराघरात आणि शाळांमध्ये याविषयी उघड संवाद होणे आवश्यक आहे. त्यासाठी लैंगिक आरोग्याविषयी शिक्षणाला प्रोत्साहन द्यावे, आरोग्यसेवा व समुपदेशन सहज उपलब्ध करून देण्याची गरज डॉ. सेठिया यांनी व्यक्त केली. जेव्हा आपण लैंगिक आरोग्यावर उघडपणे बोलतो, तेव्हा आपण केवळ रोग टाळत नाही, तर नाती सुधारतो, मानसिक आरोग्य मजबूत करतो आणि अधिक संवेदनशील समाज निर्माण करतो.यंदाच्या जागतिक लैंगिक आरोग्य दिनानिमित्त समाजातील प्रत्येक घटकाने हा पडदा दूर करून संवादाचे दार उघडणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करून ते म्हणाले की, लैंगिक आरोग्य विषयी अनेक गैरसमज आहेत. लैंगिक आरोग्य म्हणजे फक्त प्रजननक्षमता, असा एक गैरसमज आहे. वास्तविक पाहता यात शारीरिक, मानसिक आणि भावनिक समाधान, सुरक्षितता आणि आत्मविश्वास या सर्व गोष्टींचा समावेश होतो. लैंगिक समस्या म्हणजे लाजेची बाब असल्याचा दुसरा गैरसमज आहे. खरे पाहता या समस्या इतर आजारांप्रमाणेच वैद्यकीय उपचाराने सुधारता येतात. प्रत्येक वयोगटातील व्यक्तींना योग्य माहिती आणि मार्गदर्शनाची आवश्यकता असते. बर्याचदा चुकीची किंवा अपूर्ण माहिती गोंधळ निर्माण करते. अशाप्रसंगी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. लैंगिक आरोग्यावर बोलणे म्हणजे अश्लीलता नव्हे. हा संवाद आरोग्य, नाती आणि मानसिक संतुलन सुधारण्यासाठी आवश्यक असल्याचे डॉ. सेठीया म्हणाले.