30 ऑगस्ट रोजी ग्राम महसूल अधिकारी
व मंडळ अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन
जालना :- ग्राम पातळीवर महसूली कामे वेळच्या आत पुर्ण करुन त्यानुसार अभिलेखे अद्यावत करणे व तसेच ग्राम पातळीवर कार्यालयीन कामकाजात सुलभता येण्यासाठी ग्राम पातळीवरील अधिकारी- कर्मचारी यांना प्रशिक्षीत करणे आवश्यक आहे. त्यानुसार ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांच्या दैनंदिन कामकाजाची माहिती व्हावी यासाठी ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांच्यासाठी दि. 30 ऑगस्ट 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांनी दिली.
प्रशिक्षणाचे दि. 30 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 वाजता जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून सकाळी 10 ते 11 या कालावधीत सर्वांसाठी घरे योजनेबाबत, जिवंत 7/12 मोहिम, भोगवटादार वर्ग 02 मधुन भोगवटादार वर्ग 01 रुपांतरणाबाबत, शर्तभंग प्रकरणाबाबत उप जिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल, नायब तहसीलदार किशोर तायडे हे मार्गदर्शन करणार आहेत.
सकाळी 11 ते 11:45 या वेळेत अनुदान वाटप पध्दती, महसुली नकाशामध्ये दर्शविलेल्या सर्व पाणंद व शिवरस्त्यांचे मॅपींग करुन व रस्त्याच्या दुर्तफा वृक्ष लागवड करणे, ई-फेरफार, ई-चावडी आदी विषयावर उप विभागीय अधिकारी परतुर पद्माकर गायकवाड, सहायक महसूल अधिकारी भारती पांडे हे मार्गदर्शन करणार आहेत.
दुपारी 12 ते 1 या वेळेत महाराजस्व अभियान राबविणे, ॲग्रिस्टॅक, (Digital Public Infrastructure for Agriculture) योजना अंमलबजावणी, कमी जास्त पत्रक, तुकडे बंदी कायदा, विशेष अर्थसहाय्य योजनेतंर्गत डीबीटीसाठी पात्र लाभार्थ्यांची योजनेनिहाय माहिती संकलित करणे याविषयी अंबडचे उप विभागीय अधिकारी उमाकांत पारधी, अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण हे मार्गदर्शन करणार आहेत.
दुपारी 1 ते 2 या वेळेत वाळु/रेती निर्गती धोरण 2025, वाळु घाटांचे सर्वेक्षण, एम-सॅण्ड, घरकुल बांधकाम वाळु वाटप, दगड, मुरुम, माती उत्खनन व सर्वेक्षण, अवैध उत्खनन, शासकीय कामांना गौण खनिज परवानगीबाबत या विषयांबाबत जालना उपविभागीय अधिकारी रामदास दौंड, जिल्हा गौण खनिज अधिकारी तुषार निकम हे मार्गदर्शन करणार आहेत. तरी प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांनी वेळेवर उपस्थित रहावे. असेही सांगितले.
