कसोटी क्रिकेटचा आधारस्तंभ
भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा आधारस्तंभ असणारा भारताचा अनुभवी कसोटीवर चेतेश्वर पुजारा याने कसोटीसह सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून नुकतीच निवृत्ती घेतली. त्याच्या निवृत्तीने कसोटी क्रिकेटमध्ये एक तपाहून अधिक काळ अभ्येद असणारी भारताची भिंत ढासळली. त्याची निवृत्ती क्रिकेटप्रेमींना चटका लावून जाणारी ठरली कारण चेतेश्वर पुजारा हा कसोटी क्रिकेटचा खराखुरा आणि कदाचित शेवटचा राजदूत असेल. १५ वर्षापूर्वी म्हणजे २०१० साली जेंव्हा त्याने कसोटी संघात प्रवेश केला तेंव्हाच त्याने दाखवून दिले की कसोटी क्रिकेटमध्ये यशस्वी होण्यासाठी लागणारे तंत्र त्याच्याकडे आहे. राहुल द्रविड हा कसोटी क्रिकेटमधील सर्वात तंत्रशुद्ध फलंदाज. चेतेश्वर पुजारा हा देखील तसाच तंत्रशुद्ध फलंदाज. राहुल द्रविडप्रमाणेच त्याचाही बचाव भक्कम. बाद न होण्याची खबरदारी घेत खेळत राहण्याची त्याची शैली राहुल द्रविडसारखीच होती म्हणूनच त्याला द्रविडचा वारसदार म्हंटले जाऊ लागले त्यानेही त्याला दिलेली ही उपाधी सार्थ ठरवली. राहुल द्रविड प्रमाणेच तो ही तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस येऊ लागला. सुरुवातीचे फलंदाज लवकर बाद झाल्यावर एक बाजू लावून धरत संघाचा धावफलक वाढवत नेण्याची जबाबदारी तो पार पाडत असे. बाद न होता गोलंदाजांना थकवण्याची त्याची कला कसोटीतील खूप थोड्या फलंदाजांकडे होती. पुजारा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करायला आला की एक बाजू भक्कम व्हायची. तो नांगर टाकून फलंदाजी करत असल्याने इतर फलंदाज खोऱ्याने धावा काढत असे. त्यामुळे त्याकाळात भारताची मधली फळी ही जगातील सर्वोत्तम मधली फळी मानली जात होती. तो संघात असताना भारताने अनेक अविश्वसनीय विजय मिळवले. या विजयात त्याचा मोलाचा वाटा होता. पुजाराने काढलेल्या १९ शतकांपैकी १३ शतकांच्या वेळी भारताचा विजय झाला. त्याने केलेल्या ६० टक्के धावा भारत जिंकलेल्या कसोट्यांमधील आहेत. विराट कोहली ५८, राहुल द्रविड ३९, तेंडुलकर ३८ यांच्यापेक्षाही ही टक्केवारी अधिक आहे. पुजाराने खेळलेल्या १०३ कसोटीत ४४ च्या सरासरीने ७१९५ धावा धावा काढल्या. या धावा काढताना त्याने १९ शतके आणि ३५ अर्धशतके झळकावली. त्याची ही आकडेवारी पाहून टी २० चे समर्थक त्याला महान फलंदाजांच्या पंगतीत बसवणार नाही हे मान्य. त्याची ही आकडेवारी त्याची ओळख करून देण्यास पुरेशी नाही हे ही मान्य पण या धावा काढताना त्याने दाखवलेला संयम आणि त्याने दाखवलेली हिंमत ही त्याला निश्चितच महान फलंदाजांच्या पंगतीत बसवेल. आक्रमणास प्रतिआक्रमणाने उत्तर देण्याऐवजी त्यांचा आत्मविश्वास खच्ची करण्यावर त्याचा भर असे. तो बाद होत नाही हे पाहून वैतागलेले वेगवान गोलंदाज त्याला इजा पोहचेल अशी गोलंदाजी टाकत. वेगवान गोलंदाजांचा मार खाल्यावरही तो डगमगत नसे. प्रत्येक चेंडू, प्रत्येक षटक आणि प्रत्येक सत्राचा विचार करून तो खेळत असे. २०१८ साली भारताने पहिल्यांदा ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकली त्यात त्याचे योगदान मोलाचे होते. त्यात त्याने ५०० हून अधिक धावा केल्या. विशेष म्हणजे या धावा काढताना त्याने १२०० पेक्षा अधिक चेंडूचा सामना केला. या मालिकेत त्याला मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले होते. २०१७ मध्ये त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच एका कसोटीत ५२५ चेंडूचा सामना केला ही भारतीय कसोटी इतिहासातील ऐतिहासिक घटना ठरली. देशासाठी सर्वकाही पणाला लावणारा पुजारा सारखा खेळाडू भारतीय क्रिकेटला लाभला हे भारतीय क्रिकेटचे भाग्यच. पुजारा म्हणजे विश्वास आणि समर्पणाचे दुसरे नाव. तो जरी निवृत्त झाला असला तरी कसोटी क्रिकेटमध्ये त्याने दिलेले योगदान क्रिकेटप्रेमी कधीही विसरू शकणार नाही. निवृत्तीनंतर तो समालोचक किंवा प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसेल. भारतीय कसोटी क्रिकेटचा आधारस्तंभ राहिलेल्या चेतेश्वर पुजाराला पुढील कारकिर्दीसाठी मनापासून शुभेच्छा!
-श्याम ठाणेदार