Tuesday, October 28, 2025
Homeऔरंगाबादजालना जिल्ह्यात एकाच दिवशी 1800 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित दोन हजार...

जालना जिल्ह्यात एकाच दिवशी 1800 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित दोन हजार ग्राहकांनी भरले दीड कोटींचे वीजबिल छत्रपती संभाजीनगरमधील पथकांची धडक कारवाई

जालना जिल्ह्यात एकाच दिवशी

1800 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

दोन हजार ग्राहकांनी भरले दीड कोटींचे वीजबिल

छत्रपती संभाजीनगरमधील पथकांची धडक कारवाई

जालना : जिल्ह्यातील ग्राहकांकडील थकबाकी वसुलीसाठी महावितरणच्या परिमंडल कार्यालयाने पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरहून अभियंते व तंत्रज्ञांची पथके पाठवली. या पथकांनी सोमवारी (25 ऑगस्ट) रोजी राबवलेल्या विशेष मोहिमेत जिल्ह्यातील विविध भागांतील अठराशेहून अधिक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला. या पथकांना 73 अधिक लोक वीजचोरी करताना आढळून आले. छत्रपती संभाजीनगरची पथकांनी जिल्ह्यात सलग दुसऱ्या आठवड्यात केलेल्या धडक कारवाईमुळे वीजबिल थकबाकीदार व वीजचोरांत खळबळ उडाली आहे.

                     जालना जिल्ह्यातील घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर वर्गवारीतील 1 लाख 27 हजार 532 ग्राहकांकडे वीजबिलांची 125 कोटी 28 लाख रुपयांची थकबाकी आहे. ती वसूल करण्यासाठी महावितरणतर्फे विविध मोहिमा राबवण्यात येतात. मात्र वीजबिल भरण्यास सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने छत्रपती संभाजीनगर परिमंडलाचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी जालना जिल्ह्यात वीजबिल वसुलीसाठी छत्रपती संभाजीनगर शहर व ग्रामीण मंडलातील शाखा अभियंते व तंत्रज्ञांची पथके पाठवण्यास सुरुवात केली आहे. थकबाकीदार ग्राहकाकडून वीजबिल वसूल करणे अन्यथा वीजपुरवठा खंडित करणे, हे दोनच पर्याय या पथकांना देण्यात आले आहेत. त्यानुसार सोमवारी (25 ऑगस्ट) रोजी जालना शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांत अभियंता व तंत्रज्ञांची तब्बल 87 पथके दाखल झाली. अधीक्षक अभियंता संजय सरग, कार्यकारी अभियंता वेंकटेश पेन्सलवार, सोमनाथ मठपती यांच्या नेतृत्वाखाली या पथकांसह स्थानिक अभियंते व कर्मचाऱ्यांनी जालना शहरातील जुना जालना, मस्तगड, शनिमंदिर रोड, अंबड चौफुली, भाग्यनगर, सराफा बाजार, बडी सडक, सदर बाजार, मंठा चौफुली, कन्हैय्यानगर, चंदनझिरा, मोतीबाग, संजयनगर, दु:खीनगर, शंकरनगर तसेच अंबड, शहागड, महाकाळा, गोंदी, घनसावंगी, रांजणी, तीर्थपुरी, मंठा व परतूर या गावांत वीजबिल वसूल करण्यासह वीजचोरी पकडण्याची धडक मोहीम राबवली.

                     या पथकांनी दिवसभरात एकूण 3941 ग्राहकांची तपासणी केली. त्यात 2069 ग्राहकांनी त्यांच्याकडील वीजबिलाचे 1 कोटी 51 लाख रुपये भरून वीजपुरवठा खंडित होण्याची कारवाई टाळली. तर 1825 ग्राहकांनी वीजबिल भरण्यास टाळाटाळ केली, त्यांचा वीजपुरवठा तातडीने खंडित करण्यात आला, तर 47 ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला. थकबाकी वसुलीबरोबरच या पथकांनी वीजचोरीही पकडली आहे. यात 73 ग्राहकांवर कारवाई करण्यात आली.

                     दरम्यान, जिल्ह्यात ही मोहीम यापुढेही नियमितपणे सुरू राहणार आहे. छत्रपती संभाजीनगरची शहर व जिल्ह्यातील अभियंते व कर्मचाऱ्यांची पथके जालना जिल्ह्यातील विविध शहरे व गावांना अचानक भेटी देणार आहेत. या मोहिमेत थकबाकीदार वीजग्राहकांकडून वीजबिल वसुली अथवा वीजपुरवठा खंडित होण्याची कारवाई, हे दोनच पर्याय आहेत. थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केल्यानंतर कुणी परस्पर वीजपुरवठा जोडला तर ग्राहकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा महावितरणने दिला आहे. त्यामुळे ग्राहकांनी आपल्या चालू वीजबिलांसह थकबाकी भरून महावितरणला सहकार्य करावे तसेच अधिकृत वीजजोडणी घेऊनच वीजवापर करावा, असे आवाहन मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments