Tuesday, October 28, 2025
Homeऔरंगाबादमहात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा एकत्रित साहित्यातून नव्या पिढीपर्यंत...

महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा एकत्रित साहित्यातून नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा एकत्रित साहित्यातून नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई :-  क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा त्यांच्या एकत्रित साहित्याच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत जाईल. या साहित्यामुळे नवीन पिढीला प्रेरणादायी दिशा मिळून यशस्वी होण्याचा मार्ग मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या समग्र वाङ्मयाचे प्रकाशन करण्यात आले. इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत असलेल्या महाज्योती संस्थेमार्फत ह्या महावाङ्मयाची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच यावेळी इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या नव्या संकेतस्थळाचे उद्घाटनही मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, मंत्रिमंडळातील अन्य मंत्री तसेच विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यामध्ये महात्मा फुले यांचे २३ आणि सावित्रीबाई फुले यांचे १४ ग्रंथ, त्यांचा पत्रव्यवहार तसेच महत्त्वपूर्ण दस्तऐवजांचा समावेश आहे. पुण्यातील महात्मा फुले वाडा आणि साताऱ्यातील नायगाव येथील सावित्रीबाईंच्या शिल्पसृष्टीची रंगीत छायाचित्रे हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे.

उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या मान्यतेने हा ग्रंथ प्रकाशित झाला असून, एकूण २७ हजार प्रती छापण्यात आल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यात ७५० प्रतींचे वितरण जिल्हास्तरीय शिक्षण विभाग, आर्थिक विकास मंडळ तसेच आश्रमशाळा व वसतिगृहांमार्फत करण्यात येणार आहे.

विभागाच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून विभागाच्या सर्व योजना, शिष्यवृत्ती, वसतिगृहे तसेच विविध शासकीय उपक्रमांची माहिती नागरिकांना एका ठिकाणी सहज उपलब्ध होणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेले हे संकेतस्थळ वापरकर्त्यासाठी सोयीस्कर, सुलभ असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments