पुण्यातील वाहतूक कोंडीवर योग्य उपाययोजनांची गरज-डॉ.हुलगेश चलवादीसार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करा; बसपचे आवाहन
पुणे:- दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक, त्यातून निर्माण होणारी कोंडी पुणेकरांसाठी गंभीर समस्या बनली आहे. ‘टॉमटॉम ट्रॅफिक इन्डेक्स-२०२४’ च्या अहवालानुसार पुण्यात १० किमीचा प्रवास करण्यासाठी सरासरी ३३ मिनिटे २२ सेकंद लागतात. अशा ५०० शहरांच्या यादीत पुणे चौथ्या क्रमांकावर आहे. पुण्यातील ट्रॅफिक गती बहुतांश शहरांपेक्षा बरीच कमी असून पुणेकर दरवर्षी जवळपास १०८ तास फक्त ट्रॅफिक मध्ये घालवतात,असे अभ्यासातून समोर आले आहे. ही स्थिती अत्यंत गंभीर आहे. वाहतूक कोंडीचे वाढते प्रमाण कमी करण्यासाठी प्रशासनाने दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज आहे, असे मत बहुजन समाज पक्षाचे प्रदेश महासचिव,पश्चिम महाराष्ट्र झोन मुख्य प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी यांनी बुधवारी (ता.२०) व्यक्त केले.
वाहतूक कोंडीमुळे गैरसोय तर होते, शिवाय याचे थेट परिणाम अर्थव्यवस्थेसह आरोग्य, नागरिकांच्या मानसिक ताणावर होतो. मुख्य मार्गांवर योग्य वाहतूक सिग्नल व्यवस्था, अनधिकृत पार्किंगवर नियंत्रण तसेच वर्दळीच्या ठिकाणी जड वाहनांवर बंदी घालण्यासारख्या उपाययोजना तातडीने राबवणे आवश्यक असल्याचे मत डॉ.चलवादी यांनी व्यक्त केले.
सार्वजनिक वाहतूक सक्षम केल्याशिवाय वाहतूक कोंडी कमी होणार नाही. पीएमपीएमएल बसेसची संख्या वाढवून वाहतुकीवरील ओझं कमी होईल, याची हमी दिली पाहिजे. मेट्रो व बसेसचा लास्ट माईल कनेक्टिव्हिटी मजबूत करणे, कारपूलिंग व कंपनी शटल्स ला प्रोत्साहित केले पाहिजे. तसेच सायकल व पादचारी मार्ग उभारावे लागतील, अशी भूमिका डॉ.चलवादी यांनी मांडली.
वाहतूक कोंडीवर स्थायी तोडगा निघावा यासाठी फ्लायओव्हर्स, अंडरपास, मल्टी-लेव्हल पार्किंग हब्स, तसेच रिंग रोड व मेट्रो विस्तार प्रकल्प वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. राज्य सरकारचे २०२६ पर्यंत पुण्यातील सरासरी वाहनगती ३० किमी प्रतितास करण्याचे उद्दिष्ट स्वागतार्ह आहे. मात्र १.३ लाख कोटींच्या मोबिलिटी योजनेत पारदर्शकता आणि काटेकोर अंमलबजावणी गरजेची आहे, असे मत डॉ.चलवादी यांनी व्यक्त केले.वाहतूक नियमांचे पालन, लेन डिसिप्लिन, ‘नो हॉर्निंग’ मोहीम आणि शाळा-कार्यालयांना फ्लेक्सिबल टाइमिंग्स देणे यामुळे कोंडी लक्षणीय प्रमाणात कमी होऊ शकते,असे देखील डॉ.चलवादी यांनी व्यक्त केले.
