Monday, October 27, 2025
Homeऔरंगाबादरोटरी दत्तक ग्राम नजीक पांगरी येथील शाळेत संगणक प्रयोगशाळेचे लोकार्पण

रोटरी दत्तक ग्राम नजीक पांगरी येथील शाळेत संगणक प्रयोगशाळेचे लोकार्पण

रोटरी दत्तक ग्राम नजीक पांगरी येथील
शाळेत संगणक प्रयोगशाळेचे लोकार्पण
डिजिटल युगात प्रत्येक विद्यार्थी संगणक साक्षर होणे काळाची गरज- सुनील रायठठ्ठा
जालना/प्रतिनिधी/ रोटरी क्लब  ऑफ जालनाने सामाजिक उपक्रमांतर्गत नजीक पांगरी (ता. बदनापूर) हे गाव दत्तक घेतले असून, गावाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध प्रकल्प राबविण्याचा संकल्प केला आहे. हॅपी स्कूल उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नवी संगणक प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे. विनोदराय इंजिनिअरिंगचे व्यवस्थापकीय संचालक तथा ज्येष्ठ रोटरियन सुनील रायठठ्ठा यांच्या पुढाकारातून पाच संगणक उपलब्ध करून देण्यात आले असून, सोमवार दि. 18 ऑगस्ट रोजी या प्रयोगशाळेचे लोकार्पण समारंभपूर्वक करण्यात आले. तसेच यावेळी रोटरी कम्युनिटी समूहाची स्थापना करण्यात आली.
        संगणक प्रयोगशाळेचे उद्घाटन सुनील रायठठ्ठा यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी रोटरी क्लबच्या अध्यक्षा सौ. वर्षा पित्ती होत्या. व्यासपीठावर क्लबचे सचिव लक्ष्मीनिवास मल्लावत, ज्येष्ठ रोटरियन अरुण अग्रवाल, प्रकल्प प्रमुख रमेश मगरे, सरपंच-उपसरपंच व मुख्याध्यापक डॉ. शिवाजी उगले उपस्थित होते.
     उद्घाटनपर भाषणात सुनीलभाई रायठठ्ठा म्हणाले की, आजचा काळ हा डिजिटल युगाचा काळ आहे. प्रत्येक व्यवहार, प्रत्येक व्यवसाय, प्रत्येक शिक्षणाची पायरी संगणकाशिवाय अपूर्ण आहे. मुलं संगणक साक्षर झाली नाहीत, तर ती भविष्यातील संधींपासून वंचित राहतील. ग्रामीण भागातील शाळांनाही आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडणे ही काळाची गरज आहे. या प्रयोगशाळेमुळे मुलांना प्रत्यक्ष संगणक हाताळण्याची संधी मिळेल आणि त्यांचा आत्मविश्वास वाढेल. भविष्यातील नोकरीच्या आणि शिक्षणाच्या संधींमध्ये संगणक शिक्षण ही मुलांची खरी ताकद ठरेल. माझी इच्छा आहे की या गावातील प्रत्येक विद्यार्थी संगणक साक्षर व्हावा आणि गाव डिजिटलदृष्ट्या प्रगत व्हावे, असे ते म्हणाले.
     अध्यक्षीय समारोपात सौ. वर्षा पित्ती म्हणाल्या की, रोटरी क्लबने नजीक पांगरी गाव दत्तक घेऊन येथे भौतिक तसेच शैक्षणिक विकास घडविण्याचा निर्धार केला आहे. शाळेला ‘हॅपी स्कूल’ बनविण्याचा संकल्प असून, त्याचाच भाग म्हणून संगणक प्रयोगशाळेची स्थापना करण्यात आली आहे. पुढील बैठकीत गावाच्या समस्या आणि विकासाच्या गरजांवर चर्चा करून रोटरी क्लब त्यावर ठोस पावले उचलणार  उचलणार असल्याने समस्या आणि आवश्यक सुविधांची यादी सरपंच, उपसरपंचांनी आमच्याकडे द्यावी, असे त्या म्हणाल्या.
     मुख्याध्यापक डॉ. शिवाजी उगले म्हणाले की, संगणक प्रयोगशाळेमुळे आमच्या विद्यार्थ्यांना डिजिटल जगात पाऊल ठेवणे सोपे होईल. या सुविधेमुळे मुलांचा सर्वांगीण शैक्षणिक विकास होणार असून, आम्ही रोटरी क्लबचे मनःपूर्वक आभारी आहोत.
     या कार्यक्रमाला रोटरी परिवारातील अकलंक मिश्रीकोटकर, सुनीती मदान, सुरेश मगरे, किशोर देशपांडे, डॉ. दीपक बगडिया, रवी भक्कड, अर्चना देशपांडे, प्रशांत महाजन यांच्यासह गावातील मान्यवर, नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments