स्वस्त धान्य दुकानदारांनी अनियमितता केल्यास कारवाई
- कुंभेफळ येथील स्वस्त धान्य दुकानाचे प्राधिकारपत्र रद्द
जालना :- रास्त भाव दुकानामध्ये कोणत्याही प्रकारची अनियमितता होणार नाही याबाबत जालना जिल्ह्यातील सर्व रास्तभाव दुकानदारांनी दक्षता घ्यावी, तसेच नियमित धान्य वाटप करण्याबाबत उचित कार्यवाही करावी. स्वस्त धान्य दुकानदारांनी अनियमितता केल्यास महाराष्ट्र अनुसूचित वस्तु (वितरणाचे विनियमन) आदेश, 1975 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
रास्त भाव दुकानामध्ये नियमित अन्नधान्य वाटप न करणे, धान्याची पावती न देणे, दुकान वेळेत सुरु न ठेवणे, नोंदवह्या नसणे, दर्शनिय भावफलक नसणे आदि गंभीर त्रुटी तपासणीदरम्यान आढळुन आल्या आहेत. महाराष्ट्र अनुसूचित वस्तु (वितरणाचे विनियमन) आदेश, 1975 मधील नियम 3 (क) अंतर्गत जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर यांनी जालना तालुक्यातील कुंभेफळ येथील रास्त भाव दुकानदार गणेश श्रीमंत गवारे यांचे दुकान क्र.105 चे प्राधिकारपत्राची 100 टक्के अनामत रक्कम जप्त करुन प्राधिकारपत्र रद्द करण्यात आले. यावेळी सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश जाधव, निरीक्षण अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांनी रास्तभाव दुकानाची तपासणी केली व प्रत्यक्ष स्थळपाहणी करुन ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या.
