Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादशूद्र ओबीसी आगरी कोळी बांधवांना न्याय का मिळत नाही?

शूद्र ओबीसी आगरी कोळी बांधवांना न्याय का मिळत नाही?

शूद्र ओबीसी आगरी कोळी बांधवांना न्याय का मिळत नाही?
माझ्या वयाची पस्तीस वर्षे देव न्याय देतो.या धर्मश्रद्धेवर विश्वास ठेवून गेली.या काळात जीवनाची जी स्वप्ने पाहिली त्यात कष्ट,कर्तव्य,प्रयत्न यांचे सातत्य होते.परंतु पाहिलेली स्वप्ने पूर्ण होत नाहीत.हा अनुभव होता.याचा हळू हळू परिणाम मनावर होत होता.उत्तम शिक्षण,शारीरिक,मानसिक योग्यता असूनही पूर्ण पगाराची शिक्षकाची नोकरी मला का मिळत नाही?.नोकरीच्या हक्कांसाठी संघर्ष सुरू असताना,झालेला अन्याय हा माझे नशीब आहे.प्रारब्ध आहे.पूर्व जन्मीचे पाप आहे.देवाच्या,धर्माच्या सेवेत मी कमी पडतोय.हिंदू मनाच्या सांत्वन पर अनेक उपदेश,मग मांत्रिक,ज्योतिष हे सारे मार्ग मी अनुभवले..योग्य उत्तर मिळत नव्हते.यातूनच माझ्यासारखा अन्याय इतर लोकावर होतोय.याची जाणीव,संवेदना जागी झाली.त्यांना न्याय देत असताना,उच्चवर्णीय लोकांचा माझ्यावर जीवघेणा हल्ला झाला.मग पोलिस स्टेशन,न्यायालय,पत्रकार यांच्या भेटी,न्यायासाठी झाल्या.देव धर्म नवस यांच्यापेक्षा लोकशाहीतील नेते,प्रशासन न्यायालये,मिडिया हे नवे पर्याय समोर आले.ग्रामीण भागातून आलेल्या धर्मश्रद्ध ओबीसी शूद्र तरुणासमोर लोकशाही ही देव धर्म यांच्यापेक्षा वेगळी व्यवस्था आहे.हे अनुभवातून समजू लागले.
   पुढील काळात आंबेडकरी चळवळीतील काही कार्यकर्ते मला भेटले.या अगोदर हिंदू म्हणून जे शूद्र ओबीसी मध्ये जगण्याचे तत्वद्न्यान असते.ते मी जगलोय.यात आजच्या संघ परिवाराचे मागील तीन पिढ्यांचे हिंदू संस्कार,माझ्या चिंचोटी अलिबाग गावातली ज्वलंत हिंदुत्वाची शिवसेना.सर्व धार्मिक नवस,सायास,राम,कृष्ण,हनुमान या देवतांचे सण,उत्सव,जत्रा याचे उच्चतम धर्म संस्कार सोबत होतेच.ज्या दिवशी आंबेडकरी विचारांचे लोक भेटले.त्यादिवशी मी नवे जग पाहिले.अगोदरच्या सर्व प्रथा नाकारून जीवनाच्या वाटेवर अतिशूद्र अवस्थेतून आम्हा शूद्र ओबीसी पेक्षा खात्रीचे,शाश्वत मतांचे, तर्क बुद्धीने जगणारे लोक हे माझ्यासाठी याच जगातले,पृथ्वीवरचे नवे आश्चर्य होते.ईश्वर,धर्म,देवळे,जत्रा यात्रा सण उत्सव यांच्या समोर पर्याय म्हणून आपण स्वतः माणूस आहोत. हा पर्याय मला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन चरित्र आणि समग्र विचार साहित्याच्या अभ्यासातून मिळाला.मी शूद्र ओबीसी आगरी आहे म्हणजे काय? हिंदू धर्मातले माझे आजचे स्थान काय? या साऱ्या प्रश्नाची उत्तर मिळाली.
 माझ्या आई वडिलांची आर्थिक स्थिरता न्याय,पारिवारिक सुखाची स्वप्ने घेऊन शिक्षकी पेशा स्वीकारला होता.गरिबी विरोधी लढण्याचा तो एक नोकरीचा मार्ग होता.दोन नोकऱ्या १९९० ते २००५ या  काळात केल्या.सोडाव्या लागल्या.यश नाही.यातील माझ्या चुका मी शोधल्या.परंतु माझ्यापेक्षा नोकरीतील वरिष्ठ,उच्चवर्णीय प्रशासक,शिक्षण व्यवस्था,पुढे लोकशाही लोकसेवक,प्रशासन,पोलिस,न्यायालये,समाज यातील शूद्र ओबीसी म्हणून माझ्यासमोर भक्कम तटबंदी प्रमाणे आडवे जाणारे संघटित लोक मला दिसू लागले.यातूनच माझी आगरी जात ओबीसी समाज आणि स्त्री शूद्र अतिशूद्र यांचे दुःख महात्मा जोतिबा फुले सावित्री माई फुले यांच्या विचारातून समजून घेतले.
  नवस,अगरबत्ती,धूप,फुले,सण उत्सव यातील धर्म नक्की काय आहे? ही सारी कर्मकांडे करूनही तथागत बुद्धांना मानवी दुःखाचे कारण समजत नव्हते.तेव्हा त्यांनी दुःखाचे मूळ शोधताना केलेला प्रवास मी समजून घेतला.सोबत वास्तव वादी चार्वाक वाचला.जीवनात नवी चळवळ सुरू झाली.माझ्या जातीचे पुढारी नारायण नागू पाटील हे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सागितलेल्या मार्गावर खोत सावकारी अर्थात उच्चवर्णीयाविरोधात का लढत होते?.मग लोकनेते दि बा पाटील,ॲड दत्ता पाटील यांचा जमीन मालकी,आरक्षण,राजकीय संघर्ष प्रत्यक्ष सहवासात अनुभवला.अर्थात छत्रपती शिवाजी महाराज,जोतिबा फुले,सावित्री माई,राजर्षी शाहू महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,सर्व आगरी कोळी ओबीसी नेते यांचा न्यायासाठी अखंड संघर्ष सुरू आहे.
   मनुस्मृतीच्या संघटित व्यवस्थेत शूद्र ओबीसींना पूर्ण न्याय नाहीच.हजारो वर्षे स्त्री शूद्र अतिशूद्र या शोषित लोकांचा हा संघर्ष उच्च वर्णीय हिंदू ब्राह्मण क्षत्रिय वैश्य सुखात जगून पहात आहेत.ज्या दिवशी मी शूद्र ओबीसी म्हणून असलेली विषम अवस्था मी समजून घेतली.तेव्हा “अत्त  दीप भव”या तत्वाने म्हणजे मीच माझ्या सुख दुःखास जबाबदार आहे.या न्यायाने पहिल्याच वर्षी मी माझ्या घर जमीन हक्कांचे स्वप्न पूर्ण केले.नोकरी सोडून,रस्त्यावर येऊन,एक वेळ विधानसभा,दोन वेळा लोकसभा लढलो,लोकांमध्ये जाऊन बोलू लागलो.लिहू लागलो.लढू लागलो.एकच जन्म परंतु दोन वेगळे अनुभव घेतले.एक गुलाम मानसिकतेच्या श्रद्धेत सुख मानून जगण्याच्या हिंदुत्वाचा! दुसरा जीवनाकडे प्रत्येक क्षण सजग ,सावधान पद्धतीने जगत निसर्ग न्यायाची क्रिया प्रतिक्रिया,सुख दुःख डोळस बुद्धीने जगण्याचा.जग सतत बदलते आहे.पूर्वीची म्हणजे २००५ ची स्थिती बदलू शकते.आज नवी स्थिती आहे.जग परिवर्तनशील आहे.हे बुद्ध सांगतात.दुसरीकडे आजचे शूद्र ओबीसींचे जीवन पूर्व जन्माचे पाप आहे.ते कधी या जन्मी बदलू शकत नाही.हे हिंदू स्थितीशील तत्वद्न्यान अगदी पुनर्जन्म,स्वर्ग,नर्क, चमत्कार आत्मा,भुते हे थोतांड आहे.हा अनुभव मी समजून घेतला.
   आज रात्रभर मी ज्या प्रश्नाने झोपलो नाही.त्या प्रश्नांमुळे हा लेख लिहिला.आमच्याकडे अत्यंत लोकप्रिय प्रभात पर्व चॅनलवर मी लोकांचे प्रश्न मांडले.लोक म्हणतात राजाराम पाटील आपण फक्त बोलता.प्रश्न सोडवत नाही.समोर कुणी बोलत नाही.मागे मात्र बोलतात.मला याचा राग नाही.हा प्रश्नच ओबीसी जीवनाचा प्रश्न आहे. २००५ नंतर मी लोकांच्या जमीन घरे जंगल समुद्र पाणी शिक्षण आरक्षण प्रश्नावर काम करतोय.
अर्थात नवस,पूजा पद्धतीने नाही.तर नव्या लोकशाहीतील नेते,प्रशासन,पोलिस न्यायालये वकील,मोर्चे,प्रबोधन या मार्गावर अनेक युट्यूब चॅनल,वृत्तपत्र येथे बातम्या येतात.लोक मला बोलावतात.मी प्रत्यक्ष जागेवर जाऊन प्रश्न समजून घेतो.शासनाकडे अर्ज करतो.पाठ पुरावा करतो.अनेक वर्षे लोकांना न्याय मिळत नाही.पाच कोटी रुपये किमतीची जमीन लोकांना पाच रुपयांच्या किंवा पाच लाखांच्या न्यायालयातील दाव्याने हवी.शत्रू पन्नास लाख घेऊन न्याय खरेदी करतोय.मुळात मनुस्मृती नुसार त्यांना ही जमीन शूद्र ओबीसींना द्यायचीच नाही.याबद्दल आपण देशाची परिस्थिती पाहतोय.नोटबंदी कोरोना काळानंतर आर्थिक मंदी आहेच.परंतु लोकांच्या न्यायाला सरकारी  अडथळे वाढलेत.कालच पुण्यातील मागास वर्गीय मुलींच्या पोलिस स्टेशन मधील अत्याचार प्रकरण पाहिले.कायद्याची चर्चा पाहिली.
  शिवसेना पक्ष हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाचा उद्धवजींचाच,परंतु तो एकनाथ शिंदे याचा कसा? झाला आहे? ही सारी न्यायव्यवस्था सांगतेय.लोकांच्या डोळ्यांना दिसणारा न्याय नाकारला जातो.प्रत्यक्ष पुरावे आपला देश मानत नाही.  पेहेलगावचे अतिरेकी आले कुठून ? या प्रश्नाचे उत्तर लोकसभेत विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना मिळत नसेल.तर न्याय आहे कुठे?.धर्म श्रध्दा जपणाऱ्या हिंदुना या लोकशाहीत याचे उत्तर हवे असेल?.तर संविधानकार.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा नवा दृष्टिकोन,तर्क समजून घ्यावा लागेल.सामान्य माणूस हिंदू,मुस्लिम,ख्रिश्चन,पारशी, बौद्ध,जैन,ओबीसी,एससी एसटी यांना तो आंबेडकरी विचार आत्मसात करावा लागेल.या देशातील मनुस्मृती प्रणित धर्म व्यवस्थेला म्हणजेच ब्राह्मण क्षत्रिय वैश्य सत्ताधारी जातीना न्यायिक बुद्धी नाही.जागतिक कीर्तीच्या इंग्रज लोकांचे हे म्हणणे आहे.
आम्हा ओबीसी एससी एसटी स्त्रिया यांच्या शोषणाचा धर्म इथे हजारो वर्षे होता.आज आहे.आम्ही लढलो नाही तर तो असाच राहील.
    आम्हाला न्याय न मिळण्याचे कारण लोक लोकसभा,राज्यसभा,विधानसभा,विधान परिषद,जिल्हाधिकारी,पोलिस,न्यायालये,रस्ते इथे लोक वेड्यासारखे शोधत आहेत.सारे उच्चवर्णीय विषमतेचा सुखाचा क्रूर,अमानुष आनंद घेत आहेत.अदानी,अंबानी विमानतळे,बंदरे,उद्योग,मुंबई सहज ताब्यत घेत आहेत.आम्ही आख्या आयुष्यात मुंबईत ३३० चौरस फुटांचे घर घेऊ शकत नाही.या “शूद्र” ओबीसी जीवनाचे प्रश्न समजून घेणे .ही आपली जबाबदारी आहे. भावा बहिणींना समजावून सांगा.एक बातमी,एक अर्ज एक मोर्चा,न्याय देत नाही.तुमचे स्वतःचे जुने ,देवभोळे जीवन बदलावे लागेल.निसर्ग न्याय,तर्क,बुद्धी,नवा वैद्न्यानिक विचार समजून घ्यावा लागेल.मुलांना जागतिक दर्जाचे शिक्षण द्या.
   स्त्री शूद्र अतिशूद्र यांच्या न्यायाचा संघर्ष २५०० वर्षे बुद्ध चार्वाक महावीर यांनी सुरू केला.छत्रपती शिवराय,फुले शाहू आंबेडकर यांनी चालविला.ओबीसी नेते लोकनेते दि बा पाटील यांनी चालविला..न्यायासाठी संयम,पैसे,मानवी श्रम,नेतृत्व,प्रबोधन यांचा अखंड संघर्ष आहे.आपला शत्रू मोठा आहे.संघटित आहे.त्यात देव धर्म आणि ब्राह्मण क्षत्रिय वैश्य सगळी सत्ताकेंद्रे आहेत.आपल्याला न्याय देता देता मला.फार वाईट अनुभव आले.कुळ कायदा,सेझ,सिडको,मुंबई कोळीवाडा गावठाण हक्क यातील आपले सारे प्रयत्न आपल्या शत्रू समोर तोकडे पडतात.मला माहीत आहे .अनेक वर्षे लढून न्याय नाही.आम्ही मागास शूद्र आहोत. म्हणून गरीब आहोत.लढण्यासाठी पैसे,साधने,आमच्याकडे शत्रूच्या तुलनेत जवळ जवळ नाहीतच.शूद्रांना या देशात देव धर्म पुरोहित,क्षत्रिय,वैश्य न्याय नाकारतात.तुमच्यासारखीच गरिबी माझ्याकडे ही आहे.आपण कधी येऊन पाहू शकता.परंतु मी न्यायासाठी आग्रह कधी सोडला नाही. 
आज होय माझ्याकडे घर,परिवार आणि तुम्हा आम्हाला एक वेळ मिळेल एवढे अन्न आहे.निवारा आहे.आपण सोबत असाल तर आमच्या पूर्वजांनी दिलेला हा ओबीसी लढा पुढे नेऊ शकतो.याच क्षणी याच जन्मी तो पूर्ण करणे अवघड आहे.लढाई मोठी आहे.निसर्ग सोबत आहे.ओबीसींना न्याय का मिळत नाही? हे समजून घेतले?.तर मिळण्याचा मार्ग मिळेल. जगात दुःख आहे.दुःखाचे कारण शोधता येईल.ते कारण संपविले,तर दुःख समूळ संपेल.काही चुकले असेल,तर माफ करा.न्यायाच्या मार्गावर निराश होऊ नका.“संघर्ष हेच माझे जीवन आहे.” डॉ.बाबासाहेब आंबेडकर.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments