Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादभारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार विक्रम साराभाई

भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार विक्रम साराभाई

भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार विक्रम साराभाई
       भारताच्या अंतराळ संशोधनाचे पितामह आणि आधुनिक भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार म्हणून  ओळखले जाणारे महान संशोधक विक्रम साराभाई यांची उद्या म्हणजे १२ ऑगस्ट रोजी जयंती. अंतराळात भरारी मारणारा भारत असे आपण म्हणतो. एकवेळ सुई ही बनवू  न शकणारा आपला भारत आज विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात स्वयंपूर्ण बनला आहे. अंतराळ विज्ञान क्षेत्रात  तर भारताने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अंतराळ विज्ञान क्षेत्रात भारत जागतिक महासत्ता बनत आहे याचे सर्व श्रेय विक्रम साराभाई यांनाच जाते. विक्रम साराभाई यांचा जन्म १२ ऑगस्ट १९१९ रोजी झाला. त्यांचे वडील प्रसिद्ध उद्योगपती होते त्यामुळे देशातील मोठ्या नेत्यांचे त्यांच्या घरी उठबस असायची. त्यांच्या वडीलांनाही विक्रम साराभाई यांनी राजकारणात यावे किंवा उद्योगपती बनावे असे वाटत होते पण नियतीच्या मनात वेगळेच होते. विक्रम साराभाई यांना गणित आणि विज्ञान विषयाची खूप आवड होती. १२ वि नंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी ते विदेशात गेले. केंब्रिज विद्यापीठात त्यांनी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. अतिशय तल्लख बुद्धीच्या विक्रम साराभाई यांनी अल्पावधीतच विज्ञान शाखेची पदवी पूर्ण केली. भारतात आल्यावर त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये नोबेल पुरस्कार विजेते सर सी व्ही रमण यांच्या मार्गदर्शनाखाली कोस्मिक किरणांवर संशोधन केले. १९४२ साली त्यांनी प्रसिद्ध नृत्यांगना मृणालिनी साराभाई यांच्याशी विवाह केला. त्यांना कार्तिक आज मल्लिका हे दोन अपत्य झाली. १९४५ साली ते ब्रिटनला गेले तिथे त्यांनी इन्वेस्टीगेशन इन ट्रॉपिकल लॅटिट्युडवर संशोधन करून पीएचडी मिळवली. ११ नोव्हेंबर १९४७ ला अहमदाबादला त्यांनी फिजिकल रिसर्च लॅबरोटरीची स्थापना केली. केरळ जवळील थुंबा हे ठिकाण लॉंच पॅड साठी निश्चित करण्यात आले कारण हे ठिकाण मॅग्नेटिक इक्वेटर लाईन ( चुंबकीय भूमध्य रेखा ) च्या अगदी जवळ होते पण त्याठिकाणी काही घरे होती तसेच एक चर्चही होते त्यामुळे तेथील लोक तेथून हटण्यास तयार नव्हते भौगोलिक आणि वैज्ञानिक कारणामुळे ही जागा खूप महत्वाची होती पण तेथील लोक ती जागा देण्यास तयार नव्हते शेवटी विक्रम साराभाई यांनी त्या लोकांची भेट घेतली त्या जागेचे महत्व त्यांना समजावून सांगितले. विक्रम साराभाई यांच्यामुळे ती जागा सरकारला देण्यास लोक तयार झाले. भारत सरकारने त्याठिकाणी थुंबा रॉकेट लॉंचिंग स्टेशनची स्थापना केली. २१ नोव्हेंबर १९६५ ला तिथून पहिल्या रॉकेटचे प्रेक्षपण करण्यात आले ते यशस्वी झाले. विक्रम साराभाई यांच्यामुळे हे शक्य झाले म्हणून भारत सरकारने या स्टेशनचे विक्रम साराभाई  स्पेस सेंटर असे नामांतर केले. विक्रम साराभाई स्पेस सेंटर तर उभारले गेले पण तिथे तज्ज्ञ संशोधकांचा तुटवडा भासू लागला. देशातील तरुण संशोधक विदेशात सेवा बजावत होते. विक्रम साराभाई यांनी त्यांना भारतात परतण्याचे आवाहण केले.  त्यांनी या संशोधकांना सांगितले की देशाचे बजेट कमी असल्याने आम्ही तुम्हाला परदेशात आहेत त्याप्रमाणे वातानुकूलित प्रयोगशाळा आणि ऑफिस देऊ शकणार नाही, पण टेबल खुर्ची आणि एक कपाट नक्की देऊ. भारत मातेच्या सेवेसाठी तुम्ही देशात परत या. त्यांच्या आवाहनाला अनेक संशोधकांनी प्रतिसाद दिला. वसंत गोवरीकरांसारखे महान शास्त्रज्ञ त्यांच्या आवाहानाला प्रतिसाद देऊन भारतात परतले.  त्यांनी तज्ज्ञ सांशीधकांची एक टीम बनवली त्यांच्या नेतृत्वाखालील या टीमने विमानाचे, अंतरिक्ष यानाचे ( रॉकेट ) उड्डाण यशस्वी व्हावे यासाठी जीवाचे रान केले. दिवस रात्र मेहनत केली. त्यांच्या या अविश्रांत मेहनतीचे फळ म्हणजे ‘आर्यभट्ट’ हा भारताचा पहिला उपग्रह अंतराळात झेपावला. अंतराळ क्षेत्रात भारताने पहिले यशस्वी पाऊल टाकले.  डॉ विक्रम साराभाई यांच्या अथक प्रयत्नांमुळेच भारतीय अवकाश संशोधन संस्थेची ( इसरो) ची स्थापना झाली. आयआयएम अहमदाबाद च्या स्थापनेतही त्यांचे मोलाचे योगदान आहे. १९६६ साली  डॉ होमी जहांगीर भाभा यांच्या निधनानंतर ते परमाणु ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष बनले. अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांची अध्यक्षपदे त्यांनी भूषवली. अवकाश संशोधनासोबतच टेक्सटाईल, फार्मासिटीकल, अणुऊर्जा, कला या क्षेत्रातही त्यांनी विशेष कामगिरी केली. आज भारत अंतराळ विज्ञान क्षेत्रात स्वयंपूर्ण आहे यामागे विक्रम साराभाई यांचे अथक परिश्रम, दूरदृष्टी आणि खंबीर नेतृत्व ह्यांचा मोलाचा वाटा आहे. डॉ अब्दुल कलाम यांनीही आपल्या अग्निपंख या आत्मचरित्रात विक्रम साराभाई यांच्या नेतृत्व गुणाचे कौतूक केले आहे. डॉ अब्दुल कलाम विक्रम साराभाई यांच्या विषयी म्हणतात, ‘ते स्वप्न पहायचे आणि ते प्रयक्षात उतरवण्यासाठी मेहनतही घ्यायचे. त्यांचे व्यक्तिमत्व आणि कार्य त्यांच्या सहकाऱ्यांसाठी नेहमीच प्रेरणास्रोत ठरले आहे. त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना वेगळी दृष्टी दिली. विक्रम साराभाई हे भारतीय अंतराळ युगाचे शिल्पकार आहेत.’ त्यांच्या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना पद्मभूषण व पद्मविभूषण या मानाच्या पुरस्काराने गौरविले आहे. विज्ञानाचा उपयोग मानवी जीवन सुखी व समृद्ध करण्यासाठी झटणाऱ्या या महान संशोधकाचे ३०डिसेंबर १९७१ साली थुंबा येथेच हृदयविकाराने निधन झाले. विक्रम साराभाई यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
श्याम ठाणेदार
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments