Monday, October 27, 2025
Homeऔरंगाबादईन्नरव्हील क्लबने प्रशिक्षणार्थी पोलिसांसाठी राबविला रक्षाबंधनाचा हृदयस्पर्शी उपक्रम

ईन्नरव्हील क्लबने प्रशिक्षणार्थी पोलिसांसाठी राबविला रक्षाबंधनाचा हृदयस्पर्शी उपक्रम

ईन्नरव्हील क्लबने प्रशिक्षणार्थी पोलिसांसाठी राबविला रक्षाबंधनाचा हृदयस्पर्शी उपक्रम
चौदाशे जवानांना बहिणीच्या नात्याचा सन्मान देत हातात बांधला स्नेहधागा
जालना/प्रतिनिधी/ उपक्रम ईन्नरव्हील क्लब जालना आणि दानकुंवर विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी शुक्रवार दि. 8 ऑगस्ट रोजी कुटुंबियांपासून लांब राहून कर्तव्याचे धडे गिरवणाऱ्या 1400 पोलीस प्रशिक्षणार्थ्यांसाठी रक्षाबंधनाचा दिवस अविस्मरणीय करण्याचा आगळावेगळा  उपक्रम राबवला. बहिणीच्या प्रेमाचा स्पर्श आणि घरच्या सणाचा माहोल निर्माण करण्यासाठी क्लबने पोलीस प्रशिक्षण विद्यालयात जाऊन प्रशिक्षणार्थ्यांना राख्या बांधल्या.
       कार्यक्रमास पोलीस प्रशिक्षण विद्यालयाचे प्राचार्य अशोक बनकर, क्लबच्या अध्यक्षा काजल पटेल, सचिव राखी जेथलिया यांच्यासह सुवर्णा करवा, मनीषा गणात्रा, छाया हंसोरा, कल्पना गोसरानी, सरला अग्रवाल, सुनिता अग्रवाल, राजश्री झंवर आदींची उपस्थिती होती. विद्यार्थिनींनी आणि क्लब सदस्यांनी एकेकाला राखी बांधत प्रेम, आपुलकी आणि शुभेच्छांचा वर्षाव केला. या कार्यक्रमामुळे प्रशिक्षणार्थी पोलिसांना घरच्या सणाची आठवण आणि बहिणीच्या हाताने राखी बांधल्याची अनुभूती आली.
      यावेळी बोलताना ईन्नरव्हील क्लबच्या  अध्यक्षा काजल पटेल म्हणाल्या की, या विद्यालयात राज्यभरातून प्रशिक्षण घेत असलेले भावी पोलीस घरापासून दूर राहतात. रक्षाबंधनासारख्या सणाला त्यांना त्यांच्या बहिणी आणि कुटुंबीयाची आठवण येणे साहजिक आहे. त्यांना थोडाफार घरचा माहोल देण्याचा आमचा हा छोटा प्रयत्न आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि सर्वांसोबत रक्षाबंधन साजरे करण्याच्या समाधानामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. हा उपक्रम केवळ रक्षाबंधन साजरा करण्यापुरता मर्यादित न राहता, पोलीस दल आणि समाजातील नाते अधिक घट्ट करणारा आहे, असे त्या म्हणाल्या. प्रशिक्षणार्थ्यांनी बहिणींसारख्या आलेल्या पाहुण्यांचे मनापासून आभार मानले, तर पदाधिकाऱ्यांनीही त्यांच्यासाठी भविष्यात अशा प्रकारचे भावनिक आणि प्रेरणादायी उपक्रम राबविण्याचा मनोदय व्यक्त केला.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments