मधुमेह निदान अभियानातील उल्लेखनीय
योगदानाबद्दल पन्नालाल बगडिया यांचा गौरव
जालना/प्रतिनिधी/ “अब की बार, एक लाख पार” या मोफत मधुमेह निदान चाचणी अभियानासाठी उल्लेखनीय आर्थिक योगदान दिल्याबद्दल सौ. जमुनाबाई शिवरतन बगडिया चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष पन्नालाल बगडिया यांचा रोटरीच्या प्रांतीय कार्यक्रमात गौरव करण्यात आला.
रोटरीचे सन 2024- 25 चे प्रांतपाल डॉ. सुरेश साबू यांच्या संकल्पनेतून डिस्ट्रिक्ट डायबिटीज डायरेक्टर डॉ. राजेश सेठीया यांच्या मार्गदर्शनाखाली सौ. जमुनाबाई शिवरतन बगडिया चॅरिटेबल ट्रस्टच्या सहकार्याने प्रांतात मोफत मधुमेह चाचण्यांचे “अब की बार, एक लाख पार” हे अभियान राबविण्यात आणि अवघ्या सात महिन्यात हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येऊन 30 जूनपर्यंत सुमारे दीड लाख चाचण्या करण्यात आल्या. या योगदानाची दखल घेऊन, जालना येथे रविवार दि. 3 ऑगस्ट रोजी पार पडलेल्या रोटरीच्या प्रांतीय कार्यक्रमात ट्रस्टचे अध्यक्ष पन्नालाल बगडिया यांचा माजी प्रांतपाल डॉ. सुरेश साबू आणि सुहास वैद्य यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. याप्रसंगी डॉ. राजेश सेठीया, सौ. निर्मलादेवी साबू, आदित्य बगडिया आदींची उपस्थिती होती.
यावर्षीही सौ. जमुनाबाई शिवरतन बगडिया चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून डॉ. सेठीया यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत दहा हजार थायरॉईड चाचण्या अभियान हाती घेण्यात आले असून, उपरोक्त कार्यक्रम स्थळीही घेण्यात आलेल्या शिबिरात रोटरी परिवारातील 112 सदस्यांच्या थायरॉईड चाचण्या करण्यात आल्या. या शिबिराला प्रांतपाल सुधीर लातूरे आणि प्रांतातून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन या अभियानाचे कौतुक केले. यावेळी बोलताना पन्नालाल बगडिया म्हणाले की, आरोग्य हेच खरे धन आहे. थायरॉईडसारखा गंभीर विकार वेळेवर लक्षात आला नाही तर तो अनेक मोठ्या आजारांचं कारण बनतो. त्यामुळेच या थायरॉईड जनजागृती आणि तपासणी अभियानासाठी ट्रस्टने पुढाकार घेतला आहे. आमच्या या छोट्याशा योगदानातून आजार लवकर कळाला, उपचार मिळाले आणि त्याचं जीवन चांगलं झालं तर त्याहून मोठं समाधान दुसरं काहीच नाही.समाजाचं आरोग्य चांगलं असेल तरच आपला देशही खऱ्या अर्थाने सशक्त बनेल, असे ते म्हणाले.