शासकीय आणि खाजगी दवाखान्याच्या विरोधात माकपची निदर्शने
नांदेड : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने नागपंचमीच्या दिवशी २९ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर तीव्र निदर्शने करण्यात आली.
डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड येथील अधिष्ठाता यांच्या विरोधात घोषणा देऊन निषेध करण्यात आला.
२० जुलै रोजी एक दलित कुटुंबातील महिला प्रसूतीसाठी विष्णुपुरी येथील शासकीय दवाखान्यात दाखल झाली होती. तीची प्रसूती झाल्यावर त्या महिलेला बेड मिळाला नाही. किंबहुना त्या माहिलेला नवजात बाळासह जमिनीवर बराच वेळ टाकण्यात आले.
या अनुषंगाने माकप तालुका कमिटी सभासद कॉ.श्याम सरोदे यांनी समाज माध्यमावर एक पोस्ट टाकली होती. त्या पोस्ट वर संतापून विष्णुपुरी येथील नामांकित शासकीय दवाखान्यातील अधिष्ठाता श्री सुधीर देशमुख यांनी मोबाईल फोन करून कॉ.सरोदे यांना धमकीवजा बोलून दवाखान्यात येऊन भेटा अन्यथा कार्यवाही करण्यात येईल असे धमकावले.
ही बाब गंभीर असून अनेक वर्षांपासून नांदेड येथे डीन म्हणून कार्यरत असलेले श्री देशमुख यांच्या कृत्याच्या विरोधात दि.२२ जुलै रोजी माकप सचिव कॉ.गंगाधर गायकवाड यांच्या नेतृवाखाली जिल्हाधिकारी नांदेड यांना निवेदन देऊन २९ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करण्याचा इशारा देण्यात आला होता. तेव्हा निवासी उप जिल्हाधिकारी श्री किरण आंबेकर यांच्या सूचनेनुसार दि.२४ जुलै रोजी अधिष्ठाता यांचे नावे लेखी पत्र काढून माकपच्या निवेदनानुसार कार्यवाही करण्याचे लेखी कळविले होते.
परंतु अधिष्ठाता देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पत्राला कसल्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही.
त्यामुळे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या तालुका कमिटीच्या वतीने २९ रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर पडत्या पाण्यात तीव्र निदर्शने करण्यात आली.
यावेळी दवाखान्यातील समस्या संदर्भाने घोषणा देण्यात आल्या. शासकीय दवाखान्यात स्ट्रेचर मिळणे अवघड असून, प्रसूती नंतर नातेवाईकांकडून पैसे घेतले जातात, पार्किंगवाले व सेक्युरिटी गार्ड, डॉक्टर व इतर कर्मचारी रुग्णांच्या नातेवाईकांना अवमानकारक बोलतात, दवाखान्यात मोठ्या प्रमाणात असलेली अस्वच्छता या संदर्भातील मागण्या निवेदनात नमूद आहेत.खाजगी दवाखान्यातील मनमानी संदर्भात देखील मागण्या करण्यात आल्या आहेत.