पावसाची तीन दिवसातही निराशा, आता फक्त श्रावण सरींची आशा !सोयगाव तालुक्यातील गावांमध्ये अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम, शेतकरीवर्ग चिंतेत
आत्ताच एक्सप्रेस
सोयगाव/प्रतिनिधी/ पावसाळ्याचे दोन महिने ऊन-सावलीच्या खेळात निघून गेले. गुरुवार पासून सुरू असलेल्या रिमझिम पावसानेही निराशा च केली असून दमदार पाऊस मात्र बरसलाच नाही. भिज पावसाच्या बळावर पीक परिस्थिती उत्तम असली तरी पिकात तण व रोगराई मात्र जोमात आहे. आता श्रावण सरी तरी जोरदार बरसतील, अशा आशेत शेतकरी आहे.
परिसरात मे महिन्यात उन्हाळी कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दमदार पाऊस बरसल्याने व जून महिन्याच्या सुरुवातीला भिज पाऊस बरसल्याने पावसाळी कपाशी, मका, ज्वारी, बाजरी पेरणीही उरकण्यात आली. परिसरात अधूनमधून पडणाऱ्या भिज पावसामुळे पीक परिस्थिती उत्तम असली तरी अद्यापही दमदार पाऊस न बरसल्याने पिकांची वाढ मात्र खुंटली आहे. काही दिवसात पाऊस न झाल्यास पिके धोक्यात येणार अहेत.
—पिकांची वाढ खुंटली, रिमझिम पावसाचीही रविवारी उघडीप
सोयगाव सह परिसरात पावसाची गुरुवारी रिमझिम सुरुवात पावसाने झाली. दमदार पाऊस बरसलाच नाही. त्यामुळे अजूनही परिसरातील नाले, केटीवेअर, पाझर तलाव, विहिरी अजूनही कोरडेच आहेत. दमदार पाऊस नसल्याने पिकांची वाढही खुंटली आहे.रविवारी दि.२७ रिमझिम पावसानेही उसंत घेतली आहे हलक्या प्रतीच्या जमिनीतील पिके माना टाकायला लागली आहेत. ज्या शेतकऱ्याकडे थोडेफार पाणी आहे ते पिकांना देताना दिसत आहेत.खरीप पिके आता दोन महिन्यांची होत आल्याने शेतकऱ्यांनी पिकांना रासायनिक खते दिली आहेत; परंतु दमदार पाऊस नसल्याने खते अजून जमिनीवर पडली आहेत. पाऊस न झाल्यास पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते.
सोयगाव तालुक्यात किरकोळ पाऊस वगळता एकदाही मुसळधार पाऊस न झाल्याने पिकांचा जीव धोक्यात आहे. आतापर्यंत जमिनीतील ओलाव्यावरच पिके तग धरून आहेत.सोयगाव तालुक्यात पावसाळ्याचे दोन महिने उलटले तरी परिसरात दमदार पाऊस बरसला नाही. आता श्रावण महिना सुरू होत आहे. शेतकऱ्याचा सण बैल पोळा झाल्यावर पाऊस भोळा होतो. म्हणजे पाऊस परतीच्या मार्गावर असतो, असे जाणकार सांगतात.आता शेतकऱ्यांना श्रावण महिन्यातील पावसाची अशा आहे. या महिन्यात तरी पावसाची तूट भरून निघेल, अशी आशा आहे. श्रावण महिन्यात तरी तूट भरून निघाल्यास उत्पन्न येईल अन्यथा उत्पन्नात मोठी घट येणार, या विवंचनेत शेतकरी आहेत.
प्रतिक्रिया;-१)सोयगाव परिसरात सुरुवातीपासून भिज पाऊस बरसत आहे. हा पाऊस पिके लहान होती, तोपर्यंत उपयोगी होता; परंतु पिके आता दोन महिन्यांची होत आल्याने पिकांना पाणी जास्त लागणार आहे. ते न मिळाल्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. श्रावण महिन्यात वरुणराजा चांगला बरसल्यास उत्पन्न येईल अन्यथा खर्चही निघणार नाही.