Wednesday, October 29, 2025
Homeऔरंगाबादकणेकर गेले ; खुमासदार लेखणी थंडावली

कणेकर गेले ; खुमासदार लेखणी थंडावली

कणेकर गेले ; खुमासदार लेखणी थंडावली
 महाराष्ट्रातील प्रसिद्ध पत्रकार,   लेखक, स्तंभ लेखक शिरीष कणेकर यांचा आज स्मृतिदिन. २५ जुलै २०२३ रोजी वयाच्या ८० व्या वर्षी त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने सर्वांना धक्का बसला होता कारण ते असे अचानक निघून जातील असे कोणालाही वाटले नव्हते कारण त्यांच्या मृत्यूच्या आदल्या दिवशी त्यांनी लिहिलेले लेख वर्तमानपत्रात छापून आले होते. माझ्यासाठी तर तो खूप मोठा धक्का होता कारण ते माझे सर्वात आवडते  लेखक होते. त्यांची जवळपास सर्वच पुस्तके मी वाचून काढली आहेत. वर्तमानपत्रातील त्यांचे लेख वाचूनच मी स्तंभलेखनाकडे वळलो. त्यांच्या लेखाचा विषय माझा सर्वात आवडीचा विषय. माझाच कशाला आज जे चाळीशी – पन्नाशीत आहे त्या सर्वांचा आवडीचा विषय ते आपल्या लेखणीतून खुमासदारपणे हाताळत आणि तो विषय म्हणजे चित्रपट आणि क्रिकेट. वर्तमान पत्रात त्यांचे चित्रपट आणि क्रिकेटवर लेख छापून आले की ते झटक्यात वाचून संपवणे आणि त्यावर तासनतास चर्चा करणे हा आमच्या मित्र मंडळींचा आवडता छंद. त्यांच्यामुळेच आम्हाला जुन्या काळातील कुंदनलाल सैगल, दिलीप कुमार, राज कुमार, अशोक कुमार, राज कपूर, शम्मी कपूर, देवानंद या अभिनेत्यांची ओळख झाली. तसेच पन्नास ते ऐंशी च्या दशकातील क्रिकेटपटूंची ओळख झाली. केवळ अभिनेते, अभिनेत्री आणि क्रिकेटरच नव्हे तर हिंदी सिनेसंगीत हा देखील त्यांच्या लेखनाचा आवडीचा विषय होता. अतिशय अभ्यासपूर्ण, खुसखुशीत आणि विनोदीशैली हे त्यांच्या लेखणीचे वैशिष्ट्य. अतिशय खुसखुशीत विनोदी शैलीत ते लिहित असल्याने तरुण वर्ग त्यांचा मोठा वाचक बनला.  तरुण मुलांचे ते आवडते लेखक होते. तरुण मुले कट्ट्यावर बसून ज्या प्रमाणे गप्पा मारत अगदी तसेच त्यांचे लेखन होते त्यामुळेच त्यांचा सर्वाधिक वाचकवर्ग हा तरुण होता. वर्तमानपत्रात लेख लिहून स्तंभलेखक म्हणून नावारूपास आलेल्या शिरीष कणेकर यांनी पुढे अनेक पुस्तके लिहिली. यादो की बारात, शिरीषासन, सिनेमाबाजी, मुद्दे आणि गुद्दे, चहाटळकी, सुरपारंब्या, सिनेमगिरी, लागाव बत्ती, कणेकरी, चिमटे आणि  गालगुच्चे, आसपास, मेतकूट, चित्ररूप, कल्चर – वल्हचर असे त्यांचे विविध वर्तमानपत्रातील  स्तंभ लेखन गाजले. गाये चला जा, यादो की बारात, एक्केचाळीस, गोळी मार भेजे में,  गोतावळा, कुरापत, मखलाशी, फटकेबाजी, पुन्हा यादों की बारात, टिवल्या – बावल्या, चंची, चापट पोळी, डॉलरच्या देशा, एकला, रहस्यवल्ली, सुरपारंब्या, क्रिकेटवेध, नट – बोलट, बोलपट,  सिनेमा डॉट कॉम ही त्यांची पुस्तके खूप लोकप्रिय झाली. शिरीष कणेकर यांनी लेखनासोबत क्रिकेट व चित्रपटावर स्टॅण्ड अप शो देखील केले. माझी फिल्लमबाजी, फटकेबाजी, ….आणि पुन्हा कणेकर हे त्यांचे स्टँड अप शो खूप लोकप्रिय झाले. त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले पण वाचकांच्या मनात त्यांचे जे स्थान होते ते कोणत्याही पुरस्कारापेक्षा श्रेष्ठ होते. कणेकर गेले आणि खुमासदार लेखणी थंडावली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आपल्या खुमासदार लेखनाने तरुण वाचकांच्या मनात आगळे स्थान निर्माण करणारा हा अवलिया लेखक आज आपल्यात नाही हे  मन मानायला तयार नाही. शिरीष कणेकरांची फिल्लमबाजी, फटकेबाजी पुन्हा अनुभवता येणार नाही याची खंत वाटते. असो नियतीने जे मांडून ठेवले आहे ते स्वीकारावेच लागेल. शिरीष कणेकर यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments