प्रलंबित कार्यालयीन कामाचा वेळेत निपटारा करा- सीईओ मीन्नु
शनिवार ,रविवार कार्यालय सुरु ठेवण्याचे आदेश
जालना/ जिल्हा व तालुकास्तरावर केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वकांक्षी असलेल्या विविध योजनाची माहिती अद्यावत करणेसाठी व आपआपल्या स्तरावर प्रलंबित असलेले कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी येत्या शनिवारी व रविवारी कार्यालय सुरु ठेवावेत असे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीन्नु पी.एम यांनी कार्यालय प्रमुखांना दिले आहेत.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीन्नु यांनी पदभार घेतल्यापासून विविध विभागा आढावा बैठकांचा धडाका सुरु केला आहे. जिल्हा परिषदेच्या परिसरातील स्वच्छतेच्या कामासह तालुकास्तरीय बैठकीच्या वेळी काही विभागाची माहिती अद्यावत नसल्याचे दिसून आले. यामुळे हि सर्व माहिती अद्यावत करण्यासाठी शनिवारी व रविवारी जिल्हा व तालुका स्तरावरील कार्यालय सुरु ठेवून माहिती सह प्रलंबित कामे करण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अंतर्गत घरकुल योजना , एकात्मिक बाल विकास विभाग, शिक्षण विभाग, आरोग्य , बांधकाम विभाग, स्वच्छ भारत मिशन, कृषी, पशु संवर्धन या विभागाचा यात समावेश आहे.
गटविकास अधिकारी यांनी आपल्या अधिनस्त कर्मचारी यांच्या कडून सदरील कामे करून घेणेसाठी विशेष कॅम्प आयोजित करणेबाबत सूचित केले आहे.
जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे यांना सदरील बाबीचे सनियंत्रण अधिकारी तसेच डीआरडीए प्रकल्प संचालक घरकुल सुनीलकुमार पठारे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी उदयसिंग राजपूत यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.