महिला व बालकांचे संरक्षण ही सामूहिक
जबाबदारी—ॲड. सौ. अश्विनी धन्नावत
कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात पॉश व पोस्को कायद्यावर मार्गदर्शन
जालना/प्रतिनिधी/ कामाच्या ठिकाणी महिलांचा सन्मान आणि बालकांचे संरक्षण ही केवळ कायदेशीर जबाबदारी नसून सामाजिक बांधिलकी आहे, असे मत बाल न्याय मंडळाच्या सदस्या ॲड. अश्विनी धन्नावत यांनी व्यक्त केले.
जालना शहराजवळील टी. व्ही. सेंटर भागातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात आयोजित पॉश व पोस्को या कायद्यासंदर्भातील मार्गदर्शन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. व्यासपीठावर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती एम. के. पवार यांची उपस्थिती होती.
ॲड. धन्नावत यांनी पॉश कायद्याची माहिती देताना स्पष्ट केले की, महिलांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित आणि सन्मानजनक वातावरण मिळावे ही प्राथमिक अपेक्षा आहे. अंतर्गत तक्रार समिती, तक्रार प्रक्रियेची पारदर्शकता आणि कायद्यातील जबाबदाऱ्या याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. पोस्को कायद्यासंदर्भात बोलताना त्यांनी बालकांवरील अत्याचार प्रकार, त्यांना ओळखण्याची लक्षणे, तक्रार दाखल करण्याची बंधनकारक जबाबदारी, आणि शिक्षण संस्थेची भूमिका यावर प्रकाश टाकला. बालकांच्या हितासाठी आपण सर्वांनी सजग असणे आवश्यक आहे, असे त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षिका के. एस. दाभाडे, ए. आर. सूर्यवंशी, एस. आर. गायकवाड, टी. एस. कुंटे, एस. डी. पिसाळ, एस. आर. तसेवाल, एस. आर. माटोले, एस. एम. शिंदे, व्ही. आर. भोरे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी दीडशे विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका के. एस. दाभाडे यांनी केले तर शेवटी उपस्थितांचे आभार मुख्याध्यापिका एम. के. पवार यांनी मानले.