वडोद बुद्रुक सरपंच प्रकरणात नवा कलाटणीबिंदू: सुनीता चव्हाण सरपंचपदी कायम
खुलताबाद/प्रतिनिधी/ खुलताबाद तालुक्यातील वडोद बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच सुनीता विलास चव्हाण यांना पदावरून अपात्र ठरवण्याचा निर्णय ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिला होता.मात्र,या निर्णयाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असून, सध्या त्या सरपंचपदावर कायम राहणार असून समर्थकांनी आनंद व्यक्त करत त्यांचा सत्कार केला आहे.सुनीता चव्हाण यांच्यावर आरोप होता की,त्यांनी सरपंच पदाचा गैरवापर करत अधिकार नसता नाही आपल्या सासऱ्याच्या नावे वारस प्रमाणपत्र स्वतःच्या सहीने तयार करून सहा वारस असताना ही केवळ आपल्या पतीलाच वारस दाखवले,या प्रकरणात राहुल सुभाष चव्हाण यांनी अॅड. के. एफ. शिंगारे यांच्या माध्यमातून तक्रार दाखल केली होती.
प्रथम जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तक्रार फेटाळली, मात्र पुढील अपीलमध्ये ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सुनावणी घेत सरपंचपदासाठी अपात्र ठरवण्याचा निर्णय दिला होता.सौ.चव्हाण या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश सचिव विलास चव्हाण यांच्या पत्नी आहेत.
त्यानंतर सुनिता चव्हाण यांनी मंत्री गोरे यांच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने मंत्री गोरे यांचा अपात्रतेचा आदेश स्थगित करत सुनीता चव्हाण यांना सध्या पदावर कायम ठेवण्याचे आदेश दिले.या निर्णयामुळे गावात व तालुक्यात नवीन चर्चा सुरू झाल्या आहेत. समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, विरोधक संतप्त आहेत. आता पुढील सुनावणीपर्यंत सुनीता चव्हाण या सरपंचपदावर आपले कर्तव्य बजावत राहणार आहेत.
